मराठी साहित्यविश्वात संशोधक समीक्षक आणि संवेदनशील कवी म्हणून परिचित असलेल्या रमेश अच्युत तेंडुलकरांचा जन्म १८ डिसेंबर १९३० रोजी झाला. एम ए नंतर काही काळ गुन्हे अन्वेषण विभागात त्यांनी काम केले. कविमनाला रुचेल असे सीआयडीत काय असणार? लवकरच ते सिद्धार्थ महाविद्यालयात आणि मग कीर्ती महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून शिकवू लागले. या कालखंडात त्यांनी रचलेल्या कविता ‘सत्यकथा’ मासिकातून प्रसिद्ध होऊ लागल्या. हळुवार मनाचे कवी आणि चतुरस्र समीक्षक म्हणून ते पुढे विख्यात झाले.
मुंबईतील त्यांच्या घराचे नावच ‘साहित्य सहवास’ असे होते. सचिन देव बर्मन हे त्यांचे आवडते संगीत-दिग्दर्शक. म्हणूनच २४ एप्रिल १९७४ रोजी जन्मलेल्या आपल्या मुलाचे नाव त्यांनी सचिन ठेवले. आपली आवड त्यांनी मुलांवर लादली नाही. क्रिकेटसाठी त्यांनी सचिनला शाळा बदलण्यासही परवानगी दिली होती.
प्रा. रमेश तेंडुलकरांच्या आईचे माहेर बालकवी त्र्यंबक बापूजी ठोमरे यांच्या परिसरातील (जळगाव) होते अशी माहिती त्यांच्या ‘बालकवींची कविता : तीन संदर्भ’ ह्या पुस्तकाच्या अर्पणपत्रिकेतून मिळते.
मराठी साहित्याच्या देशात, विशेषतः त्यातील कवींच्या प्रांतात दर्जा आणि प्रतिभेची वानवा मुळीच नाही परंतु अनेक कवींना (वाचक तर सोडाच) तथाकथित समीक्षकही न्याय देऊ शकलेले नाहीत. ‘बालकवींच्या आत्माविष्काराचे स्वरूपच मूलतः भिन्न आहे’ असे म्हणत तेंडुलकरांनी बालकवींच्या कवितांचे जे साक्षेपी रसग्रहण केले आहे त्याला तोड नाही. ‘भोगणारा जीव’ आणि ‘सृजनशील मन’ यांच्या द्वंद्वातून कलाकृती परिपूर्णतेकडे जात राहते आणि व्यक्तित्व व भावना असणार्या कलामनालाच ह्या द्वंद्वातून सुटका करून घेणे म्हणजे काय हे ‘कळू’ शकते ह्या टी. एस. इलिएटच्या ‘ट्रॅडिशनल अॅन्ड इंडिव्हिड्युअल टॅलन्ट’ या प्रसिद्ध लेखातील अवतरणांचे उपयोजन त्यांनी बालकवींची कविता खुलविताना केले आहे. समीक्षेपेक्षाही जास्त सौंदर्याभिमुखता आणि शब्दाशब्दावर विचार करणारी त्यांची नजाकतच या पुस्तकाच्या पानापानात दिसून येते.
‘फिकट निळीनें रंगविलेला कापुस मेघांचा’ ही बालकवींची ओळ वाचताना त्यांना लॉर्ड बायरनची ‘वन शेड द मोअऽ, वन शेड द लेस / हॅड हाफ इम्पेअर्ड द नेमलेस ग्रेस’ ही ओळ आठवते. ‘यक्षिणी, देवता कुणी, कपारींतुनी घोर घुमतील’ ही ओळ अनुभवताना त्यांना शेक्सपिअरच्या मॅक्बेथ या नाटकातील “फेअऽ इज फाऊल अॅन्ड फाऊल इज फेअऽ; हॉवअ थ्रू द फॉग अॅन्ड फिल्दी एअऽ” हे चेटकिणीचे उद्गार आठवतात.
“कलावंत जितका परिपूर्ण, तितके त्याच्या बाबतीत ‘भोगणारा जीव’ आणि ‘सृजनशील मन’ या दोन गोष्टींमध्ये पूर्णत: अलगत्व निर्माण होते. ते सृजनशील मन तितक्या पूर्णपणे भावनांच्या उद्रेकांना आपले खाद्य मानून ते उद्रेक चांगले पचवून टाकते, आणि त्यांचे ‘निर्मिती’त रूपांतर घडवून आणते.” हे म्हणणे आहे उपरोल्लेखित टी. एस. इलिएटचे (भाषांतर रमेश तेंडुलकरांचे). ब्रिस्टलमध्ये केनियाविरुद्ध सचिनने काढलेल्या नाबाद १४० धावा हे ह्या अवतरणाचे समूर्त प्रत्यक्षीकरण होते. सचिनचा ‘जीव’ भोगत होताच पण त्याच्यातील सृजनशील मनाने आपले अलगत्व निर्माण केलेले होते.
आताही कळफलकावर बोटांनी कळी दाबून हे वाक्य उमटविताना माझा हात थरथरतो आहे…‘करीब आ तुझे देख लूं, तू वही है या कोई और है’ ही सलीम कौसरच्या ‘मैं ख़याल हूं किसी और का’ या गझलेतील ओळ ‘अनुभवताना’ येणारी अनुभूती आणि सचिनने ब्रिस्टलमधील शतक पूर्ण झाल्यावर उंचावलेली बॅट पुनर्दृष्यात (रिप्ले) पाहताना अंगावर उभे राहणारे रोमांच यांना जोडणारा दुवा कोणता याचे उत्तर प्रा. रमेश तेंडुलकरांनी आधीच देऊन ठेवलेले आहे.
वयाच्या एकोणसाठाव्या वर्षी रमेश तेंडुलकरांनी काळाच्या पडद्याआड जावे एवढी प्रौढता मराठी काव्यसमीक्षेला कधीही आलेली नव्हती (अद्यापही ती आलेली नाही) पण पत्नी रजनी; पुत्र अजित, नितीन व सचिन; प्रीतीश, ग्रीष्मा, रोहन, करिष्मा आणि सारा ही ‘नात-पाखरे’ (हा शब्द त्यांच्या पुस्तकाच्या अर्पणपत्रिकेत आहे) आणि कन्या सविता या सर्वांना मागे ठेवून १९ मे १९९९ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
पुस्तकसंपदा
संपादित ग्रंथ
चौकोनी आकाश (अनंत काणेकरांच्या कविता)
कविता दशकाची (१९८०च्या दशकातील महत्त्वपूर्ण अशा दहा कवींच्या कवितांचे संपादन)
मृण्मयी (इंदिरा संत यांच्या निवडक कविता)
मराठी संशोधन खंड – १३ व १४,
आठवणीतल्या कविता (भाग १ ते ४, जुन्या काळच्या मराठी पाठ्यपुस्तकांमधील कवितांचा संग्रह)
स्वतंत्र पुस्तके
मानस-लहरी (कुसुमाग्रजांचे ‘जीवनलहरी’ वाचून त्यांनी अनुभवलेल्या संवेदना)
सहवासातील साहित्यिक
बालकवींची कविता : तीन संदर्भ (केशवसुत, गोविंदाग्रज आणि मर्ढेकर यांच्या कवितांच्या परिप्रेक्ष्यातून बालकवींच्या कवितांचे साक्षेपी दर्शन)
– डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply