आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 16-पुष्प चौथे
जे जे देवासाठी ते ते देवासाठी या न्यायाने देवाला जी फुले वाहिली जातात, ती दुसऱ्या दिवशी तशीच टाकून देण्यापेक्षा औषधी म्हणून वापरली गेली तर ? आणि कोणाच्याही धार्मिक भावना न दुखावता, या निर्माल्याचे पूर्ण पावित्र्य जपून वापरवी गेली तर फुलांचे औषधी गुण पण मिळतील आणि दैवी गुण सुद्धा !
जी मंडळी भक्तीयुक्त अंतःकरणाने विचार करणारी असतील त्यांच्यासाठी, हा अभिषेक सुरू असताना जे मंत्र उच्चारले जातात, त्यातील स्पंदने किंवा केलेल्या संकल्पाची स्पंदने त्या पाण्यात उतरलेली असतात, आणि त्या पाण्याचे रूपांतर त्यांच्यासाठी तीर्थामधे झालेले असते.
आणि जी ज्ञानमार्गी बुद्धीवादी मंडळी असतील, त्यांनी पण हे लक्षात घ्यावे की,
ही फुले काही काळ देवतांच्या मूर्तींवर राहिल्यामुळे या फुलातील काही रस, काही औषधी द्रव्य या मूर्तीला चिकटलेले असेल, अभिषेक करत असतेवेळी वापरलेल्या पाणी किंवा दुधामुळे हे औषधी द्रव्य या जलामधे वा दुग्धामधे उतरलेले असते.
हीच फुले आपल्या आपल्या नेहेमीच्या आंघोळीच्या पाण्यात टाकली तर ? आपल्याला हे औषधी गुण संपूर्ण त्वचेमधून प्राप्त होऊ शकतात. आणि गोवर कांजिण्या येऊन गेल्यावर, आंघोळीच्या पाण्यात कडूनिंबाची पाने वगैरे औषधी घालून आंघोळ करायची आपली परंपरादेखील आहेच. ही फक्त आठवण करून देतो.
पिण्याच्या पाण्यात हीच फुले घातली तर ? हे शरीरच तीर्थक्षेत्र बनेल. आतून आणि बाहेरून! कोणत्याही प्रकारची फुले असेनात का, त्याचा सूक्ष्म अंश रोज आपल्या पोटात जाईल.
काही फुले गजरा करून माळण्यासाठीच असतात. आणि काही देवाला वाहण्यासाठीच असतात. आता जास्वंदच पाहाना, डोक्यात माळली जात नाही, पण गणेशपूजा या फुलाशिवाय पूर्ण होतच नाही. तर काही फुलांचा रंगीबेरंगी सडा पाहूनच मनाला आल्हाद मिळतो. असा पायदळी तुडवला जाणारा फुलांचा सडा वातावरणात काही विशिष्ट गंधद्रव्य सोडतो, जो त्या वातावरणासाठी निसर्गाला आवश्यक वाटत असतो. साथीचे रोग येऊ नयेत, आलेच तर सार्वजनिक स्वरूपातच चिकित्सा सुरू व्हावी, म्हणून तर त्याने असा औषधी सडा पसरवणारी फुलांची झाडे सर्वत्र निर्माण केली असतील का ? ( असा प्रश्न एखाद्या जोशीकाकांच्या मनात निर्माण होतो, आणि संशोधनाला चालना मिळते. )
देवपूजेसाठी काही फुले वापरली जात नाहीत, यामधे गुलमोहर, ताम्रशेंग, चिंच, नारळ, सुपारी, शेवगा, हादगा यासारख्या औषधी फुलांचा तीर्थ म्हणून युक्तीने वापर केला तर अत्यंत अल्प मूल्यामध्ये आपण काही गंभीर आजार देखील सहज दूर ठेऊ शकतो.
या फुलांचा अर्क काढून संरक्षित ठेवता येते, किंवा ज्यापद्धतीने गुलकंद केला जातो, त्याचपद्धतीने खडीसाखर वापरून कोणत्याही फुलांचा गुलकंद करता येतो. तो पुढे फुलांचा “सिझन” संपला की वापरता येतो.
झेंडू म्हणजे गोंड्यासारखे फुल जर असे तीर्थ करून ( म्हणजे एक कप पाण्यात एखाददुसरे फुल ठेवून दुसरे दिवशी हे फुलांचा अर्क उतरलेले हे औषधी सुगंधीत पाणी ) आताच्या पावसात रोज वापरले गेले तर डाॅक्टरांचा नेहेमी पावसाळ्यात येणारा सर्दी ताप खोकला याचा “सिझन” मात्र लवकर संपतो.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
09.06.2017
Leave a Reply