बर्याच दिवसांपूर्वी एका वाचकाने एका वृत्तपत्रात `अंधश्रद्धेचा कळस’ असे पत्र लिहिले होते. हे पत्र वाचले आणि मनाला (शरीराला नाही हं!) गुदगुल्या झाल्या. कारण काय म्हणून विचारता? अहो।़।़ मीही त्याच विचारांची ना! मीच काय; पण खुद्द परमेश्वरही (ज्याची आपण भक्ती करतो.) त्याच विचारांचा! अहो देवाबद्दल श्रद्धा असावी; पण अंधश्रद्धा नको! चालत्या बसमध्ये बसलेल्या लोकांनी (कंडक्टरसकट) उठून देवाला नमस्कार करणे यात वावगे काहीच नाही; पण ड्रायव्हिंग करणाराही ड्रायव्हिंग सोडून उठून नमस्कार करीत बसला, तर ते स्टिअरिंगचे चाक कोठे जाईल? थोडासा विचार करा… आई-वडिलांच्या सेवेत मग्न असणाऱया भक्त पुंडलिकाने वीट फेकली आणि विठ्ठलालाही थोडा वेळ कटीवर हात ठेवून विटेवर उभे रहावे लागले. या काही दंतकथा नाहीत… हाताचे काम, किंवा नोकरी सोडून, अर्धी रजा घेऊन आपण देवाला जातो. तेही ठिक आहे हो! पण काम व कर्तव्य वेळेवर पार न पाडता फक्त देवदेव करणारे बरेच जण आपण पाहतो! मी तर म्हणते, की सरकारने एक फतवाच काढावा, की जो जास्त तास देवपूजा करेल त्याला नोकरीत प्रमोशन! मग काय कोणी नोकरीवर वेळेवर जाणार नाही. सर्व कामे ठप्प! अशाने फक्त घड्याळे वेळेवर पळतील बाकी सारे जग मात्र पळण्यात हरेल! त्यातही प्रामाणिकपणाने काम करणारा त्यागला जाईल.
मग शिस्त, नियम, बंधन कशाला पाहिजे? श्रद्धाळू व आस्तिक लोकांना या फतव्याचा रागही येईल; पण मी देखील ना (आ) स्तिक आहे! फक्त तुम्ही तुमचे काम (नेमून दिलेले) वेळेवर व प्रामाणिकपणे करा, एवढेच त्याला (परमेश्वराला) सुचवायचे आहे! कोणत्याही गोष्टीची मनात काळजी आली, की अंधश्रद्धा वाढते! तेव्हा येणाऱया संकटापासून बचावाची काळजी घ्या; पण चिंता करू नका. आपले बाह्यरूप आणि अशाश्वत असे हे शरीर याला खुद्द परमेश्वरानेदेखील फारसे महत्त्व दिले नाही. म्हणूनच कर्तव्य श्रेष्ठ मानणाऱया अनेक संत, महात्मे, युगपुरुषांना परमेश्वराने यश दिले. संत तुकारामांच्या गाथा पाण्यावर तरंगू लागल्या. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या स्त्रीशिक्षणकार्याला आज आपण वंदन करतो व पुजनीय ठरवतो, ते त्यांच्या कर्तव्यबुद्धीमुळेच. युगपुरुष शिवाजीमहाराज `हे राज्य स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा’ असे म्हणतच सतत कार्यरत राहिले आणि त्यांना त्यात यश मिळाले. संत गाडगेबाबा, बाबा आमटे, किती उदाहरणे द्यायची! संत गाडगेबाबा तर हातात झाडू घेऊनच काम करीत फिरत! हे सर्व लोक अश्रद्ध होते असे नव्हे, तर त्यांनी `काम’, `कर्म’ हाच देव व हीच श्रद्धा मानली आणि आयुष्याच्या संध्येपर्यंत कार्यरत राहण्याचा सल्ला दिला. सृजनाची धुंदी असणार्यांनी फक्त आपल्या कामावर निष्ठा ठेवली, तर अंतिम विजय व यश त्यांचेच आहे. नवनिर्मिती व प्रगतीचे एकेक शिखर गाठता-गाठता मन आपोआप परमेश्वराचा वेध घेतच असते. प्रत्येक माणसाच्या मनातले विचार व भावनांचे मंथन आणि त्याने केलेले कार्य याची परमेश्वराजवळ नोंद असतेच. आपली सजग वृत्तीच परमेश्वराला भावते… पण अंधश्रद्धा लोकांना हे पटेल की नाही, सांगता येत नाही… पण चुकून प्रमोशनचा असा फतवा जर कोणी काढलाच, तर कोणालाच प्रमोशन मिळणार नाही व जगाचे व्यवहारही ठप्प होतील. तेव्हा आता प्रत्येकाने वेगळ्या मार्गाने (प्रामाणिकपणे कर्म करणे) प्रमोशन मिळविण्याचे ठरविल्यास आपल्या देशाला सर्व जगात प्रमोशन मिळाल्यावाचून राहणार नाही.
— किशोर कुलकर्णी
Leave a Reply