आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 13-पुष्प पहिले
तिलक लावल्यावर पुष्प देऊन स्वागत केले जाते. जसे व्यासपीठावरील पाहुण्यांचे, तसेच देवाचे पण !
यथा लाभोद्भव, कालोद्भव, सुगंधीत पुष्पं समर्पयामी । असं सांगून फुलं वाहिली जातात. “माझ्या शक्तीनुसार, ऋतुनुसार, जी काही शक्य होती ती सुगंधित फुले आणून, ती मी तुला वाहातो आहे, ती तू मान्य करून घे. आणि याच्या सुवासाने नेहेमी प्रसन्न रहा.”
हे कोणाला उद्देशून सांगायचं? ज्याने ही सुंदर सृष्टी निर्माण केली त्याला ? की, सृष्टीमधे फुलं निर्माण करणाऱ्याला ? की फुलांमधे सुगंध घालणाऱ्याला ? की एवढी किमया जो करू शकतो त्याला ? या सगळ्या उपचाराची आणि चार दोन फुलांची त्याला आवश्यकता असेल ? नक्कीच नाही. ही विनंती, प्रार्थना या सौंदर्याचा उपभोग घेणाऱ्यांसाठी आहे.
तुझेच तुजला अर्पण, हा भाव ठेवून हा पुष्पालंकार देवाला वहायचा.
विविधता म्हणजे काय हे ते या फुलांकडून समजून घ्यावे. त्यांचे रंग, सुवास, उमलण्याच्या वेळा, टिकून रहाण्याचे सामर्थ्य, पुनः नवनिर्मितीसाठी माता होऊन, फळात रूपांतरीत व्हायचं, सारंच अद्भुत !
हे सारं “तो” कोणासाठी करतोय ?
फक्त मानवासाठी करीत असेल तर जिथे मानव नाही, अशा ठिकाणी देखील फुले बहरत असतातच की ! पशु पक्ष्यांसाठी ? त्यांच्यासाठी पण नाही. कारण त्यांना तशी सौंदर्यदृष्टी नाही. काहीजण त्यातील फक्त मध घेतात, काहीजण पायाखाली तुडवून जातात.अत्यंत स्वार्थी आणि अरसिक !
मग ही अलौकिक पुष्प निर्मिती कोणासाठी ?
त्याच्या स्वतःसाठी !
त्याच्या स्वतःच्या आनंदासाठी !
कोणी पाहो अथवा न पाहो….
तिथे कुणी येवो वा न येवो…..
देवाच्या चरणावर जावो अथवा सरणावर..
झाडावरच झुरायचे की कुठेतरी दूर जात लहरायचे….
औषधे टिकवण्यासाठी आंबवून घ्यायचे की गजऱ्यात जावून बसायचे….
गंधाने ओथंबून जायचे की गंध दिला नाही म्हणून अबोलीच रहायचे ….
प्रेमिकेसाठी पलंगावर पहुडायचे की गणिकेसाठी मनगटात जायचे….
काट्यावर उमलायचे की पाण्यावर डुलायचे…
उन्हात तापत गुलकंद होऊन घ्यायचे,
की
पाण्यात पडून पाणी सुगंधीत करायचे…
फुल होऊन फुलांकडे पहायचे….
आणि
प्रत्येक क्षणाला त्याला स्मरायचे !
या साऱ्यावर फक्त त्याचाच अधिकार आहे. स्वतःला आनंद व्हावा, असं प्रत्येकालाच वाटतं, कारण प्रत्येकामधेच तो भरून राहिला आहे.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
06.06.2017
Leave a Reply