लंडन! सगळ्यांच्या मनात घर करुन राहिलेलं शहर. जेवढी इथे आर्थिक सुबत्ता आहे तेवढीच कलाप्रेमींची संख्या मोठी आहे. युनायटेड किंगडमच्या या भव्य आर्थिक राजधानीत जर थिएटर नसेल तर तो या राजबिंड्या राजधानीचा फार मोठा अपमान ठरेल. “प्रिंस एडवर्ड थिएटर”! नावातच प्रिंस आहे तर मग थिएटर किती भव्य आणि देखणं असेल हे तुमच्या ध्यानात आलेच असेल.
इतिहास :
१९३० साली या वास्तूची रचना करण्यात आली होती आणि वास्तूचे रचनाकार होते एडवर्ड ए. स्टोन. वास्तूच्या आतील भागाची सजावट (Interior Designing) मार्क हेनरी लेव्ही व गॅस्टन लॅव्हर्डेट यांच्या कलात्मक दृष्टीकोनातून झालेली होती. ३ एप्रिल १९३० रोजी हे थिएटर सर्व कलाप्रेमींसाठी खुलं करण्यात आलंं. या थिएटरमधील सगळ्यात पहिलं सादरीकरण “Musical Rio Rita” या श्रवणीय कार्यक्रमाचं झालं. थिएटरच्या सुरुवातीच्या काळात नावाजलेल्या कार्यक्रमांपैकी प्रसिद्ध कॅबरे कलाकार जोसेफिन बेकर हिचा “Bananas Dancing” हा कार्यक्रम विशेष लक्षवेधी ठरला.
इ. स. १९३५ मध्ये स्टोनने या थिएटरचे रुपांतर डान्स हॉल व कॅबरे हॉलमध्ये केले. त्याचे नाव ” लंडन कसिनो” ठेवण्यात आले होते. १० मे १९४१ रोजी दुसर्या महायुद्धात झालेल्या हवाई हल्ल्याने “लंडन कसिनोचे” बरेच नुकसान झाले होते. सगळ्या काचा फुटलेल्या होत्या. १९४२ मध्ये थॉमस ब्रॅडडॉक यांनी रंगमंचामध्ये बदल घडवून आणले. पुढे याच वर्षात ही वास्तू “क्विन्सबेरीस् ऑल सर्विसेस क्लब” या नावाने पुन्हा उघडली गेली. युद्धानंतर टी आणि ई. ब्रॅडडॉक यांंनी ही वास्तू पुन्हा उघडून त्यात नाटकांचे प्रयोग लावण्यास सुरुवात केली. अशा तर्हेने “लंडन कसिनो” पुन्हा सुरु झाले.
२१ जून १९७८ रोजी हे थिएटर त्याच्या मूळ नावाने म्हणजेच “प्रिंस एडवर्ड थिएटर” या नावाने पुन्हा उघडण्यात आले.
सध्याची प्रेक्षागृहाची आसन व्यवस्था १७२७ आसनांची आहे. सध्या या वास्तूला नुकतीच ९० वर्षं पूर्ण झाली आहेत. ही वास्तू सध्या डेलफॉंट मॅकिंटोश थिएटर्सच्या मालकीची आहे. वास्तूचे मूळ वास्तूविशारद एडवर्ड स्टोन हे आहेत.
एकंदरीत कलाप्रेमींसाठी ही वास्तू म्हणजे एक वरदानच आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
पत्ता : Old Compton Street, London, W 1 D 4HS, United Kingdom
— आदित्य दि. संंभूस (कलाकार, दिग्दर्शक, लेखक)
Leave a Reply