आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक दहा
विज्ञान शाप की वरदान-भाग दोन
विज्ञानाला स्वयंपाकघरात आणून ठेवल्याने त्याने भस्मासूराचे रूप घेतले आहे आणि आता तो निर्माणकर्त्यावरच उलटला आहे. त्याला कार्यालयात, दिवाणखान्यात, शिक्षणक्षेत्रात, अंतराळ क्षेत्रात जागा जरूर द्यावी, पण हा राक्षस जेव्हा आमच्या घरात घुसला तेव्हा, त्याला तिथेच बाहेर रोखायला हवा होता. आता तो एवढा माजला आहे की, त्याला आवरणे भल्याभल्यांना कठीण होत आहे. स्वयंपाकघरात तर त्याच्याशिवाय पानही हलत नाही. आता सगळं कसं “इझी” झालंय, या “इझीपणाची” ही सवय आळसाची सख्खी मैत्रीण आणि व्यायामाची शत्रू झाली आहे. आणि जे व्हायचं तेच होतंय. अनारोग्य !
विज्ञानाची भलावण करणाऱ्यांना जरूर भलावण करूदेत, पण जेव्हा पाश्चात्य तज्ञ त्यांच्या संशोधनातून सांगतील, तेव्हाच यांना पटेल, तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल.
सावध तो सुखी.
वेळीच सावध होऊन जेवढे शक्य आहे, तेवढे व्यायामाचे रूपांतर कामात केले तर रोगापासून आणि औषधांपासून आपण लांब जाऊ शकतो.
पहाटे उठून सडासारवण केले जायचे. घरातील सर्व दहा पंधरा खोल्यामधील केरवारे वाकून केले जायचे. तुळशीला प्रदक्षिणा व्हायची.जमिनीवर खाली बसून समोर एक पाय पसरून मधे जात घेऊन, जात्याच्या आवाजात घुमणारे, ओव्यांचे सूर कमी होत गेले. एका हाताने धान्य जात्यात भरत दुसऱ्या हाताने जात्याचा खुंटा ओढताना एक तान एक लय सापडायची….. आता दोन्ही हातानी गिरणीवर दळण टाकून परत आणणे यातच म्हणे हात गळ्यात येतात. आणि वर म्हणायचं काम सोप झालं.
गेले ते दिवस उरल्या त्या आठवणी. आता त्या आठवणी आठवणं देखील गुन्हा आहे.
विज्ञानाने ही सर्व यांत्रिक साधने दिल्यामुळे, आता काम सोपं झाल्याने, सर्व गृहिणी निश्चितच विज्ञानाचे आभार मानणार. आणि डाॅक्टरसुद्धा ! ( त्यांचे रूग्ण वाढले म्हणून! )
विज्ञान वापरावं. जरूर वापरावं, पण जर तेच आरोग्याच्या मुळावर येत असेल तर ! आमच्या बदलत्या पाश्चिमात्य वृत्तीमुळे शरीराच्या कमी होत असलेल्या हालचाली, बैठी जीवनशैली, हे प्रमेह, ह्रदयरोग, पीसीओडी, थायराॅईड सारख्या रोगाचे कारण आहे. हे विसरून जायचे का ?
पूर्वी दुचाकी गाडी सुरू करण्यासाठी एक तंगडी तरी झाडायला लागायची. आता एका बोटाने दुचाकी सुरू होतेय. तेवढे सुद्धा श्रम नाहीत. काम सोपे झाले.
पुरणपोळीसाठी लागणारे पुरण, पाटा आणि वरवंट्यावर वाटावे लागे, त्यासाठी उकीडवे बसावे लागे. पोट मांड्या यांना छान व्यायाम होत होता. मध्यंतरीच्या काळात पुरण यंत्र आले. पाटा वरवंटा मागे पडला, उकीडवी बैठक लुप्त झाली आणि फतकल मारून सुद्धा पुरण वाटले जाऊ लागले. आता आणखीनच सोपे झाले, पुरणपोळ्या “रेडीमेड” मिळतात. काम सोपे झाले.
सायकल चालवून आरोग्य मिळत होते, आता गाडीवरून जिममधे जाऊन तिथे सायकलच चालवावी लागते.
घरात सहजपणे मिळणारे आरोग्य शोधण्यासाठी घराबाहेर जावे लागत आहे.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
24.05.2017
Leave a Reply