नवीन लेखन...

जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग अठ्ठावन्न

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा

जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 14-पुष्प दुसरे

देवाला वहाण्यासाठी आपल्या परसबागेत अनेक फुलझाडे लावली जातात. सर्वसाधारणपणे जास्वंद, गुलाब, मोगरा, जाई जुई सायली याची लागवड आपल्या परसदारी केली जाते.

काही जणांना आवड नसते, काहींना सवड नसते, वेळच नसतो म्हणून काहीना सगळा बगिचा फुलवता येत नाही. पण ज्यांच्या घरी एकही फुलझाड लावलेले नाही, वा कुंडीपण नाही, असे अगदी क्वचित ! तर काही निसर्गप्रेमींच्या घरी अख्ख जंगलच घरात आणलेलं असतं.

फुलांची आवड नाही, असं माणूस शोधणं दुर्मिळच. जागाच नाही, भाड्याच्या घरात रहातो, अशा घरात दरवाज्यावर का होईना पण फुलपुडी उगवतेच.

ज्यांचा देवावर विश्वास नाही, देवपूजा करतच नाहीत, त्यांच्याकडे सुद्धा फुले असतातच. म्हणजे फुले फक्त देवासाठीच असतात असे नाही. आपण युक्तीने त्यांचा वापर देहासाठी करून घ्यायचा असतो.
जे जे देवासाठी ते ते देहासाठी, हे वाक्य काहींसाठी उलट सुद्धा करता येतं. “जे जे देहासाठी ते ते देवासाठी.” मलाच कधीतरी ही फुले उपयोगी होतील म्हणून तरी ही फुले माझ्या घरी हवीत.

निसर्गातील कोणतेही फुल असो, ते औषधी गुणधर्माचे असतेच. पण डाॅक्टरना ते माहितीच नसतात, (त्यांच्या सिलॅबसमधेच नाही.) पण ज्याच्या अभ्यासक्रमात आहे, अशा वैद्यांना पण त्याचे सर्व औषधी उपयोग माहिती असतातच, असे नाहीत. थोडेफार जे माहिती असतात, त्या आधारे काही औषधे बनवली जातात. जसे भाज्या, दुध, फळे, कडधान्ये इ. साठी अख्खे अध्याय ग्रंथामधे लिहिलेले आहेत, तसे वेगळे स्वतंत्र प्रकरण फुलांसाठी लिहिलेले नाही.

आयुर्वेदात अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील अश्याच काही फुलांचे औषधी गुणधर्म वर्णन केले आहेत. जसे गुलाब, धातकी, केशर, नागकेशर, चाफा इ. म्हणजे बाकीची फुले औषध नाहीत, असे नाहीत, पण त्यांचे औषधी गुणधर्म अनुमानाने शोधावे लागतात. अनुभवातून जाणावे लागतात, किंवा फळांच्या गुणधर्मातून समजून घ्यावे लागतात. अशी अनेक फुले आपल्या अवतीभवती फुलत असतात, त्यांची नावे सुद्धा आम्हाला माहिती नाहीत, किंवा काही गुलमोहराची फुले एवढी अमाप फुलतात, कि त्यांचा कचराच होतो. काही फुले सिझनल असतात. काही फुले घोसांनी लगडतात, तर काही एकेकटीच बहरतात.तर काहींचा सडा पडतो. जणुकाही निसर्गाने जमिनीवर पांघरलेला गालिचाच.

काहींचा वास औषधी असतो,जसे जाईजुई. तर काहींचा मध जास्ती औषधी असतो जसे जांभूळ. काहींच्या पाकळ्या औषधी असतात,जसे गुलाब. तर काहींचे पुंकेसर औषधी असतात, जसे नागकेशर. तर काहींचे देठ औषधी असतात जसे पारीजातक. काहींच्या कळ्याच औषधी असतात,जसे लवंग. तर काहींचे पूर्ण उमललेले फुलच औषधी असते, जसे कमळ. म्हणजे फुलांचे वेगवेगळे अवयव कमी अधिक प्रमाणात औषधी गुणधर्म दाखवतातच.

काही फुले ऋतुनुसार फुलतात. काहीं केव्हाही उपलब्ध होतात. काही प्रदेशानुसार मिळतात, तर काही जमिनीवर तर काही पाण्यातच मिळतात. यानुसार त्यांचे औषधी गुणधर्म बदलतात.

पुण्यातील बीएस्सी झालेला, एक अवली रसायनतज्ञ या फुलांच्या प्रेमात पडला आणि या अज्ञात फुलांच्या बारसे करण्यापासून, औषधी गुणधर्म शोधून काढून त्यांच्या सेफ ह्युमन ट्रायल्स घेण्यापर्यंत, सगळा खटाटोप लिपीबद्ध केला. तब्बल 180 हून अधिक फुलांच्या औषधी गुणांचा चिकित्सेच्या दृष्टीने अभ्यास करणाऱ्या या बेहत्तर अवलीयाला “अरविंद जोशी,बीएस्सी, पुणे ” या नावाने आपण वाॅटसपप्रेमी ओळखतो. वय वर्षे फक्त बाहात्तर.

त्यांच्या फुलावरील प्रेमाला, फुलांनीही साथ दिली आणि फुले त्यांच्यावर प्रसन्न झाली. फुलातील मकरंद शोधण्याचा छंद सगळ्यांना लागो आणि सर्वजण अरविंद होवोत !

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
07.06.2017

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

1 Comment on जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग अठ्ठावन्न

  1. नमस्कार. आपले लेख नुसते माहितीपूर्णच नसतात, तर ते वाचायलाही रुचिपूर्ण असतात.
    माझी एक शंका — आपण आयुर्वेदाच्या संदर्भात ‘गुलाब’ हा उल्लेख केलेला आहे. गुलाब हा फारसीतील शब्द आहे. गुल म्हणजे फूल ; आणि आब म्हणजे पाणी. असा हा फारसी शब्द भारतात रुजला असावा तो इ.स. च्या ११व्या-१२ व्या शतकानंतरच. पण खरें तर तो मुघलांच्या काळीं रुजला असावा, म्हणजे १६व्या शतकात.
    याचा अर्थ असा की, (१) आयुर्वेदामध्ये मध्ययुगात गुलाबाच्या गुणधर्मांचा समावेशअ केला गेल ; किंवा ( २) गुलाबाला संस्कृत नांव अन्य कांहीं असणार, व तें नांव आधी वापरलें जात असावें.
    याचा खुलासा केलात, तर आभारी होईन.
    – सुभाष स. नाईक, मुंबई

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..