आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 30
नैवेद्यम् समर्पयामी-भाग चार
आपल्याकडे पाहुणे येणार आहेत. त्याच्यासाठी मस्त स्वयंपाक तयार केलेला आहे. पाने घेऊन ठेवलेली आहेत. पण पाहुणेच आलेले नाहीत, तर पाने उगाच वाढून ठेवायची काय ?
देवाच्या पूजेची सर्व आरास तयार झालेली आहे. पूजेला दाखवायचा नैवेद्य तयार आहे. सर्व पूजा साहित्य तयार आहे. यजमान तयार आहेत, पण देवाची प्रतिष्ठापना जर झाली नसेल तर नैवेद्य दाखवून घ्यायचा का ? आणि मखरात देवच नसेल तर नैवेद्य दाखवायचा तरी कुणाला ?
नैवेद्य कधी दाखवायचा ?
देव आला असेल तर.
अहं वैश्वानरो भूत्वां प्राणीनाम् देहमाश्रितम, म्हणजे पोटातील भूक, वैश्वानर, जाठराग्नी, तो मीच, असं प्रत्यक्ष भगवंत सांगताहेत. याचाच अर्थ असा की, पोटात देव उपस्थित झाल्याशिवाय त्याला नैवेद्य दाखवायचा काय ?
सरळ सरळ सांगायचे तर, भूक लागल्याशिवाय अजिबात जेवू नये. देव प्रकट झाल्याशिवाय नैवेद्य तरी कोणाला दाखवायचा ना ? पाहुणे आल्याशिवाय वाढायचे तरी कोणाला ?
नैवेद्याचे हे साधे सोपे सूत्र लक्षात ठेवले तरी बास आहे. ज्याला जसे समजून घ्यायचं असेल तसं समजून घ्यावे समजून घ्यायचंच नसेल तर सोडून द्यावे. इथे फुकटचा निरर्थक वाद घालायला वेळ आहे कोणाला ?
देवाला समजून घेण्यासाठी मुळात एक वेगळी दृष्टी, काही वेगळी समज असली पाहिजे. देव का सांगितला गेलाय, देव कुठे असतो, तो कुणाला दिसलाय का ? सगुण रूपातला देव समजला की नंतर निर्गुणातला समजून घ्यायचा असतो. सगुण निर्गुण एकु गोविंदु रे, असं माऊली म्हणतात. पण सगुण समजून घेतला की नंतर निर्गुण समजणे सोपे होते.
काही गोष्टीमधे आपल्याला “क्ष” गृहीत धरावा लागतो, ते उत्तर मिळेपर्यंत. ते उत्तर एकदा मिळाले की नंतर हा गृहीत धरलेला “क्ष” विसरून जायचा असतो. हा ” क्ष” म्हणजेच आमचा देव.
ज्यांना अभ्यास करायचा आहे, त्यांनी कोणत्याही मार्गाने शिकावे. सगुण रूपात भक्ती योगाने जाणून घ्यावा, ज्यांना कर्मयोगाने समजून घ्यायचा असेल तर तसा समजून घ्यावा. ज्यांना ज्ञानमार्गाने जाणून घ्यायचा असेल तर तसा निर्गुण रूपातील अभ्यासावा. पण कुत्सित बुद्वीने देव म्हणजे बुवाबाजी, देव मानणे म्हणजे समाजाला काही वर्षे मागे नेणे असले आरोप करून केवळ शाब्दीक बुडबुडे काढणे म्हणजे शक्तीचा अपव्यय आहे.
देवपूजा वगैरे सगळं बामनाचं काम. त्यांनी समद्या जन्तेला फशीवलंय. येड्या देवाच्या नादी लावलंय, समाजाला मागे नेण्याचं काम केलंय, वगैरे ज्यांना बोलायचं असेल ते खुशाल बोलू द्यावे. देव ही संकल्पना समजून घेण्यासाठी तशी शुद्ध वैज्ञानिक बुद्धी हवी, ते येरागबाळ्याचे काम नव्हे. आज कोणीही उठतो, देवाची निंदा नालस्ती करतो.
देवाला नैवेद्य अर्पण करायचा तेव्हा मनात भाव असा हवा की मी जणुकाही सगुणरूपातील देवाला घास भरवतो आहे. भाव जर नामदेवांचा असेल तर देव जेवल्याशिवाय राहात नाही, ही उच्चकोटीची भक्ती आहे. ही तळमळ, तो भाव आपण निर्माण करू शकत नाही, म्हणून देव आपल्या हातून जेवत नाही. भाव तसा देव असतो, हे समजून घ्यायचे असते. बुद्धिवादी नास्तिक लोकांना ही भक्ती म्हणजे बुवाबाजी वाटते. ढोंग वाटते. आणि मनात विकल्प येतात. चार दोन बड्या लोकांनी देवाला नावे ठेवली, त्यांचे आपण अनुयायी आहोत, समाजसुधारक आहोत, असे वाटणे हा निव्वळ भ्रम आहे.
जर विज्ञानाचा तिसरा डोळा उघडला तर भक्तीमागील कर्मयोग आणि ज्ञानयोग दोन्ही दिसू लागतील.आणि त्यामागे लपलेले आरोग्य सूर्याप्रमाणे स्पष्ट दिसू लागेल.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
23.06.2017
Leave a Reply