रिलीफ छपाईत आणखी एका छपाई यंत्राचा समावेश होतो. तो म्हणजे फ्लेक्सो.
पान किंवा इतर प्रतिमा एका विशिष्ट रबरावर घेऊन ब्लॉकप्रमाणे नायट्रिक अॅसिडची प्रक्रिया केली जाते. हे रबर शीट सिलेंडरभोवती गुंडाळून लेटर प्रेसपद्धतीने छपाई केली जाते. ज्याचे पुनर्मुद्रण करायचे आहे अशा प्रकारची छपाई या पद्धतीने होते.
लिथोग्राफीचा शोध योगायोगाने लागला. हा शब्द दोन ग्रीक शब्दांचा मिळून बनला आहे, लिथोस (दगड) व ग्राफीन (लिहिणे) यापासून तो तयार झाला. याचे मुख्य तत्त्व म्हणजे चुनखडी व ग्रीस यात नैसर्गिक आकर्षण असते. त्यांच्या संयोगातून मागरिट ओलिओ ऑफ लाइम तयार होतो. हा पदार्थ पाण्याला दूर फेकतो. पाण्यात विरघळत नाही व टिकाऊ असतो.
जर्मनीत केल्व्हेइम गावात सेनिफेल्डर हा तरूण संगीताच्या स्वरलिपीत गाण्याच्या ओळी लिहून विक्री करीत असे. तांब्याच्या पत्र्यावर अक्षरे खोदून त्यावरून छपाई करीत असे. हे काम त्रासदायक होते. सेनिफेल्डरच्या घराजवळील दगडांच्या खाणीत अतीशुद्ध म्हणजे ९८ टक्के चुनखडीयुक्त दगड मिळत असे. हा दगड कठीण, सच्छिद्र, घट्ट विणीचा (क्लोज्ड ग्रेन्स) असे. त्याला पाणी लावल्यास ओलसरपणा बराच काळ टिकत असे.
एकदा सेनिफेल्डरच्या आईने त्याला काही हिशेब लिहायला सांगितले. हाताशी पेन व कागद नसल्याने तेथल्या एका दगडावर साबणासारख्या वस्तुने त्याने ते खरवडले. नंतर ते पुसताना त्याला वाटले की त्यावर नायट्रिक अॅसिड टाकले तर बाजुचा कोरा भाग त्यात विरघळला जाईल. त्याने नंतर एका तेलकट कागदावर ग्रीसयुक्त खडूने सुलट लिहून तो कागद दगडावर दाबला. दगडावर आलेला ठसा व कोरा भाग याला थोडेसे ओलसर केले. एक ग्रीसयुक्त शाई रबर रोलरवर फिरवून त्यावर लावली. कोऱ्या भागाने फक्त पाणी घेतले तर प्रतिमेने शाई घेतली. त्यावरून साध्या कागदावर सुबक छपाई आली. यावरून एक यंत्रही त्याने बनविले व त्याचे जागतिक पेटंट घेतले. ही घटना १७९६ सालातली होती.
Leave a Reply