नवीन लेखन...

‘पृथ्वीची स्पंदनं’

पृथ्वीच्या साडेचार अब्ज वर्षांच्या आयुष्याच्या काळात अनेक वेळा भूशास्त्रीय तसंच हवामानविषय प्रचंड उलथापालथी झालेल्या आहेत. या नैसर्गिक घटना पृथ्वीवरच्या जीवसृष्टीत मोठे बदल घडवून आणतात. या घटनांची संख्या ठरावीक वर्षांनी अल्प काळासाठी, एकत्रितपणे वाढत असण्याची शक्यता काही संशोधकांनी पूर्वीच व्यक्त केली होती. त्यानुसार, या घटनांतील कालानुरूप सातत्य शोधण्याचा प्रयत्न गेली जवळजवळ पाच दशकं संशोधकांकडून होतो आहे. परंतु यासाठी प्रत्येक घटनेचा काळ हा अचूकपणे माहीत असायला हवा. खडकातील मूलद्रव्यांच्या समस्थानिकांचं प्रमाण कालानुरूप बदलत असतं. त्यामुळे त्यांच्या एकमेकांशी संबंधित प्रमाणावरून खडकाचं वय काढता येतं. कालमापनाच्या या तंत्रातली अचूकता वाढल्यामुळे, घडलेल्या घटनांचा काळ उपलब्ध पुराव्यांवरून आता अधिक निश्चितपणे सांगता येऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर, पृथ्वीवर उलथापालथ घडवून आणणाऱ्या घटनांतील कालानुरूप पुनरावृत्ती अधिक अचूकपणे शोधण्याचा एक नवा प्रयत्न अलीकडेच न्यूयॉर्क विद्यापीठातील संशोधक मायकेल रॅम्पिनो आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केला. मायकेल रॅम्पिनो आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं हे संशोधन ‘जिओसायन्स फ्राँटिअर्स’ या शोधपत्रिकेत प्रसिद्ध झालं आहे.

मायकेल रॅम्पिनो आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या संशोधनात गेल्या सव्वीस कोटी वर्षांतल्या एकूण ८९ घटना निवडल्या. या घटना केव्हा घडल्या, याचा निश्चित काळ ठाऊक आहे. या निवडलेल्या घटनांत मोठी विविधता आहे. यातील २९ घटना समुद्राच्या पातळीतील मोठ्या बदलांच्या, १२ घटना सागरी जीवसृष्टीच्या नाशाच्या, ९ घटना जमिनीवरील जीवसृष्टीच्या नाशाच्या, १३ घटना ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या, १० घटना समुद्राच्या पाण्यातील प्राणवायूचं प्रमाण कमी होण्याच्या, ८ घटना समुद्राच्या तळाची जमीन दुभंगण्याच्या आणि ८ घटना या भूपट्टांच्या हालचालींशी संबंधित आहेत. मायकेल रॅम्पिनो आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या घटना आणि त्या ज्या काळात घडल्या, त्या काळाची संख्याशास्त्रीय सांगड घातली. गेल्या सव्वीस कोटी वर्षांत एकूण दहा वेळा या घटनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचं या संशोधकांना दिसून आलं. या सव्वीस कोटी वर्षांच्या काळात, सरासरी दर पावणेतीन कोटी वर्षांनी अशा घटना वाढल्या होत्या. म्हणजे सरासरी दर पावणेतीन कोटी वर्षांनी पृथ्वी ‘अस्थिर’ होते आहे. प्रत्येक वेळी या नैसर्गिक घटनांची मालिका सरासरी बारा लाख वर्षं चालू राहते. मायकेल रॅम्पिनो आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काढलेले हे निष्कर्ष, संख्याशास्त्राच्या निकषांनुसार ९६ टक्क्यांहून अधिक खात्रीशीर आहेत.

या सर्व घटनांची संख्या ठरावीक काळानंतर का वाढत असावी, यामागची कारणं स्पष्ट नाहीत. ती वेगवेगळी असू शकतात. मायकेल रॅम्पिनो यांच्या मते, ही कारणं भूशास्त्रीय असू शकतात किंवा खगोलशास्त्रीयही असू शकतात. भूशास्त्रीय कारणानुसार या घटनांच्या पुनरावृत्तीचा संबंध भूगर्भातील हालचालींशी निगडित असू शकतो. भूगर्भातील काही विशिष्ट प्रकारच्या हालचालींचा एकत्रित परिणाम, जर ठरावीक काळानंतर पुनः पुनः दिसून येत असला तर, त्याचं प्रत्यंतर म्हणजे या ठरावीक काळानं घडणाऱ्या घटना असू शकतात. खगोलशास्त्रीय शक्यतेनुसार हा संबंध आकाशगंगेशी जोडला जाऊ शकतो. आपल्या आकाशगंगेचं प्रतल हे दर सुमारे सव्वातीन कोटी वर्षांनी कंप पावतं. पृथ्वीवरील या घटना घडण्याचा, पावणे तीन कोटी वर्षांचा काळ हा या सव्वातीन कोटी वर्षांच्या कालावधीच्या जवळ आहे. तेव्हा पृथ्वीवरील घटनांचा आणि या आकाशगंगेच्या कंपनांचा संबंध नाकारता येत नाही.

घटनांच्या पुनरावृत्तीमागचं आणखी एक कारण खगोलभौतिकशास्त्राशी संबंधित असू शकतं. हे कारण म्हणजे अंतराळातील कृष्णपदार्थांचा परिणाम. कृष्णपदार्थ हे दिसू न शकणारे, परंतु अप्रत्यक्षपणे  (उदाहरणार्थ, आपल्या गुरुत्वाकर्षणाद्वारे!) आपलं अस्तित्व जाणवू देणारे पदार्थ आहेत. आपल्या आकाशगंगेत असे कृष्णपदार्थ मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आहेत. आपली सूर्यमाला आकाशगंगेच्या केंद्राभोवती प्रदक्षिणा घालीत आहे. सूर्यमाला ही ठरावीक काळानंतर या कृष्णपदार्थांतून पार होत असावी. अशा वेळी अर्थातच पृथ्वीवरील पदार्थांचा या कृष्णपदार्थांशी संबंध येऊन मोठ्या प्रमाणावर ऊर्जा उत्सर्जित होत असावी. या ऊर्जेमुळे पृथ्वीचं तापमान वाढून अशा घटना घडू शकतात. अर्थात ही सर्व कारणे म्हणजे आज तरी फक्त तर्क आहेत.

अशा घटनांच्या अभ्यासावरून पृथ्वीचं सर्वांगीण स्वरूप स्पष्ट होण्यास मोठी मदत होणार आहे. पृथ्वीशी संबंधित विविध घटकांचा एकमेकांशी असलेला संबंध अशा संशोधनामुळे स्पष्ट होऊ शकतो. कारण ठरावीक काळानं घडणाऱ्या या सर्व घटना कदाचित एकमेकांशी निगडितही असू शकतील आणि त्यामुळेच त्या एकत्रितपणे घडून येत असतील. मायकेल रॅम्पिनो आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या संशोधनाद्वारे, पृथ्वीवरील मोठ्या घटनांच्या या पुनरावृत्तीच्या काळातली अनिश्चितता कमी केली आहे. मायकेल रॅम्पिनो यांच्या मते, सदर संशोधनात जरी फक्त गेल्या सव्वीस कोटी वर्षांतल्या घटना निवडल्या असल्या तरी, हे संशोधन त्यापूर्वीच्या घटनांनाही लागू होऊ शकेल. मायकेल रॅम्पिनो यांनी यासाठी समुद्रातील, साठ कोटी वर्षांपूर्वी झालेल्या बदलांचं उदाहरण दिलं आहे. हे बदल संख्याशास्त्रीयदृष्ट्या या गणितात बसू शकतात. मायकेल रॅम्पिनो आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या संशोधनानुसार, या अगोदरचं पृथ्वीचं असं ‘स्पंदन’ सत्तर लाख वर्षांपूर्वी घडून आलं होतं. आता याच गणितानुसार, यापुढचं ‘स्पंदन’ हे सुमारे दोन कोटी वर्षांनी घडून यायला हवं.

— डॉ. राजीव चिटणीस.

छायाचित्र सौजन्य: ELG21 – pixabay.com

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..