आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 28-नैवेद्यम् समर्पयामी-भाग दोन
देवाला नैवेद्य दाखवणे हा पूर्ण भक्तीयोग आहे. त्यातील विज्ञान योग कोणता ते पाहू.
गणपतीचा नैवेद्य ठरलेला. मोदक.
मोदकच का ?
गणेशांना आवडतो म्हणून !
का आवडतो ?
गणेश हा बुद्धीदाता आहे. आणि मोदकातील पुरण म्हणजे गुळ खोबरे आणि वर तूप हे काॅम्बिनेशन म्हणजे साक्षात बुद्धिवर्धक योग आहे. बूस्ट बोर्नव्हीटा, माल्टोव्हा, काॅम्प्लान इ. म्हणजे फक्त टीनचे डब्बे. बाकी त्यात सोयाबीनची टरफले, नारळाची भुशी आणि शेंगदाण्याचा चोथाच असतो. जर्रा जाहीरात दाखवायची खोटी, पडले तुटून त्या डब्यावर. हे जाहिरात तंत्र या कंपन्यांना बरोब्बर माहिती आहे, त्यामुळे जाहिरातींचा मारा करून, सचीन, कपील इ. ब्रॅण्डचा वापर केला की, आपले प्राॅडक्ट खपते. चोथा खाऊनच जर वजन वाढणार असेल तर मग असली नारळ आणि शेंगदाणेच का नकोत ? नारळ आणि शेंगदाणे खाऊन तब्येत सुधारत होती. घरच्या घरी बारा बारा बाळंतपणे होत होती. टाॅनिक म्हणून काय होते ? गुळ आणि शेंगदाणे. नारळ आणि गुळ. जो आपल्याकडे नैवेद्य म्हणून दाखवला जात होता आणि आमच्याच घरातील बाल हनुमान आणि बाल गणेशांना प्रसाद म्हणून मिळत होता. भक्तीपूर्ण नैवेद्याला, कोलेस्टेरॉलच्या भीतीने बदनाम केले गेले आणि जाणीवपूर्वक आरोग्याचा व्यापार सुरू झाला.
देवीला पुरणाचाच नैवेद्य लागतो.
पुरण म्हणजे चणे. हरभरे डाळ शिजवून गुळ घालून केलेले मनगणे असो वा कडबू असोत, पुरणाची पोळी असो वा नुसते पुरण असो, आणि या सर्व नाजूक नैवेद्यावर साजूक तूपाची धार…… फक्त ताकद वाढत होती. वेगळ्या टाॅनिकची गरज नव्हती. घोड्याला काय खाद्य दिले जाते ? हरभरेच ना ? घोड्यासारखी गती आणि वाजीकर शक्ती मिळवण्यासाठी तसेच तेच खाद्य आपल्याला मिळण्याची व्यवस्था आपल्या देवांच्या नैवेद्यामधून केलेली होती. गॅस वाढतो, पित्त वाढते, जाडी वाढते म्हणून जेवणातून चणाडाळच हद्दपार केली आणि प्रोटीन पावडरचे डब्बे मात्र जिममधे खपवले जाऊ लागले. हे कधी लक्षातच आले नाही.
नागपंचमीला नागोबाला लाह्या, हळदीच्या पानात लपेटलेल्या पातोळ्या, पानगे, गोकुळाष्टमीला शेवग्याच्या पाल्याची भाजी, कोजागिरीला आटीव दूध, गुढीला श्रीखंड, हे नैवेद्य आरोग्य रक्षण करणारेच होते. नारळीपौर्णिमेला नारळीभात ठरलेलाच. नारळावरूनच ओळखली जाणारी ही पौर्णिमा!
वेगवेगळ्या ऋतुमधे येणारे वेगवेगळे सण, आणि या निमित्ताने होणारे नैवेद्य हे जणु काही आरोग्याचे बूस्टर डोसच होते. दरवर्षी नियमाने घ्यायचे आणि आरोग्य सांभाळायचे !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
21.06.2017
Leave a Reply