आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे क्रमांक चार
जगण्यासाठी औषध काम करत नाही – भाग तीन
स्वतः ठरवून स्वतःच उपचार करणे हा आणखीन एक अति घातक प्रकार. कोणीतरी सांगितले म्हणून कुठेही, कोणत्याही नागरमुन्नळी सारख्या गावात सुद्धा स्पेशल गाड्या करून औषधे घेण्यासाठी लोक धावतात, याचे आश्चर्य वाटते. आपण आपल्या गाडीची काळजी घेतो, त्यात योग्य कंपनीचे, ऑईल, पेट्रोल, डिझेल घालतो. काही वेळा दुरुस्तीची वेळ आली तर त्या गाडीच्या स्पेशल मेकॅनिककडे नेतो. पण नशीबाने एकदाच मिळणाऱ्या या शरीरावर असे काही अत्याचारी औषधी प्रयोग करीत बसतो, की जणुकाही आपणाला आपले शरीर संपूर्णपणे कळलेलेच आहे.
आपण कोणते औषध घेतोय, तो देणारा, तेवढा विश्वासार्ह आहे का, याची कोणतीही खातरजमा न करता, भोंदू वैद्य आणि बोगस डाॅक्टरांच्या मागे अक्षरशः धावतो, यात औषध देणाऱ्याला आपण शास्त्र बदनाम करीत आहोत, याचेही भान नसते. आणि घेणाऱ्याने आपली बुद्धी गहाण टाकलेली असते.
प्रत्येक राज्याचे एक वैद्यकीय व्यवसाय नियामक मंडळ असते. जसे महाराष्ट्रात एमसीआयएम. महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडीसीन हे सरकारने नेमलेले मंडळ आहे. या मंडळाकडे जेव्हा वैद्यकीय महाविद्यालयाच्या संबंधित विद्यापीठाचे अधिकृत प्रशस्तीपत्रक सादर केले जाते तेव्हा, असे केल्यानंतर डाॅक्टरना वैद्यकीय व्यवसाय करण्याचा रितसर क्रमांक आणि प्रमाणपत्र मिळते. ते दवाखान्याच्या दर्शनी भागात लावलेच पाहिजे. असा नियम आहे. आपण रूग्ण म्हणून ज्यांच्याकडून औषधे घेणार आहोत, ते योग्य शिक्षण घेतलेले अधिकृत पदवीधर आहेत का, याची खात्री करून नंतरच त्यांची औषधे घ्यायची असतात. नाहीतर औषधांचे जे गंभीर दुष्परिणाम होतात, त्यांना सामोरे जावे लागते.
आयुर्वेद, होमियोपॅथी, अॅलोपॅथी, योग, निसर्गोपचार, सिद्ध आणि युनानी या किमान पदवीधारकाकडून औषध घ्यावे, असा दंडक आहे.
केवळ लक्षण सांगून, काही वेळा तर पूर्वीच्या डाॅक्टरनी केलेले निदान ऐकवून, स्वतःच पॅथाॅलाॅजीमधे जाऊन, रिपोर्ट करून, नेट वरून थोडीफार माहिती मिळवून, रोगाचे अचूक नावच सांगून, कोणत्याही पॅथीचे औषध घेणे ही खूप मोठी चूक होऊ शकते. यात मूळ शास्त्र बदनाम तर होतेच पण शरीराची जास्ती हानी होते, बोले तो, पूरी वाट लगती है । तेव्हा सावधान!!
रुग्णाची अवस्था, रोगाची व्याप्ती, गंभीरपणा, रोगाचे भविष्यातील धोके, औषधांचे डोस, किती कालावधीसाठी औषध घ्यावे, पथ्यापथ्य इ. सर्व तपासल्यानंतर सल्ला अधिक चांगला देता येईल ना ! केवळ वाॅटसपवरचे सल्ले, कुणातरी पुष्पादिदिवर विश्वास ठेवून, आंबट तिखट तेलकट बंद करा आणि आमची अमुक औषधे घ्या, टीव्ही वरील जाहीराती वाचून, शेजाऱ्यांचे ऐकून, घरी आलेल्या एजंटकडून औषधोपचार ठरवणे, हा चक्क मूर्खपणा आहे.
अनेक वेळा आयुर्वेदीय औषधांमधे अॅलोपॅथीच्या औषधांची भेसळ केली जाते. त्यातही त्वरीत वेदनाशामक म्हणून स्टिराॅईड असलेली औषधे जास्त प्रमाणात दिली जातात, याचे परिणाम न सांगता सुद्धा थोबाडावर दिसतात. कानाखाली सूज येणे, औषध घेतल्यावर लगेचच दुख कमी होणे, औषध थांबवले की परत त्रास सुरू होणे, भूक खूप लागणे, तेच औषध मला परत परत घ्यावेसे वाटणे, ही सर्व स्टिराईड पोटात जात असल्याची लक्षणे आहेत. जी भविष्यात खूप हानीकारक ठरू शकतात.
किडनी साफ करण्यासाठी लघवी होणारी औषधे, सेक्सची ताकद वाढवणारी, त्वचा विकार कमी करणारी काॅर्टीझाॅन मलमे, आवळा आणि कोरफड ज्युसच्या नावाने मिळणारे पाणी, कफ सिरपच्या नावाने मिळणारा साखरेचा पाक, नोनीचे मार्केटींग, एमेलेमच्या नावाखाली चाललेला टाॅनिकचा धुडगुस, जिममधे सुचवली जाणारी प्रोटीनची खिरापत, कित्ती किती अनावश्यक औषधे म्हणून सांगू…
औषधांचा काळाबाजार हा प्रथितयश औषधांच्या तुलनेत कदाचित दोन ते तीन पट अधिक असू शकेल. असा अंदाज आहे.
हे म्हणजे “आधीच मर्कट, त्यात मद्य प्याला” अशी अवस्था होते. आधीच्या चुकीच्या औषधांचे दुष्परिणाम काहीवेळा सहा सहा महिने राहातात, आणि महत्वाच्या औषधाला गुण दिसत नाही, ही अवस्था तर आगीतून फुफाट्यात गेल्यासारखी होते. हे केवळ एकाच पॅथीमधे होत असे नाही तर सर्वच पॅथीमधे हा घोळ दिसतो. यावर सरकारचे लक्ष असेल नसेल, पण एक जबाबदार नागरीक म्हणून आपल्याला, आपल्या कुटुंबियांच्या हितासाठी, अनावश्यक औषधांचा अनावश्यक वापर टाळावा असा सल्ला द्यावासा वाटतो.
नको त्या माणसाकडून, नको ती औषधे, नको त्या अवस्थेत घेतली की, परिणाम नको तेच दिसणार. आणखी दुसरं काय होणार ?
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
21.04.2017
Leave a Reply