संगीततज्ञ गुरुवर्य प्रा.मा.बा. र. देवधर यांचा जन्म ११ सप्टेंबर १९०१ रोजी झाला.
गुरुवर्य देवधर मास्तर ह्यांचे प्राथमिक शिक्षण मिरज येथे आणि त्या नंतरचे शालेय शिक्षण गिरगाव मुंबई येथील आर्यन एज्युकेशन ह्या शाळेत झाले . तदनंतर महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या विल्सन कॉलेज मध्ये इतिहास आणि अर्थशास्त्र ह्या विषयांमध्ये झाले .
वयाच्या नवव्या वर्षापासूनच त्यांनी पं निळकंठबुवा जंगम ह्यांच्याकडे संगीत शिक्षण घेण्यास प्रारंभ केला. त्यानंतर सन १९१८ पासून त्यांनी गायनाचार्य पं विष्णू दिगम्बर पलुस्कर ह्यांच्याकडे संगीत शिक्षण घेण्यास प्रारंभ केला . पं विष्णू दिगम्बर पलुस्कर ह्यांनी हिंदुस्थानी संगीताच्या प्रचार प्रसाराचे कार्य हाती घेतले होते आणि त्या कामी त्यांचे शिष्य सुद्धा त्यांना मदत करत होते. परंतु पु ल देशपांडे म्हणाले ते अगदी खरे होते …. ते म्हणाले होते की पं पलुस्कर ह्यांना जे कार्य अपेक्षित होते ते खऱ्या अर्थाने देवधर मास्तरांनीच केले … ह्या कार्याचा एक भाग म्हणून गुरूच्या आज्ञेवरून १९२५ साली संगीत विद्यालयाची स्थापना केली. देवधर्स स्कूल ऑफ इंडियन म्युझिकची हि वस्तू आजही ऑपेरा हाऊसच्या कोपऱ्यावर अस्तित्वात आहे आणि संगीत शिक्षण देण्याचं कार्य आजही ह्या वास्तू मध्ये चालू आहे.
देवधर मास्तर हे त्या काळात सुशिक्षित आणि आधुनिक विचारसरणीचे मानले जायचे. त्यांचा पेहेरावसुद्धा सूट बूट आणि टाय असाच असायचा त्यामुळे त्यांना सुटाबुटातले गवई असे गमतीने म्हटले जायचे. अनेक घराण्यांच्या बंदिशींचा संग्रह करून त्यातील व्याकरण दुरुस्त करून त्यांची योग्य अशी संहिता बनवण्याचे काम केले. हे करत असताना त्यांना पाश्चात्य संगीताचे अजिबात वावडे नव्हते … जवळ जवळ ५ वर्षे त्यांनी प्रो. स्क्रीन्झी ह्यांच्याकडे त्यांनी पाश्चात्य संगीताचे धडे घेतले. त्या नंतर वयाच्या साठीला आल्यावर त्यांनी अमेरिकेत काही वर्षे राहून प्रो. इंगम ह्यांच्याकडून आवाज साधना शास्त्राचे धडे घेतले…. भारतातील आवाज साधना शास्त्र किंवा व्हॉइस कल्चर चे ते आद्य प्रणेते आहेत …. त्यांनी सिनेमाला संगीत देण्याचे कार्यही केले … किंबहुना भारतीय चित्रपट सृष्टीचे ते पहिले संगीतकार आहेत. आशियाई तसेच युरोपिअन देशातील विश्वव संगीत संमेलनासाठी त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. बनारस आणि वनस्थळी विश्ववं विद्यालयात कला विभागाचे अधिष्ठाता पद भूषविले. मुंबई विश्ववं विद्यालयात संगीत विभागाच्या स्थापनेत त्यांचा मोठा वाटा होता.
गांधर्व महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमानुसार त्यांनी रागबोध नावाचे ६ भाग प्रकाशित केले … गायनाचार्य पं विष्णू दिगम्बर पलुस्कर ह्यांचे चरित्र तसेच थोर संगीतकार आणि थोर संगीतकारांची परंपरा ह्या तीन पुस्तकांचे लिखाणही केले. त्यांच्या ह्या पुस्तकांना महाराष्ट्र सरकारचे पुरस्कारही मिळाले. संगीत नाटक अकादमीची फेलोशिप , भारत सरकारद्वारे पद्मश्री आणि मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार हे मन सन्मान त्यांना मिळाले .
अजून एक त्यांची विशेष ओळख म्हणजे पं कुमार गंधर्व ह्या महान गायकाचे ते गुरु …जवळ जवळ १२ वर्ष आपल्या जवळ ठेवून त्यांनी आपल्या ह्या शिष्याला घडवले.
प्रा. बा. र. देवधर यांचे १० मार्च १९९० रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ.मा.संगीता गोगटे
Leave a Reply