प्रा. दत्तात्रेय बाळकृष्ण लिमये (१८८७-१९७१) यांनी १९११ साली पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात अभ्यास करून मुंबई विद्यापीठातून रसायनशास्त्रात प्रथम वर्गात प्रथम क्रमांकाने एमए केले. त्यामुळे मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात त्यांना प्राचार्य शार्प यांनी प्राध्यापक पद देऊ केले होते. पण इंग्रज सरकारची नोकरी न स्वीकारण्याच्या त्या काळात त्यांनी ती नोकरी न स्वीकारता पुण्याला नव्याने निघालेल्या रानडे इंडस्ट्रियल अॅण्ड इकनॉमिक इन्स्टिट्यूटमध्ये नोकरी पत्करली. येथे खनिजांचे पृथक्करण, सिमेंटची परीक्षणे होत. महाराष्ट्रभर फिरून तरखंड वनस्पती गोळा करून त्यापासून त्यांनी कातडी कमवण्यासाठी लागणारे टॅनिन बनवून दिले. करंजाच्या तेलामधून त्यांनी करंजिन हा स्फटिकी पदार्थ मिळवला. फांगळा वनस्पतीवर संशोधन करून त्यातून त्यांनी कापरासारखा पदार्थ शोधून काढला. फ्लॅव्होनॉइड या वर्गात येणाऱ्या पदार्थांचे संशोधन त्यांनी केले. त्यांच्या हाताखाली एकावन्न विद्यार्थ्यांना संशोधन करून एम.एस्सी. आणि चौघांना पीएच.डी. पदव्या मिळाल्या. त्यांनी फ्यूरोकुमारिन या रसायनाचे सिंथेसिस केले, ते नोबेल पारितोषिक विजेते प्रा. पाउल कारर यांनाही जमले नव्हते. पुढे त्यावरचा त्यांचा निबंध ‘बेरिष्टे’ या पत्रिकेत प्रसिद्ध झाला. त्यांनी एकूण ६२ निबंध लिहिले.
‘रसायनम’ नावाचे एक नियतकालिक त्यांनी सुरू केले होते आणि त्यात संशोधन निबंध छापून येत. प्रा. द. बा. लिमये यांनी १९०८ साली खाजगीरीत्या सुरू केलेल्या बाळकृष्ण रसायनशाळेत ते हायड्रोल्कोरिक व नायट्रिक आम्ल, लिकर अमोनिया, कॉपर ऑक्साइड, फॉस्फरस ट्रायक्लोराइड वगैरे पंचवीस रसायने बनवत. त्यांची घनता मोजण्यासाठी त्यांनी स्वतः हायड्रोमीटर बनवले होते. पुण्यातील लोक बॅटरीमध्ये घालण्यासाठी विरल केलेले सल्फ्युरिक आम्ल विकत घेत. काचेवर पारा चढवण्यासाठी लागणारे डिस्टिल्ड वॉटर या प्रयोगशाळेत बनविले जाई. पेट्रोलचा गॅस बनवण्याची कृती त्यांनी शोधून काढली होती. प्रा. लिमये यांना प्रयोगशाळेत लागणारी सर्व उपकरणे त्यांनी स्वतःच बनवली होती. त्यात कम्बशन फर्नेस, अॅल्युमिनियम क्लोराइडची भट्टी, सक्शन फिल्टरेशन साधनेही होती. काचेच्या केशनलिका (कॅपिलरीज) ते कुशलतेने बनवीत.
Leave a Reply