प्रा. न. र. फाटक म्हणजेच नरहर रघुनाथ फाटक यांचा जन्म १५ एप्रिल १८९३ साली झाला.
ते मराठीचे प्राध्यापक, प्रकांड पंडीत , पत्रकार , चरित्रलेखक , इतिहाससंशोधक, मराठी समीक्षक , संत साहित्याचे चिकित्सक होते. त्यांचे घराणे मुळचे कोकणातील ‘ कमोद ‘ गावातले होते.. त्यांच्या वडलांचे नाव रघुनाथ भिकाजी फाटक होते , ते सरकारी नोकरीत होते. पुढे ते पुण्याजवळ जांभळी येथे रहावयास आले. न.र. फाटक यांचा जन्म तिथेच झाला. ते १९१७ साली तत्वज्ञान आणि अर्थशास्त्र हा विषय घेऊन बी. ए . पास झाले. त्यांनी काही चित्रकलेच्याही परिक्षा दिल्या आणि पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्याकडे संगीताचे शिक्षणही घेतले . पुढे त्यानी काही काळ विविधज्ञानविस्तार , इंदुप्रकाश , नवा काळ ह्या नियतकालिकाच्या संपादनकर्यात भाग घेतला. त्यांनी वर्तमानपत्रातून सत्यान्वेषी , फरिश्ता ह्या टोपणनावांनी निर्भीड लेखन केले आणि आपल्या निर्भीड पत्रकारीचा ठसा उमटवला. पुढे १९२३ मध्ये कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी नवाकाळ सुरु केला तेव्हा फाटक त्याच्या संपादकीय विभागात काम करू लागले. त्यांनी अनेक मासिकातून लेखनही केले त्यात ज्ञानविस्तार , चित्रमय जगात , विविधवृत्त, मौज आणि अनेक मासिकांचा समावेश आहे. त्याने नाथीबाई ठाकरसी महिला विद्यापीठ , रुईया कॉलेज मुंबई येथे प्रोफेसर म्ह्णून शिकवले. ते रुईया महाविद्यालयातून १९५७ साली निवृत्त झाले. मराठी भाषेशिवाय त्यांचे संस्कृत हिंदी , इंग्रजी या भाषावर प्रभुत्व होते.
त्यांनी न्यायमूर्ती महादेव गोविद रानडे यांचे आत्मचरित्र १९२४ साली लिहिले. ते १९४७ साली हैद्राबाद येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. प्रा. न. र. फाटक यांचे मराठी साहित्यात समीक्षक, विचारवंत , इतिहासकार म्ह्णून स्थान खूपच मोठे होते त्याचप्रमाणे त्यांची स्वतंत्र मते ही देखील वर्तमानाला धरून होती. हिस्टरी ऑफ मराठा हा देखील त्यांच्या संशोधनाचा विषय होता. त्याचप्रमाणे त्यांनी पानिपतचा संग्राम भाग १ , २ , अठराशे सत्तावनची भाऊगर्दी , नाट्याचार्य कृ. प. खाडीलकर यांचे आत्मचरित्र , आदर्श भारतसेवक, लोकमान्य , श्री. रामदास , श्री. ज्ञानेश्वर , श्री. एकनाथ याच्या साहित्यावर पुस्तके लिहिली. त्यानी सुमारे एकतीस पुस्तके लिहिली. आजही मराठीच्या अभ्यासकांना अभ्यासासाठी त्यांच्याच ग्रंथाचा , पुस्तकाचा , लेखांचा आधार घ्यावा लागतो. त्यांना १९७० साली साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला.
त्यांचे २१ डिसेंबर १९७९ ह्या दिवशी वयाच्या ८७ व्या वर्षी मुंबईत निधन झाले.
— सतीश चाफेकर
Leave a Reply