आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 24-दीपं दर्शयामी-भाग एक
जो स्वतःच दीपक आहे, त्यालाच दिवा दाखवायचा ? जो दुसऱ्यांना योग्य मार्गाने नेतो, त्यालाच दिवा दाखवायचा ? जो मार्गदर्शक आहे, त्यालाच मार्ग सांगण्या सारखे आहे. मग देवाला दिवा का दाखवायचा ?
सातच्या आत घरात नावाचा मराठी चित्रपट येऊन गेला, त्यात एक सुंदर संवाद आहे. ” आमच्याकडे कापसाची शेतं लावली आहेत, आणि घरात तेल जास्ती झालंय म्हणून नाही दिवा लावत आपण. तर जे अनाकलनीय आहे, ते तुझ्या दिव्यत्वाच्या प्रकाशानं उजळून जाऊ दे ! अज्ञानाचा जो अंधःकार आमच्या मनात आहे, तो तुझ्या प्रकाशाने निघून जाऊ दे, अशी प्रार्थना असते दिव्याकडे ! ”
आपल्याकडे अजून तरी देवघर नावाचा, कोनाडा का होईना, शिल्लक असलेल्या जागेत थोडी जागा राखीव ठेवलेली असते. त्यात रात्री मधेच उठल्यानंतर आपल्याला दिसावे, म्हणून देवाच्या डोक्यावर एक दिवा टांगून ठेवलेला असतो. इलेक्ट्रीक झिरोचा किंवा आता एलईडीचा ! न जाणो रात्री देव आलाच तर ? म्हणून म्हणायचं दिवा लावला देवापाशी……
जे जे देवासाठी ते ते देहासाठी, असा विषय आपण बघत असल्याने या दिव्याचा देहरक्षणासाठी काय उपयोग आहे ? बरं हे इलेक्ट्रीकचे दिवे आत्ताचे ! त्यापूर्वी काय होते ? तेलाचे दिवे आणि तूपाचे निरांजन. काय एवढा फरक आहे इलेक्ट्रीकच्या दिव्यात आणि तेल तूपाच्या दिव्यात ?
आता हेच पहा ना, रस्त्यावर रात्रभर जळणारे जे हायमास्क दिवे आहेत, त्यावर किती छोटे छोटे किटक पिंगा घालत असतात ? पिंगाच तो. नुसते गोल गोल फिरत राहायचे. काम काही नाही. फायदा शून्य.
या किटकांना प्रकाशाचे प्रचंड आकर्षण असते. जिथे प्रकाश दिसेल तिथे अक्षरशः झडप घालतात. झोकून देतात. हा निसर्गाचा नियम आहे. पतंगाला ओढ प्रकाशाची. हे छोटे छोटे किटक घरात आले तर नुसता उच्छाद असतो. डोक्यात, कानात, डोळ्यात, नाकात, टीव्ही च्या स्क्रीनवर, ट्यूबलाईटवर, बेडवर, पिण्याच्या पाण्यात, आमटी भाजीत, जेवणाच्या ताटातसुद्धा ! काही केल्या जात नाहीत. आला असेल अनुभव प्रत्येकाला कधी ना कधीतरी ! ह. हेच तर मला सांगायचंय. हे किटक या दिव्यांवर मस्त खेळत असतात. आणि आपल्याला छान खेळवत असतात.
या किटकांचा त्रास घालवण्यासाठी एक जालीम उपाय आहे. देवापुढे दिवा लावणे. हा दिवा इलेक्ट्रीकचा नको. तेलाचा किंवा तुपाचा हवा. काय होईल ? या दिव्याच्या पेटत्या ज्योतीकडे हे क्षुद्र किटक आकर्षित होतात. आणि या ज्योतीत जळून जातात. चक्क मरतात. हा निसर्ग आहे. किटक मरणे ही चांगली गोष्ट झाली ना. नाहीतर त्यांचा बल्बवर चाललेला पिंगा बघत रहाण्या पलीकडे आपण काही करू शकत नाही.
जे आपण करू शकत नाही, ते छोटी पेटती पणती करते. उपद्रवी किटकांना मारते. कायमचे !
जसे हे काही उपद्रवी किटक डोळ्यांना दिसतात, तसे काही सूक्ष्म जीवही असतात, जे डोळ्यांनाही दिसत नाहीत, ते सूक्ष्म जीव देखील या पेणत्या पणतीच्या ज्योतीवर जणुकाही आत्महत्याच करतात. काम तमाम ! वातावरण शुद्ध ! निर्जंतुक !
दिवा देवासाठी, आरोग्य आपल्यासाठी !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
17.06.2017
Leave a Reply