फळातील गराच्या रंगावरून प्रामुख्याने सफेद पेरू व गुलाबी पेरू अशा दोन जाती दिसून येतात. महाराष्ट्रात सरदार या जातीची लागवड मोठ्या प्रमाणावर झालेली दिसून येते. या जातीची फळे आकाराने मोठी व गोलसर असून बियांची संख्या कमी असते. फळातील गर चवीस गोड असून तो पांढऱ्या रंगाचा असतो.
या फळामध्ये ‘क’ जीवनसत्त्वाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असते. हे फळ अत्यंत नाशवंत असल्याने दूरच्या बाजारपेठेसाठी पाठवता येत नाही. त्यामुळे त्यापासून प्रक्रिया पदार्थ तयार करणे फायदेशीर असते.
पेरूपासून रस तयार करण्यासाठी थोडेसे पिवळसर रंगाचे पेरू वापरतात. त्याचा लगदा करून, तो गाळून, त्यात पेक्टीन एन्झाइम मिसळून गरम करतात. थंड झाल्यावर रस वेगळा करतात.
पेरूच्या रसात सायट्रिक आम्ल व पाणी टाकून मिश्रण गरम करतात व त्यात सोडियम बेन्झोएट मिसळून सरबत बनवतात. पेरूच्या रसापासून बनवलेले काबोंनेटेड शीतपेय फार स्वादिष्ट असते. यासाठी पेरूच्या रसात साखर, सायट्रिक आम्ल, टीएसएस, केएमएस टाकून सिरप तयार करतात व त्यात कार्बन डायॉक्साइड वायू भरतात.
कच्च्या पेरूपासून जेली तयार करता येते. आंब्यापासून जसा आम्रखंड तयार करतात, तसा पेरूच्या गरात चक्का, साखर व पिवळा रंग मिसळून पेरूखंड तयार करता येतो.
पेरूच्या फोडी हवाबंद डब्यात कित्येक महिने साठवता येतात. त्यासाठी पक्व पेरूच्या साल व बियांविरहित फोडी मिठाच्या द्रावणात थोडा वेळ ठेवून त्यात साखरेचा पाक टाकतात. या मिश्रणाची बरणी गरम पाण्यात ठेबून पाश्चरायझेशन करतात.
पेरूचा गर, साखर, मक्याचे पीठ, वनस्पती तूप हे मिश्रण शिजवून त्यात मीठ, सायट्रिक आम्ल टाकतात. पुन्हा शिजवून गरम मिश्रण परातीत पसरतात व तुकडे करतात. तयार झालेली ही पेरूची टॉफी म्हणजे लहान मुलांना चॉकलेटच्या रूपात फळांचे सेवन करण्याची गोडी लावण्याचा उत्तम मार्ग.
बिया काढलेल्या पेरूच्या फोडी मिठाच्या द्रावणात ठेवून व सुकवून पावडर तयार करतात. रसापासूनही पावडर बनवता येते.
— डॉ विष्णू गरंडे ( कोल्हापूर)
मराठी विज्ञान परिषद, मुंबई
Leave a Reply