लोकसाहित्याचे अभ्यासक, पत्रकार व लेखक प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांचा जन्म दि. २५ फेब्रुवारी १९५७ रोजी मुंबई येथे झाला.
महाराष्ट्राच्या लोककलांचे ज्येष्ठ अभ्यासक अशी ओळख लाभलेले डॉ. प्रकाश खांडगे यांनी साहित्य आणि शिक्षण क्षेत्र यांची लोककला आणि लोकसाहित्याशी सांगड घालण्याची अवघड कार्य प्रदीर्घ काळ तर केलेच आहे, पण अनेक तमाशा शिबिरांचे यशस्वी संचालक म्हणून पदाची जबाबदारी त्यांनी पार पाडलेली आहे. एवढेच नव्हे तर महाराष्ट्राचे लोकसाहित्य, लोककला देशभर व देशाच्या बाहेर पोहचविण्यात अभ्यासक म्हणून त्यांनी अजोड कार्य करून ठेवले आहे. डॉ. प्रकाश खांडगे हे मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीअंतर्गत असलेल्या शाहीर अमरशेख अध्यासनाचे समन्वयक म्हणून काम बघत असतात.
डॉ.खांडगे यांची सखोल अभ्यासकांची दृष्टी, विषयाची आवड, व्यासंग यातून लोककलांच्या अभ्यासकाची नवीन पद्धत तयार झाली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या या अभ्यासक दृष्टीचा फायदा दुर्लक्षित उपेक्षित कलावंताना होत गेला. त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले कला-कौशल्य साकार करण्याची संधी खांडगे यांच्या माध्यमातून लाभली. खांडगे यांनी पारंपरिक शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात कौशल्य विकासाच्या अनुषंगाने विद्यापीठ पातळीवर प्रशिक्षण सुरू केले, संशोधन सुरू केले. प्रशिक्षण, संशोधन ही प्रक्रिया सोबत असली की लोककलावंताच्या रोजगाराचा प्रश्नही मार्गी लागत असतो. साधारणतः १९७८ पासून डॉ. खांडगे या क्षेत्राशी संबंधित आहेत. लोककलेच्या संशोधन क्षेत्रात मुक्त पत्रकारिता करीत असताना वगसम्राट दादा इंदुरीकर, तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर, वारी नृत्य करणारे मुस्लिम भारूडकार राजू बाबा शेख यांच्यासारख्या कलावंतांना त्यांनी न्याय मिळवून दिला. शासनातर्फे आयोजित होणाऱया विविध सांस्कृतिक उपक्रमात सहभागी करून त्यांना आर्थिक अनुदान मिळवून देण्यात खांडगे यांनी भरीव योगदान दिले. महाराष्ट्राचे लोकसाहित्य आणि लोककला यांच्याशी त्यांचा प्रदीर्घकाळ अनुबंध असल्याने हे कार्य उत्तम प्रकारे होऊ शकले.जागरण, गोंधळ, तमाशा, बहुरूपी रायचंद, बोहाडा, कीर्तन, भारुड, लळीत आदी विषयांचा त्यांनी संशोधनात्मक दृष्टीने अभ्यास केला. मुक्त पत्रकारितेची भूमिका वठवत असताना त्यांनी ‘पद्मविभूषण’ तिजनबाई, तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर, ‘पद्मश्री’ शाहीर साबळे, लोकशाहीर विठ्ठल उमप, लोकसाहित्याचो गाढे अभ्यासक डॉ. रा. चिं. ढेरे इत्यादी मान्यवरांवर त्यांनी विस्ताराने लेखन केले. यातील काहीच्या दूरदर्शनच्या ‘प्रतिभा आणि प्रतिमा’ या लोकप्रिय कार्यक्रमात मुलाखती घेतल्या. २००४ च्या सुमारास मुंबई विद्यापीठात लोककला अकादमीचा शुभारंभ झाला तेव्हा खांडगे तिथी प्राध्यापक म्हणून रुजू झाले व २०१७ साली सेवानिवृत्त झाले. त्यांनी आपल्या कार्यकाळात अकादमीचे विभागप्रमुखपद सांभाळत असताना पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम, प्रमाणपत्र अभ्यासक्रम त्यांनी तयार केले. मुंबई विद्यापीठात लोककला या विषयावर देशपातळीवर शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाते. असे कार्य करणारे हे विद्यापीठ कदाचित देशात प्रथमच असावे. डॉ.खांडगे यांच्या पुढाकाराने लोककला अकादमीत पी.एच.डी. संशोधन केंद्र सुरू झाले. डॉ.प्रकाश खांडगे यांचे ‘चाळ माझ्या पायात, खंडोबाचे जागरण, भंडार भुका, महाराष्ट्राच्या प्रयोगात्म कला’ हे ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. डॉ. प्रकाश खांडगे यांचे ‘नोहे एकल्याचा खेळ’ हे लिहिले आत्मचरित्र आहे. डॉ.प्रकाश खांडगे यांनी ‘खंडोबाचं जागरण’ या २००९ साली पी.एच.डी साठी सादर केलेल्या प्रबंधाला उत्कृष्ट पी.एच.डी. प्रबंध म्हणून अ. का. प्रियोळकर पुरस्कार प्राप्त झाला आहे. या प्रबंधावरील ग्रंथ ‘खंडोबाचे जागरण’ या ग्रंथाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट संशोधन ग्रंथ ‘माडखोलकर पुरस्कार’ २०१० मध्ये प्राप्त झाला आहे.
केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य शासनाच्या विविध समित्यांवर काम डॉ.प्रकाश खांडगे यांनी केले आहे. चीनमधील बिजींग फोरम या आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉ.प्रकाश खांडगे यांनी सन २००८ मध्ये वैज्ञानिक यशपाल यांचेसह भारताचे नेतृत्व केले होते. अमेरिकेतील सॅन होजे येथे २००९ मध्ये आयोजित पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनात व्याख्यानाची संधी डॉ.प्रकाश खांडगे यांना मिळाली. डॉ.प्रकाश खांडगे यांना भारत सरकारचा ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’ २०१९ मध्ये मिळाला आहे. महाराष्ट्र शासनाचा कलादान पुरस्कार- २००९, पद्मश्री दया पवार पुरस्कार- २००१, ठाणेभूषण पुरस्कार-२०१८-१९ आणि जुन्नर तालुक्यातील महाराष्ट्र राज्य मान्यताप्राप्त ‘शिवनेरी भूषण पुरस्कार’ २०१९ देऊन असे अनेक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.तसेच डॉ.प्रकाश खांडगे यांना २०२१ मध्ये ‘पद्मश्री’ डॉ.कोमल कोठारी पुरस्कार मिळाला आहे.डॉ.प्रकाश खांडगे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
संकलन- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply