आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 6
आवाहनानंतर आसन हा उपचार येतो. पाहुणे घरात आले की त्यांना जसे बसायला खुर्ची अथवा आसन देतो, तसे देवताना बसायला आसन कल्पिलेले आहे. घरात आलेला पाहुणा हा देवाप्रमाणे आहे, त्याची उठाबस देवाप्रमाणे व्हायला हवी.
आईवडिलांच्या सेवेत खंड पडू नये म्हणून, दारात उभ्या असलेल्या पांडुरंगाला, उभे राहाण्यासाठी वीट हे आसन म्हणून देणाऱ्या भक्त पुंडलिकाचे आम्ही वंशज आहोत. आणि आमचा पांडुरंग देखील हेच आसन घेऊन भक्तासाठी अठ्ठावीस युगे, त्या निस्सीम भक्ताची आठवण म्हणून, अजूनही तस्साच वीटेवरी उभा आहे.!
प्रवासाने दमल्यावर, रसक्षय झाल्यावर, घटकाभर का होईना तेवढीच विश्रांती घ्यावी, म्हणजे पुनः ताजेतवाने होऊन काम करता येते, हे सांगणारे हे आसन !
हे “आसन” विसरून कसे चालेल ?
आतिथ्य स्विकारल्यानंतर त्या पाहुण्यांना
खुशाली विचारावी, आरोग्य कसे आहे, काही पथ्यपाणी आहे का याची विचारपूस करावी. त्याच्या आरोग्याची काळजी देखील आपणच वहायला हवी.
यालाच अतिथी देवो भव संस्कृती म्हणतात.
नंतर हात पाय धुवायला पाणी द्यावे आणि सांगावे, “हात पाय धुवून घ्या !” सांगितल्याशिवाय समजणारच नाही. म्हणून हा उपचार. हल्ली सांगून देखील कोणी ऐकत नाही, हा भाग वेगळा !
बाहेरून जेव्हा घरात येतो, तेव्हा अनेक प्रकारचे जीवजंतु आपण आपल्या सोबत, आपल्याच अंगाखांद्यावरून, आपल्याच घरात, आणत असतो. हे जीवजंतु घराबाहेरच रहावेत, यासाठी खरंतर आंघोळ करूनच घरात यायला हवे, गुडघेस्नान तरी व्हावे. म्हणजे निदान हात पाय तरी धुवावेत, गेल्या वीस एक वर्षापूर्वी पर्यंत ही प्रथा, अनेक कर्मठ घरात सुरू होती. यासाठी घराच्या उंबरठ्याच्या बाहेरच्या बाजूला न्हाणीघर असायचे. पण बदलत्या काळाचा महिमा म्हणत, ऑर्थ्रोडाॅक्सचे लेबल लावीत, ही अत्यंत चांगली आरोग्यदायी प्रथा नष्ट होत चालली आहे. भारतीय संस्कृतीतील, या प्रथेमागील विज्ञान शोधून काढून ते पुढील पिढीला सांगणे योग्य नव्हे काय ? ( विज्ञान हा शब्द देखील संस्कृती रक्षकांनी वापरायचा नाही म्हणे, तो फक्त बुद्धिवादी लोकांनीच वापरायचा, असे काही नाही. )
चांगले शिकले सवरलेले बुद्धीवादी लोकच जर घरात बाहेरून येऊन, तसेच बूट घालून अगदी थेट स्वयंपाकघरापर्यंत वावरू लागले तर, आरोग्य तरी कसे घरात राहील ?
आंग्ल भाषेत एक म्हण आहे. “प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर.” म्हणजे सावध तो सुखी. रोग झाल्यावर उपचार शोधत बसण्यापेक्षा रोग होऊ नये म्हणून काळजी घेणे केव्हाही चांगलेच. पाय धुवून घरात यावे, म्हणजे अनेक रोगजंतुपासून आपला बचाव होतो, असे सांगितले तर कदाचित पटेल. यासाठीच अनेक देवालयामधे, गुरुद्वारांमधे प्रवेश करताना, पाय पाण्यात बुडवून जावे लागते.
“स्वस्थवृत्त” म्हणजे रोग होऊ नये म्हणून घ्यायची काळजी आणि “रोगनुत” म्हणजे रोग झाल्यावर करायचे उपचार, असे दोन मोठे भाग, आयुर्वेद शिकत असताना पुरेपुर अनुभवता आले, अभ्यासता आले.
हेल्थ मॅनेजमेंट इज फ्री अॅण्ड एन्जाॅएबल, बट डिसीज मॅनेजमेंट इज व्हेरी काॅस्टली अॅण्ड पेनफुल !
सैराट झाल्यापासून आंग्ल भाषेमधे सांगितले तर लवकर कळते.
खरं आहे ना ?
मग बाहेर नाचून घरात आल्यावर, फक्त एका तांब्याभर पाण्याने हातपाय धुणे हा देवपूजेतील उपचार स्वतःतल्या ईश्वराच्या आतिथ्यासाठी योग्य होणार नाही काय ?
चला, पुनः सुरवात तर करू !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
01.06.2017
Leave a Reply