पंडित गिरीश चंद्र यांना मोजकेच लोक भारतातओळखत होते सुदैवाने त्यापॆकी मी एक होतो, खूप गप्पा होत असत, माझ्या घरी, माझ्या राम अय्यर या मित्राकडे….जरूर वाचा…
पं . गिरीशचंद्र यांचा जन्म २२ नोव्हेंबर १९४४ रोजी सुरत येथे झाला. पंडितजींनी वैष्णव देवळामध्ये ‘ हवेली ‘ संगीत गायला सुरवात केली ती त्यांच्या वयाच्या ६ व्या वर्षी . पंडितजींचे शिक्षण एम. बी. ए . पर्यंत झाले होते. त्यांचे पुढील संगीताचे शिक्षण पंडित ओकारनाथ ठाकूर यांच्याकडे झाले. गिरीशचंद्रजी भक्ती संगीत , गज़ल ,ठुमरी , बडा ख्याला , छोटा ख्याल गात असत.
गिरीशचंद्रजी १९६१ ते १९७० पर्यंत सुप्रसिद्ध संगीतकार मदनमोहन यांच्याकडे सहाय्यक म्हणून काम केले . ‘ लग जा गले …’ हे गाणे मदनमोहनजी आणि पंडित गिरीशचंद्रजी सहाय्यक म्हणून असतानाच केले गेले आहे. त्या गाण्याच्या आठवणी ते सांगत असत. त्या गाण्याची मूळ चाल आणि शब्द देखील त्यांनी काही महिन्यापूर्वी म्हणून दाखवले. सुदैवाने मी त्याचे चित्रीकरणही केले . त्यांनी त्यांच्याबरोबर सात चित्रपट केले. त्यामध्ये मेरा साया , दस्तक , हसते जख्म , हीर रांझा , लैला मजनू आणि वो कौन थी हे चित्रपट केले . त्यानंतर संगीतकार मदनमोहन यांचे दुर्देवी निधन झाले. गिरीशचंद्रजी यांनी ‘ राम तेरी गंगा मैली ‘ च्या वेळी संगीतकार रवींद्र जैन यांच्याकडे काम करायला सुरवात केली परंतु तेथे त्यांचे काही जमले नाही . त्यांनी भारत देश सोडला आणि अमेरिकेमध्ये टेक्सास येथे गेले. परत ते भारतात आले ते तब्बल ४५ वर्षांनी. त्यांचा मुलगा मुलगी तेथेच राहिले आणि हे मात्र फकीरासारखे भारतात आले. भारतात आले , आणि आले ते ठाण्यात . माझे मित्र राम अय्यर यांच्याकडे . राम अय्यर हे शास्त्रीय संगीताचा उत्तम जाणकार त्याचे गुरु उस्ताद रईस खान साहेब होते , ज्यांचे नुकतेच पाकिस्तानमध्ये निधन झाले.
पंडितजी आणि मेहंदी हसन हे देखील एकदा एकत्र आले होते असे त्यांच्या गप्पाच्या ओघात त्यांनी आम्हाला संगितले होते . मेहंदी हसन साहेबांच्या गजल ते अत्यंत वेगळ्या पद्धतीने त्यांच्या कार्यक्रमामध्ये म्हणत असत. गिरीशचंद्रजी एक मनाशी ध्यास धरून भारतात आले , सर्व काही सोडून आले कारण इथल्या तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी आले , व्हॉइस थेरपीवरही त्यांचा अभ्यास होता. अमेरिकेमध्ये तेथे त्यांचा रिअल इस्टेटचा बिझनेस तर होताच परंतु ते अनेक ठिकाणी तेथे मैफलीही करत असत. त्यांच्या मैफली स्पेन , इटाली , यू . के. कॅनडा , जर्मनी आणि यू . ऐ .इ मध्येही झाल्या परंतु ते प्रसिद्धी पासून सतत दूर असत .त्यांना मुंबई , ठाण्यात फारसा प्रतिसाद नाही मिळाला परंतु इतर राज्यात त्यांचे शिष्य तयार होत होते. काम झाले की ते निघून जात. आम्ही २ मार्च २०१७ ह्या दिवशी ठाण्यामध्ये डॉ. काशिनाथ घाणेकर सभागृहात त्यांच्या गजल चा कार्यक्रम केला होता , दुरून लोक आले होते , त्या कार्यक्रमामध्ये ‘ लग जा गेले….’ या गाण्याचा संपूर्ण इतिहास उलगडून सांगितला होता. कार्यक्रमासाठी दुर्दैवाने संपूर्ण वृत्तपत्रांच्या प्रतिनिधीना बोलवूनही ती मंडळी आली नाही. त्यामुळे तो कार्यक्र्म लोकांपर्यंत पोहोचला नाही. कारण नुसती बातमी करणेच म्हणजेच पत्रकारिता हा भ्रम पसरलेल्या काळात हेच होणार . तरी परंतु पंडितजी शांत होते आणि एकदिवस पुण्याला निघून गेले त्यांच्या शिष्याकडे आल्हाद काशीकरकडे दोन महिने राहिले , पुणे आकाशवाणीने मात्र त्यांच्यावर एक मोठा सविस्तर कार्यक्रम केला. आल्हादने आणि त्यांनी एक बांदा येथे जाहीर कार्यक्र्म केला पुढे ते कुठे निघून गेले हे मला कधी कळलेच नाही . त्यांचे असेच होते सणक आली की निघून जायचे.
पंडित गिरीशचंद्र ह्याचे गाणे ऐकताना एक सतत जाणवत होते हा माणूस स्वतःसाठी गातो, पार त्यामध्ये रमून जातो , पंडिजींना हिंदी चित्रपटसृष्टीविषयी खूप आशा होती , आज ना उद्या ती शास्त्रीय संगीतकडे झुकेल . परंतु वातावरण बघता ते पंधरा ते वीस वर्षे अशक्यच आहे असे मला वाटते. एखादा तसा चित्रपट येतो परंतु तो न चालल्यामुळे कुठलाही निर्माता ते धाडस करत नाही.
खरे तर आम्हाला त्यांच्या अमेरिकमधील त्यांच्या वास्तव्याबद्दल त्यांनी कधीच काही सांगितले नाही . गप्पाच्या ओघात जेवढे येत असे तेवढे येत असे . त्यांचा मुलगा तिकडे जज होता आणि मुलगी लग्न करून दुर्धर आजारातून बरी झालेली. त्यांच्या पत्नीचे आधीच निधन झालेले होते.
त्यांनी आणि निदा फाजली यांनी बरेच काम केले होते. निदा फाजली त्यांच्या अनेक गजलना त्यांनी चाली लावल्या होत्या परंतु ते त्याच्या कार्यक्रमामध्ये गात असत कुणी रेकॉर्ड केल्या असतील तर असतील अशी फकिरी त्यांच्याकडे होती. त्यांना शेकडो गजल पाठ होत्या.
ते नेहमी म्हणत की मी इथल्या तरुणांना गाणे कसे असावे हे शिकवण्यासाठी आलो आहे आणि ते शिकवता शिकवता ह्याच देशात माझे प्राण जावेत.
हे त्यांचे शब्द अक्षरशः खरे ठरले २४ नोव्हेंबर २०१७ ला ते खजुराहो येथे गाणे शिकवत असतानाच त्यांचे हृदयविकाराने निधन झाले.
सर्व शिष्य हादरले. ते एकटेच होते , कोणी नातेवाईक नव्हते म्हणून सर्व त्यांना कायदेशीर सोपस्कार करावे लागले. त्यांच्या शिष्यानी त्यांचे पार्थिव अलाहाबाद येथे आणले , माझ्या मित्राने आल्हाद काशीकरने जो त्यांचा शिष्य होता , घरी अमेरिकेमध्ये फोन केला , फोन उचलला , नीट प्रतिसाद मिळाला नाही.
शेवटी पंडित गिरीशचंद्र आपल्या आवडत्या मातृभूमीमध्ये शिष्यांच्या हातांनी विलीन झाले , आमच्यासाठी अनेक आठवणी ठेवून.
कृपया you tube वर satish chaphekar शेअरच करा तेथे मी त्याची काही रेकॉर्डिंग मी केलेली आहेत ती जरूर बघा, फक्त त्यांचे इतकेच रेकॉर्डिंग आता अस्तित्वात आहे जे सुदैवाने माझ्या हातून केले गेले.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply