गाडी त्या सुप्रसिद्ध हायफाय वृद्धाश्रमाजवळ थांबली.त्यातून साठ पासष्टीचा माणूस त्याची पत्नी त्याचा मुलगा सून उतरले.तिथले वातावरण पाहून त्याला खूप बरे वाटले.ऑफिसमध्ये गेला तो कोण आणि का आला ते संगितले. थोड्यावेळाने तेथील कर्मचारी दोन मोठ्या सुटकेस घेऊन आला.त्यात कागदपत्रे होती. त्याच्या वडिलांची …दोन महिन्यापूर्वीच त्यांचे निधन झाले होते .कोरोनामुळे तो येऊ शकला नाही . तसा तो दोन तीन वर्षाने येत असे.
ऑफिसच्या कर्मचाऱ्याने सगळे कागद ठेवले त्यात प्रॉपर्टीचे कागद होते. ते बघून त्याला धक्काच बसला. त्याच्या वडिलांनी सर्व प्रॉपर्टी त्या वृध्दाश्रमाच्या नावावर केली होती.त्याच्याकडे पैसे भरपूर होती तरीपण तो भडकला. संचालकाने सर्व समजावून सांगितले. त्याच्या बायकोनेही समजावले.तसा तो शांत झाला . हव्या त्या स्वाक्षऱ्या झाल्या , सोपस्कार झाले.
दोघेही निवांत बसले होते , त्याचा मुलगा आणि त्याची परदेशी बायको तेथिल वातावरण पाहून इंप्रेस झाली होती. हाऊ ब्युटीफुल म्हणून त्या वातावरणाची तारीफ करत होते.खरेच तिथले वातावरणही तसेच होते.
संध्याकाळी जायची वेळी झाली दुसऱ्याच दिवशीचे प्लॅन होते पॅकिंग करावयाचे होते. पटकन तो मुलाला म्हणाला …आम्ही दोघे इथेच रहातो काही दिवस ..तुम्ही दोघे जा…व्हिसा आहे अजून…..
मुलगा आढेवेढे घेऊ लागला , सूनही आग्रह करू लागली..
तरीपण त्याने समजूत घातली…
दोघे जड अंतकरणाने निघाले होते …
त्या दोघांनी पाच वर्षे झाली तरी अजूनही मूल होऊ दिले नव्हते ..
का कुणास ठाऊक..?
पण हा मात्र वेळीच जागा झाला होता…
त्याने आणि त्याच्या बायकोने
काळाची पावले ओळखली होती…
सतीश चाफेकर.
Leave a Reply