आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे- क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 33
नैवेद्यम् समर्पयामी-भाग सात
मुळातच चंचल असलेला वात वाढू नये, यासाठी आधीच वाताला शांत करून घ्यायचे. विरोधकांना कसे चहापानाला बोलावतात तसे ! यासाठी त्या प्रत्येकाचे नाव घेऊन पुकारा करायचा..
प्राणाय स्वाहा
अपानाय स्वाहा
व्यानाय स्वाहा
उदानाय स्वाहा
समानाय स्वाहा
ब्रह्मणे स्वाहा
अन्न गिळण्याचे काम करणारा वात म्हणजे प्राण, ढेकर काढून पोचपावती देणारा वात म्हणजे उदान, अन्नाला आतमध्ये नेऊन मिक्सरमध्ये फिरवणारा, अग्निला प्रज्वलीत करणारा तो समान, अन्नाला पुढे पुढे ढकलत नेणारा अपान आणि तयार पोषकांशाचे रक्तात रूपांतर झाल्यावर ही उर्जा, ह्रदयामार्फत सर्व शरीरात आत बाहेर फिरवणारा तो व्यान. असे हे पाच भाऊ, भांडण न करता, नेमून दिलेले काम चोख बजावत असतात. पित्त आणि कफ हे दोघेही पंगु. स्वतःची गती नाही. वात येऊन ढकलणार, तेव्हा या पित्त आणि कफाचे काम पूर्ण होणार. म्हणून पित्त कफापेक्षा व्रात्य वाताला जिंकण्यासाठी या आहुत्या फक्त वातालाच !
सर्व सामर्थ्यवान ब्रह्मरूप असलेल्या वाताला माझा नमस्कार असो. मी सेवन करीत असलेल्या भोज्य चोष्य लेह्य पेय अशा चारही प्रकारचे अन्नाचे पचन नीट होवो. आणि त्यापासून ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये मन, शरीरातील आणि बाहेरील सर्व अवयव यांचे उत्तम प्रकारे पोषण होवो, या सेवन करीत असलेल्या आहाराने, मला माझे धर्म अर्थ काम आणि मोक्ष प्राप्त करणे, या पुरूषार्थाच्या प्राप्तीसाठी उत्तम बुद्धि आणि शारीर मानस आणि आध्यात्मिक शक्ती प्राप्त होवो, अशी प्रार्थना या पाच प्रकारच्या वातांकडे करावी.
असे म्हणून वाढलेल्या पानाभोवती पाणी फिरवायचे हे झाले कर्मकांड.
आता देवाला सांगायचे,
“हं, करा सुरवात ! होऊ दे सावकाश !”
तो आपल्या हाताने स्वतःच कुठला जेवतोय.?
मग आपण मानसभावाने त्याला एकेक घास भरवायचा. जणुकाही समोर देव बसलेलाच आहे, तसा भाव ठेवीत भरवावे. बाळ नीट पोटभर जेवला म्हणजे स्वतः न जेवता आईचे पोट भरते तसे आहे. मध्ये मध्ये थोडावेळ थांबावे. त्याला घास चावायला गिळायला वेळ द्यावा. बकाबक, घाईघाईने जेवणाऱ्या (गिळणाऱ्या) मंडळींना ह्रदयरोग होतात, असेही वाचनात आले आहे.
जेवण म्हणजे “जाणिजे यज्ञकर्म ” असं समर्थ रामदास स्वामी देखील सांगत आहेत. जो यज्ञ असतो, त्यात आहुती घालताना देखील सावकाश अर्पण करायची असते. नाहीतर अग्निच्या ज्वाला तयार न होता, नुसता धुरच होईल. ऐसे न व्हावे.
तोंडात घेतलेला घास आपण किती वेळ इकडे तिकडे फिरवतो, यावर आज थोडे लक्ष द्यावे. सर्वसाधारणपणे पंधरा ते वीस वेळा, अगदीच डोक्यावरून पाणी म्हणजे पंचवीस वेळा आपण घास चावतो. आणखी फक्त पाच सात वेळा जास्ती चावावा, म्हणजे घास बत्तीस वेळा सावकाश चावायचा, दात बत्तिस असतात, प्रत्येक दाताला त्याचे काम द्यावे म्हणजे पचन व्यवस्थित होते. अर्धे पचन तोंडातच करून घेतले की पोटातील पुढील अवयवांवरचा ताण आपोआपच कमी होतो.
सर्व काही चालले आहे ते पोट भरण्यासाठीच ना. मग तिथे घाई कशाला ? घाई घाईने जेवून पोट बिघडवून घ्यायचे आणि जास्त काम करून मिळवलेले पैसै तब्येत ठीक होण्यासाठी परत डाॅक्टरना देऊन टाकायचे ? म्हणजे पैसे कोणासाठी मिळवायचे ?
या निमित्ताने याचा पुनः एकदा विचार करावा लागेल.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
26.06.2017
Leave a Reply