विश्वास सरपोतदार यांचा जन्म २९ डिसेंबर १९३२ रोजी झाला.
विश्वास सरपोतदार तथा बाळासाहेब सरपोतदार यांनी यशस्वी निर्माता व वितरक म्हणून नावलौकिक मिळवला होता. मूकपटापासून चित्रपटसृष्टीत वावरलेले लेखक दिग्दर्शक नानासाहेब सरपोतदार यांचे चिरंजीव विश्वास सरपोतदार यांनी मराठी चित्रपट प्रतिकूल परिस्थितीत असतानाही आपल्या वडिलांचा चित्रपटाचा वारसा पुढे नेला. पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयामधून बी. कॉम. झाल्यावर विश्वास सरपोतदार यांनी व्यवसायासाठी मराठी चित्रपट हेच क्षेत्र निवडले.
प्रथम त्यांनी पुण्याच्या अलका टॉकीजमध्ये रविवारी सकाळी इंग्रजी चित्रपटांचे खेळ (मॉर्निंग शो) लावायला सुरुवात केली. नंतर पुण्यातील दैनिकांत चित्रपटाच्या जाहिराती देण्यासाठी स्वतःची जाहिरात संस्था सुरु केली. त्याचबरोबर ‘अजय फिल्म डिस्ट्रिब्युटर’ ही वितरण संस्था काढून मराठी चित्रपटांचे वितरण सुरु केले. त्यासाठी सारा महाराष्ट्र फिरून त्यांनी चित्रपटगृहांचा अभ्यास केला.
वितरणात कौशल्य मिळविल्यावर त्यांनी चित्रपट निर्मिती सुरु केली. पण स्वतःच्या बॅनर ऐवजी त्यांनी ‘अवघाची संसार’, ‘रंगपंचमी’ इ. चित्रपटात सूत्रधार राहून निर्मितीतले खाचखळगे समजावून घेतले. व नंतर त्यांनी ‘पाहुणी’, ‘हीच खरी दौलत’, ‘कुलस्वामिनी अंबाबाई’ इ. चित्रपट निर्माण केले. त्यांनी मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष म्हणूनही काम केले.
विश्वास सरपोतदार यांचे १३ एप्रिल २००० रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply