निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ घालविणे, सूर्यास्त पाहणे, समुद्राच्या लाटांची गाज अनुभवणे, काहीवेळ खिडकीतून आकाशाचा तुकडा न्याहाळणे, सहलीसाठी एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जाणे (शक्यतो अस्पर्श, अनाहत निसर्ग जेथे अजूनही मूळ रूपात भेटतो) अशामुळे विश्रांती, पुनरावलोकन आणि स्वस्वीकृतीची संधी मिळते आणि आपण ताजेतवाने होतो. निसर्ग आपली मनोवस्था अशी दुरुस्त करतो. दमलेल्या, कंटाळलेल्या दिवसाची अखेर एखाद्या मनमोहक दृश्याने झाली तर पटकन निसर्गाची आपल्या आयुष्यातील भूमिका अधोरेखित होते. शीण कमी करून आपण पुन्हा जर आपल्या कामावर लक्ष एकाग्र करू शकलो तर? थकवा मानसिक असो वा शारीरिक (परीक्षेआधीची जागरणे किंवा प्रोजेक्ट वेळेवर व्हावा म्हणून अथक काम करणे) दोन्हीवर अक्सीर इलाज एकच – निसर्गाकडे चला!
निसर्गानुभव
गेली वीस वर्षे निसर्गाचा मनोवस्थेवर आणि प्रकृतीवर (आरोग्यावर) होणारा परिणाम तपासणारे म्हणतात- “खरंच निसर्ग दिसतो तेवढा मानवी मनावर प्रभाव टाकू शकतो का? * निसर्गाचं नेपथ्य इतकं आकर्षक का असतं?” दैनंदिन जीवनात नैसर्गिक वातावरणाची निर्मिती करून त्यापासून काही लाभ उठवता येतील का? निसर्गाचे मानसशास्त्र ही शब्दरचना वाचून गोंधळात पडलात का? पर्यावरण आणि मानसशास्त्र यांच्यात काय नातं असं क्षणभर वाटलं ना? पण असं वाटणारे तुम्ही एकमेव नाही आहात.
थोडा नवा प्रकार आहे हा पण भविष्यकाळात मानवजातीवर याचा विशेष प्रभाव पडलेला असेल. मानवाचे भवितव्य ठरविणारा हा उद्याचा एक घटक असणार आहे.
माणसे आणि त्यांचा भवताल (यात बांधकाम, नैसर्गिक वातावरण, निसर्गाचा वापर आणि अपव्यय, संसाधनांचा संचय इ.) यांच्या परस्परसंबंधाचा आणि त्यांच्यातील देवाणघेवाणीचा शास्त्रोक्त अभ्यास म्हणजे निसर्गाचे मानसशास्त्र! थोडक्यात मानव आणि निसर्ग यांच्यातील नातं! या क्षेत्रात निसर्ग आपल्याला सकारात्मकता का आणि कशी शिकवतो, त्या ज्ञानाचा वापर आपण मानवी उन्नयनासाठी कसा करू शकतो आणि निसर्गाशी नातं दृढ करण्यासाठी आपण आणखी काय करायला हवे याचे अध्ययन अभिप्रेत आहे. एखाद्या परिसरातील माणसे शांत, हसतमुख, प्रेमळ आणि स्वभावतः इतरांना मदत करणारी का असतात आणि त्याच्या शेजारच्या परिसरात दुष्ट, कावेबाज, विश्वासघातकी माणसं का राहात असतात याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न साधारण ८०० वर्षांपूर्वी झाला आणि आश्चर्य म्हणजे ते उत्तर होतं – माती. आपणही बोलण्याच्या ओघात सहजपणे माती, पाणी इत्यादींचा एखाद्या प्रदेशावरील प्रभाव, तेथे वास्तव्य करणार्या माणसांवरील प्रभाव, त्यांच्या चालीरीती, खाद्यपदार्थ याबाबत विधान करून जातो. पण आता हे सिद्ध झालं आहे.
दवाखान्यातील खोलीची कोणती रचना रुग्णांसाठी आनंददायी असते आणि कोणती रचना रुग्णांच्या मनोवस्थेवर विपरीत परिणाम करू शकते यावर संशोधन झालं आहे. याचं समाधानकारक उत्तर मिळालं नाही पण त्यातून माणसातील आणि निसर्गातील अन्योन्यसंबंध पुढे आला. माणसाचा निसर्गावर काय परिणाम होतो हे आपण रोज पाहात आलोय. त्यासाठी “कॉंक्रीटचे जंगल” असा शब्द आपण शोधलाय. मानवाची निसर्गाकडे आणि एकुणच पर्यावरणाकडे पाहण्याची प्रवृत्ती आता विचार करण्यास भाग पाडतेय. समाज आणि संस्कृतीचा जीवनकाल हा भौगोलिक सामंजस्यावर (पाण्याची उपलब्धता, भूप्रदेशाची रचना, विशिष्ट झाडाझुडुपांची आणि वृक्ष -वनस्पतींची वाढ) अवलंबून असतो. याला एका मर्यादेपलीकडे धक्का पोहोचला तर त्या संस्कृतीचाच समूळ विध्वंस होऊ शकतो. सगळी समाजरचना आणि आपले राहणीमान यावर नैसर्गिक असमतोलाचा अनिष्ट परिणाम होऊ शकतो. नवीन संशोधन असे मानते की जीवसृष्टी हा निसर्गाचा एक भाग आहे. तेव्हा शहरी निसर्ग ही कल्पना स्वीकारणे हेच आपल्या हाती आहे.
निसर्गाशी संवाद साधण्याचं आपलं पहिलं साधन आहे – नजर, लक्ष! त्यावरून आपलं निसर्गाचं निरीक्षण, आकलन आणि वर्तन ठरतं. काही घटना (बर्या वाईट) आपलं लक्ष वेधून घेतात. तर काही ठिकाणी आपणहून नजर वळते. या सार्यांचे नकाशे आपल्या मनात तयार होतात. पूर्वानुभव आणि आकलन यांचा संयोग करून हे नकाशे आपली मतं बनवितात. मानवाचा प्रयत्न नेहमी चांगल्या परिसराचा शोध हाच असतो. असं भवताल जेथे सुरक्षित वाटेल, सहज वावरता येईल, नातं पटकन तयार होईल आणि अनोळखीपण दूर होईल. जेव्हा मन अस्वस्थ असते तेव्हा उत्तर काहीही असले तरी मन थार्यावर येत नाही. जेंव्हा तुमचे मन शांत असेल तेव्हा फक्त एक खूण मिळाली तरी तुम्हाला उत्तर कळते. कारण तुम्हीच सर्व उत्तरांचा स्रोत आहात. जेंव्हा तुम्ही शांत असता तेव्हा उत्तरे तुमच्यातूनच येतात. त्यासाठीच काही काळ निवांत बसणे गरजेचे आहे. असा निवांतपणा निसर्गात वाट्याला येतो. कधीकधी आपण नकळतपणे बोलून जातो- “काही क्षण मला एकटं राहू दे!”
विचार केला तर लक्षात येईल की अशावेळी सुद्धा आपण एकटे नसतो. निःशब्दपणे निसर्ग साथीला असतोच की! भलेही माणसांचा गलबला आसपास नसेल पण निसर्गाची अबोल साथ असते जी पटकन आपला मूड पूर्वपदाला आणते. काळ हे सगळ्या दुखण्यांवरचे रामबाण औषध आहे असा आपला वाक्प्रचार आहे त्यातही निसर्ग अनुस्यूत असतोच. आपल्या जखमा हळुवारपणे भरण्याचे काम निसर्ग नावाचा अश्विनीकुमार पूर्वापार करत आलाय. निसर्गानुभवाने आपली ऊर्जा, एकाग्रता वाढते हे संशोधनाने आता सिद्ध झालंय. घराच्या (कार्यालयाच्या) चार भिंतीत स्वतःला कोंडून घेणारे आपण आपोआपच निसर्गात कमी वेळ असतो. जीवनाच्या सतत वाढत्या गतीमुळे निव्वळ कोवळा सूर्यप्रकाशही आता अभावाने मिळतो आणि त्याचे आपणांस काही वाटतही नाही. ड जीवनसत्वाच्या गोळ्या डॉक्टरांनी सांगितल्या की सारं काही मोफत उधळणारा निसर्ग डोळ्यांसमोर तरळतो.
ही देणगी कशी वापरायची?
सर्वप्रथम मन निरभ्र करायचे. विचार, काळजी, माहितीचे अंश, तणाव सारं मनाआड सारायला शिकायचं. हे ढकलायचं नाही तर सुटसुटीतपणे मनाबाहेर नैसर्गिकरित्या प्रवाहित करायचं. मग एकाग्रता साधायला मोकळे! एखादे काम मन लावून केल्यावर मानसिक थकवा येतोच आणि तो शीण भरून काढणे ही दुसरी पायरी. त्यानंतर एखाद्या आवडत्या गोष्टीत मन रमवायचा प्रयत्न करायचा म्हणजे आतील गोंधळ कमी होऊन शिथिल अवस्था अनुभवायला सुरुवात करता येते. आतमध्ये शांतता पसरते. काहीवेळ या पायरीवर घालविला की खूप मोकळं, ताजं वाटायला लागतं आणि पुन्हा आपण जीवनकलहाला तोंड द्यायला तयार होतो. इथेच आपली पुनःस्थापना होते. माता अमृतानंदमयी अम्मा म्हणतात- “तुम्ही निसर्गाची सेवा करा तो कितीतरी पट अधिक तुमच्या झोळीत टाकेल” याची प्रचिती आली की आपला प्रवास सार्थक झाला असे मानावे.
निसर्गस्नेहाचे हाकारे ओळखण्यासाठी आपण स्वतःच्या विचारांपासून दूर जायला हवे. जे वातावरण आपली ऊर्जा शोषून घेतंय आणि मनस्ताप देतंय त्याचा त्याग करणे ! त्यानंतर सहजगत्या (विनासायास) ज्या गोष्टी आपले लक्ष वेधून घेतात त्यांचा विचार करावा. यातून करमणुकीबरोबरच आपला कंटाळाही कमी होतो. मग निसर्गाचा सराव सुरु होतो. ते वातावरण आवडायला लागले की व्यत्यय कमी होतात आणि चित्त विचलित होत नाही. एकदा निसर्गाच्या स्वाधीन झालो की त्याची सकारात्मकता प्रवाहीत होते आणि आपली अवस्था “घेता किती घेशील” अशी होते.
फार पूर्वीपासून माणसातील आणि निसर्गातील जवळीकीच्या निरगाठी खूप घट्ट आहेत. काळाच्या ओघात आणि माणसाच्या कृतघ्नतेमुळे त्या सैलावल्या आहेत. दोघेही जोपर्यंत हातात हात घालून मार्गक्रमणा करीत होते तोवर ओलावा होता. “वृक्ष वल्ली आमचे सोयरे” होते.
“नगरेचि रचावी| जलाशये निर्मावी, महावने लावावी| नानविधे॥”
असं माउलीने प्रतिपादन केलंय.
“जे वृक्ष लाविती सर्वकाळ| तयावरी छत्राचे झल्लाळ|”
असं संत नामदेवांनी लिहून ठेवलंय.
” नाना वल्लीमध्ये जीवन| नाना फळी -फुली जीवन| नाना कंदी -मुळी जीवन| गुण कारके॥ ”
हे समर्थांचे वचन आहे. या संतांच्या शिकवणुकीमुळे मानवाच्या मनात एक अथांग कृतज्ञता वसतीला होती. तेथे ओरबाडण्याला वाव नव्हता. आमचे सण-समारंभ निसर्गपूजनाशिवाय साजरे होत नसत. भवतालाची बारीक सारीक काळजी घेत, परिसराला जपत आपण एकेकाळी जगायचो. मग नकारार्थी विचारांना स्थान कोठून? सगळं सहज, विनासायास आणि सर्वसमावेशक असायचं. निसर्गचक्राचा आदर असायचा. वातावरणाशी एकरूपता असायची. पर्यावरणाच्या सर्व रूपांचे सहर्ष स्वागत असायचे. निसर्ग कायम संवादी असतो. थोडा गहन, थोडा गूढ असतो. पण त्याची गणिते सोडविता आली पाहिजेत. ही एकरूपता हरपली की ताणतणाव येतात. त्याचे दुष्परिणाम आरोग्यावर होतात, वागण्यात कमकुवतपणा येतो. हा तुटकपणा एकाकी करून सोडतो. आज आपण जागतिक तापमानवाढ आणि तिचे दुष्परिणाम यावर चर्चा करतो. पण या असमतोलाला जबाबदार कोण? आपण कोरडे होत चाललोय तसाच निसर्गही! जोपर्यंत या क्षतीची जबाबदारी घेऊन आपण सामंजस्याचा हात पुढे करत नाही तोपर्यंत निसर्ग एक पाऊल पुढे टाकणार नाही.
आपल्या व्यक्तिगत जागेत, मनात निसर्ग कितपत सामावता येतो हे बघणे आता गरजेचे झाले आहे. आणि परिसराशी आपण किती प्रमाणात जोडले गेलो आहोत, त्याच्या संवर्धनात आपला वाटा किती हेही माहित असायला हवे. आजकाल थंड हवेची ठिकाणे खर्या अर्थाने उरली आहेत का? ऋतुचक्रातल्या आपल्या हस्तक्षेपामुळे सगळा समतोल ढासळला आहे. ग्रामीण जीवन किंचित बरं आहे पण शहरातील प्रदूषण, घुसमट यामुळे “इस शहरमे हर शक्स परेशानसा क्यूँ हैं?” असे प्रश्न पडायला लागले आहेत.
वर्तमानकाळाचा एक गुणविशेष म्हणजे अस्वस्थता! हा अस्वस्थतेचा तवंग सर्वदूर पसरतोय. तो खरा असण्याची शक्यता अधिक! आणि ही अस्वस्थता नसलीच तर मग वास्तव वेगळं आहे का? नद्या आक्रसल्या, अतिक्रमणांमुळे प्रवाह खुंटले आणि व्यक्तिगत जीवनातील उंची कमी होत गेली आहे. अमेझॉन मध्ये पसरलेली बेकाबू आग वैश्विक न्यायाचं आपल्याला अजूनही न समजलेलं उदाहरण मानायचं का? मग एका प्रश्नाचं उत्तर द्यायला आपल्याला उभं ठाकावं लागेल- ” हे सारं होत असताना तुम्ही कोठे होता? आणि काय करीत होता? ”
तंत्रज्ञान जगाला जवळ आणतय, असं सगळेजण जेव्हा मानतात तेव्हा आपल्या आसपासची माणसे आणि हे चराचर याबद्दल आपल्याला पडणार्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपणांस निसर्गाकडे वळले पाहिजे. समाज किंवा संस्कृती माणसाचं यथार्थ दर्शन घडवत नाहीत. माणसाच्या अंतरंगात शिरायचं असेल तर त्याच्या आसपासचा निसर्ग तपासावा लागतो. अवकाशातील तार्याला हात लावाल, तर पृथ्वीवरचं फूल कोमेजेल असं अद्वैत चराचरात भरून राहिलं आहे आणि त्याकडे डोळेझाक करून आपण मात्र सगळ्या साखळ्या खिळखिळ्या करायला निघालो आहेत.
नैसर्गिक सभोवताल आपली एकाग्रता वाढविण्यास मदत करतो, समस्या सोडविण्यास आवश्यक असलेल्या कौशल्यात वृद्धी करतो, सकारात्मक भावना सुधारण्यास हातभार लावतो आणि ताणाची पातळी लक्षणीय रित्या कमी करतो. म्हणूनच शहरी भागात, शाळा -महाविद्यालयांमध्ये, कामाच्या ठिकाणी नैसर्गिक वातावरण जाणीवपूर्वक जोपासलं पाहिजे. हे अंमलात आणण्यापूर्वी काही प्रयोग करण्यात आले- “खिडकीतून निसर्ग दिसत असेल तर रुग्णाला कमी औषधोपचारात लवकर बरे करता येईल का? निसर्गदृश्ये आणि आवाज यांच्या सान्निध्यात वेदनांची तीव्रता कमी होऊ शकते का? मनोहारी दृश्यांचा व्हिडीओ पाहिला तर भाजलेल्या रुग्णांच्या जखमा लवकर भरून येण्यास मदत होते का? वृद्धांना तासभर बाहेरच्या मोकळ्या हवेत फिरू दिलं तर त्यांची प्रसन्नता वाढेल का? त्यांची चिडचिड कमी होईल का? घरातून (बाल्कनीतून) नियमितपणे बाहेरच्या देखाव्याचा आस्वाद घेणार्या शहरी लोकांमधील आक्रमकता थोडी तरी कमी होते का? कामाच्या ठिकाणी सहज खिडकीबाहेर अधूनमधून बघणार्या कर्मचार्यांच्या शारीरिक तक्रारींमध्ये घट होते का? या प्रयोगांना यश आलं आहे.
साधारण तीस वर्षांपूर्वी एक प्रयत्न करण्यात आला होता- सहभागी सदस्यांचे दोन गट करून, त्यापैकी एका गटाला निर्मनुष्य, ओसाड प्रदेशात काही दिवस वास्तव्यासाठी ठेवलं होतं. दुसरा गट तितक्याच कालावधीसाठी शहरात ठेवला होता. वास्तव्या आधी आणि नंतर त्यांची तपासणी करण्यात आली आणि एकच जबाबदारी दोन्ही गटांवर सोपविण्यात आली. ओसाड भागात राहिलेल्या गटाने कामावर लक्ष केंद्रित करून दिलेली जबाबदारी कमी वेळेत आणि जास्त चांगली पार पाडली होती. यावरून निसर्ग सान्निध्याबाबत काही सकारात्मक निष्कर्ष काढता येतात.
आयुष्यातील सर्वात कठीण कालखंडात निसर्गसान्निध्याचा काय करिष्मा असतो?
स्तनांचा कॅन्सर असलेल्या रुग्णांना नैसर्गिक वातावरणात ठेवलं तर त्यांची सकारात्मकता वाढते, आजाराशी झुंज देण्याची उमेद वाढते आणि अशा स्त्रिया पुन्हा जुनं आयुष्य(नव्या उमेदीने) जगतात. त्यासाठी दरवेळी जंगलात किंवा सहलीला जाण्याचीच गरज असते असं नाही. घराच्या अंगणात हिरवळ असेल, समोर छोटंसं कारंज असेल तरीही नकारात्मक वृत्ती तेथून पळ काढते. रंगशास्त्र असं म्हणते की हिरवा रंग डोळ्यांना शीतलता देतो. आसपासच्या झाडाझुडुपांच्या अगणित हिरव्या छटा नजरेला शांत करतात. अवकाशाचा निळा रंग प्रसन्नता देतो. मानसिक स्वास्थ्य भरपूर मिळतं.
२०११ साली एक प्रयोग करण्यात आला होता. मुलांचे वर्तन, आकलन आणि भावनिक प्रतिसाद बघण्यासाठी एका गटाला जंगलात पाठविलं होतं आणि परतल्यावर त्यांच्या वागण्यातील बदलाबाबत पालकांना निरीक्षण करण्यास सांगितले होते. ती मुले थोडी स्थिर, शांत झाली होती आणि त्यांच्यातील आक्रमकपणा कमी झाला होता. हे सगळं असं नकळत होत असतं. न्यूयॉर्क मध्ये परिसरातील आवाज आणि कोलाहल यांचा बालमनावर होणारा परिणाम तपासण्याबाबत संशोधन सुरु झाले आहे. याचा परिणाम म्हणून तेथे गोंगाटाबद्दल काही धोरणात्मक (विशेषतः सार्वजनिक ठिकाणी) निर्णय घेण्यात आले आहेत. आपल्याकडेही रुग्णालयांच्या परिसरात हॉर्नवर बंदी घालण्याचे कारण हेच आहे- त्या कर्कश आवाजाचा रुग्णांवर, त्यांच्या मनःस्थितीवर घातक परिणाम होऊ शकतो.
आपल्या आयुष्यातील निसर्गात तूट आली तर? त्याचा हिस्सा, प्रमाण घटले तर?
यावर वैद्यकीय क्षेत्रात उपाय ,उपचार नाहीत. कारण हा मुळात आजार नाही. ही आहे आपल्याला चुकवावी लागणारी किंमत (शारीरिक, मानसिक) आणि त्याचे एकमेव कारण म्हणजे आपण आपल्या दैनंदिनीतून निसर्गाला वजा केलंय, हद्दपार केलंय! विशेषतः वाढत्या वयातील मुलांच्या समस्यांकडे अंगुलीनिर्देश करणारी ही निसर्गत्रुटी आहे. भवताल फुकटात मिळाला आहे त्यामुळे आपणांस त्याची पुरेशी कदर नाही. निसर्ग वगळला तर फारसं बिघडत नाही या मनोवृत्तीमुळे आपण आपल्याही नकळत कोरडे, एकाकी होत चाललोय. आटत चाललोय कारण ओलावा घटतोय.
२०१६मध्ये मानवसमाजाची निसर्गाप्रती जबाबदारी ठरविण्याच्या दिशेने बरीच पावले उचलावी लागतील असा मतप्रवाह पुढे आला. त्यांत परिसराबाबत जागरूकता आणि संवेदनशीलता कशी वाढविता येईल यासाठी काही शैक्षणिक उपक्रम हाती घ्यावेत, प्रशिक्षण देण्यात यावे असे सुचविण्यात आले आहे.
निसर्गाचे हे मूक मानसशास्त्र समजून घेणे, त्याच्याशी हातमिळवणी करणे, दोघांमध्ये सामंजस्य आणणे हेच आपल्या हातात आहे. वनस्पतींच्या बागा, ग्रीन कव्हर वाढवा, वृक्ष दिंडी काढा, पर्यावरण व्यवस्थापन यंत्रणा(आय एस ओ १४०००) राबवा, संसाधनांचा गैरवापर कमी करा, नद्यांचे पुनरुज्जीवन करा, जागेचा सामाजिक वापर(गर्दीच्या दृष्टीने) तपासा, वास्तुरचना शास्त्रात निसर्ग संवेदनांचा वाढता वापर (प्रकाश योजना, मोकळ्या जागेचे नियोजन, ध्वनीशास्त्राचा विचार, रंगसंगती, अंतर्गत रचना), हरित आस्थापना(सांडपाण्याचा पुनर्वापर, सौरऊर्जेचा वापर, प्रदूषण कमी करणारी उपकरणे बसविणे) आणि असे बरेच प्रयत्न आता सुरु झाले आहेत. त्यातून फार उशीर होण्यापूर्वी सगळं ठाकठीक व्हावं!
आपण विध्वंसाच्या मार्गावरून नवनिर्मितीकडे वाटचाल करावी. निसर्ग स्वभावतः क्षमाशील आणि सकारात्मक असतो. तो माणसातील ओल वाढविण्यासाठी नक्कीच आपल्यावतीने सकारात्मकतेचे पसायदान मागेल. “थोडासा रुमानी हो जाय” चित्रपटातील नाना पाटेकर सारखी घरोघर जाऊन पाऊस विकण्याची पाळी आपल्यावर येऊ नये.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply