आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्व-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 10
वस्त्र अर्पण केल्यावर यज्ञोपवित किंवा उपवस्त्र घालावे. यज्ञोपवित म्हणजे जानवे . आणि उपवस्त्र म्हणजे मुख्य वस्त्राला पूरक असलेले. सर्वसाधारणपणे खांद्यावरून खाली येणारे उपवस्त्र मानावे. जसे शाल, उपरणे, ओढणी, पदर ज्याने शरीराचा वरील भाग झाकला जाईल. वपु म्हणतात, त्याप्रमाणे बाईला साडी जेवढी भरजरी घ्यावी, तेवढा ब्लाऊजपीस हलक्या प्रतीचा घ्यावा, म्हणजे तो झाकण्यासाठी तरी खांद्यावरून अंगभरून पदर घेतला जातो.
देव देवतांना या वस्त्रांची गरजच काय , या तर निर्जीव मुर्ती ! यांना हे सर्व उपचार कशाला ? हीच तर खरी मेख आहे. जे जे देवासाठी ते ते देहासाठी, हेच तर शिकायचं आहे.
वस्त्रांबरोबर वेगवेगळे अलंकारदेखील घातले जातात. आता देवताना अलंकार प्रत्यक्ष घालण्याऐवजी अक्षताम् समर्पयामी… असे म्हणून खरंतर भागवलं जातं. पण देहासाठी भागवाभागवी नाही. खरं अलंकार घातले पाहिजेत.
सोने, चांदी, तांबे, पंचधातु इ. तसेच मोती, हिरा, प्रवाळ, पाचू, माणिक इ. रत्ने तसेच काच, स्फटीक यापासून बनविलेले दागिने परिधान करावेत. अंगठी, वाकी, कंठहार, बांगड्या, पाटल्या, बाजूबंद, कंबरपट्टा, बिलवर, नथ इ. सर्व अलंकार जसे स्त्रिया परिधान करतात, तसे पुरूष देखील गळ्यात वैजयंती किंवा मोत्याच्या माळा, छातीवर कवच, कानात कुंडले, हातामधे कडी, डोक्यावर मुकुट, असे अलंकार धारण करत असत.
या रत्नांचा शरीरावर प्रत्यक्ष परिणाम होत असतो. सूर्य चंद्र अनेक ग्रह यांच्यापासून येणारे किरण या रत्नांवर पडून त्वचेला स्पर्श केल्यावर रक्ताभिसरणावर थेट परिणाम होतो. म्हणून हातातील प्रत्येक बोटामधे वेगवेगळ्या रत्नांच्या अंगठ्या घालत असतात. प्रत्येक ग्रहाचा विशिष्ट रत्नांशी संबंध सांगितलेला आहे. तसेच विशिष्ट रत्नांचा शरीरातील वात पित्त कफ या तीन दोषांवर आणि सातही धातुंवर सूक्ष्म परिणाम होत असतो.
आजकाल तरूणांच्या हातात प्लॅस्टिकच्या बांगड्या, रबराची कडी, फ्रेंडशिपचे बेल्ट दिसतात, ज्याचे फायदे होण्यापेक्षा तोटेच जास्ती होताना दिसतात.
मला वाटलं म्हणून, मला आवडलं म्हणून, मी हे रत्न हातात घातले, असे करू नये. ग्रहशास्त्रानुसार जे योग्य असेल ते, त्या तज्ञांच्या सल्ल्यानुसार वापरावेत. नाहीतर त्रासही होऊ शकतो.
ज्याला इफेक्ट आहे, त्याला साईड इफेक्ट असणारच ना !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
04.06.2017
Leave a Reply