आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे क्रमांक चार
जगण्यासाठी औषध काम करत नाही.
भाग दोन
जीवनावश्यक काय आहे ?
अ.व.नि.
अवनि म्हणजे पृथ्वी. तिचे रक्षण तर झालेच पाहिजे. पण शब्दाची फोड केली तर अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन मूलभुत गरजा आहेत. असे आम्हाला शाळेत इयत्ता चौथी अ मधे शिकवले होते. आताच्या काळाचा विचार करता, चौथी गरज वाॅटसपची झाली…..
……. तुला स्वर्गात जायचे आहे की नरकात असा प्रश्न विचारल्यावर जिथे फोरजीची रेंज येते आणि मोबाईल आणि चार्जर नेता येतो तिथे कुठेही चालेल, अशी उत्तरे देणारी मोबाईल अनिवार्य झालेली आजची पिढी…..
पाचवी गरज औषधांची निर्माण झाली.
असे वाटू लागले आहे, की औषधांशिवाय मी जगूच शकणार नाही. एकवेळ जेवण आणि आंघोळ राहिली तरी चालेल पण औषधे विसरून चालणार नाही, असे वाटण्या इतपत कायमस्वरूपी औषधाबद्दलचे प्रेम निर्माण झाले आहे.
“उगाच रिस्क कशाला घेताय”
” हेल्थ महत्त्वाची की पैसा”
अशा गोंडस टायटल असलेली टिपीकल वाक्य डाॅक्टरनीच सुनावल्यावर, औषध ही जीवनावश्यक गरज बनली. परदेशवारीची ऑफर फार्मा कंपन्या, डाॅक्टरना देतात. एखाद्या कंपनीची औषधे जर वर्षभर वापरली तर सिंगापूर मलेशिया ट्रीप जर होत असेल तर या मोहात कोण पडणार नाही ? अर्थात सर्व डाॅक्टर ही ऑफर स्विकारतात असं नाही. पण हा सरळ सरळ बिझनेस आहे. दुर्दैव आहे की यात सर्वसामान्य जनतेचे आरोग्य पणाला लावले जातेय.
फूड अॅण्ड हेल्थ सप्लीमेंटच्या नावाने महागड्या टूथपेस्ट पासून ते अगदी औषधे विकणाऱ्या कंपन्या, आपले टाय बांधलेले सोकाॅल्ड सोकावलेले एजंट दारोदारी फिरवत आहेत. दुर्दैवाने यात काही डाॅक्टरदेखील एजंट म्हणून सामील आहेत. आरोग्य जनजागृती च्या नावाने, जनतेच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. “आजकाल म्हणे अन्नाचा दर्जा खूप घसरल्यामुळे आमची ही पावडर तुम्हाला दिवसभराची सर्व एनर्जी देईल.” इथपर्यंत असत्याचा प्रचार केला जातोय. फ्रि मेडीकल हेल्थ चेक अप कॅम्पच्या जनसेवेतून काही मशीनद्वारे मोफत कॅल्शियम, हिमोग्लोबिन तपासणीचे नाटक पार पाडले जाते. हवे तसे रिपोर्ट आणले की आमच्या कंपनीचे अमुक औषध आता आपल्याला विकत घ्यायला हवे, असेही या “फ्री” चेक कॅम्पमधे सांगितले जाते.
उल्लु बननेवाले है, इसलिए “बनानेवाले” पैदा होते है।
औषधे ही रोग घालवण्यापुरती, तात्पुरतीच घ्यायची असतात, नंतर रोग विसरून जायचा असतो, लक्षात ठेवायचा नसतो, हे लक्षातच येत नाही आणि औषधं कायमची पाठी लागतात.
“माझ्या चुकीच्या जीवनशैलीमुळे मला त्रास होताहेत” हे मान्य न करता, हे जीवनचक्र असेच चालणार, आणि आम्ही आयुष्यभर औषधे घेत बसणार आहोत.” अशी विचारसरणी असलेल्या व्यक्तींनी, हा लेख फारसा मनाला लावून घेऊ नये. विसरून जावे.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
20.04.2017
Leave a Reply