आग्रा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. यशवंत महाले यांचा जन्म १६ जून १९३५ रोजी मुंबईत झाला.
पं यशवंत महाले हे विष्णू नारायण भातखंडे यांच्या आग्रा परंपरेतले एक गायक, बंदिशकार, व गुरू. संगीत क्षेत्रात त्यांचं नाव अत्यादरानं उच्चारलं जातं. संगीतातील बुजुर्गांनाही या ज्ञानवंत व्यक्तिमत्त्वाचा आधार वाटतो. पं.यशवंत महाले यांनी संगीत शिकण्यास सुरुवात वयाच्या २१ व्या वर्षी केली, त्यांचे पहिले गुरु होते ते कराची हून आलेले साधू वीसनदासजी. काही काळ त्यांच्या कडे शिक्षण घेतल्यावर पं.यशवंत महाले लखनौ येथे गेले. लखनौ येथे भातखंडे यांनी स्थापिलेल्या इतिहास प्रसिद्ध मॉरीस म्युझिक कॉलेजातच पं.यशवंत महालेंची जडणघडण झाली. पं.भातखंडे यांचे शिष्योत्तम अण्णासाहेब रातंजनकर हे पं.यशवंत महाले यांचे दुसरे गुरू. गायक म्हणून स्वत:ची कारकीर्द घडविण्यावर लक्ष केंद्रित न करता अण्णासाहेबांनी शिष्य घडविण्यात आपलं जीवन व्यतीत केलं. पं. के. जी. गिंडे, एस. सी आर. भट, दिनकर कैकिणी आणि यशवंत महाले यांसारखे बुद्धिमान शिष्य तयार करून अण्णासाहेबांनी परंपरेची पालखी वाहून नेणारे नव्या दमाचे पाईक निर्माण केले. या सर्वांचं समान वैशिष्ट्य म्हणजे हे सारे विद्यादानी आचार्य बनले. त्यांच्याच अथक परिश्रमातून भातखंडे परंपरा अखंड राहिली. यांपैकी पं.यशवंत महाले हे सर्वांत धाकट्या पातीचे. लखनौत गुरुगृही राहून पं. विनायक लेले, गोविंदराव नातू आणि अण्णासाहेबांकडून त्यांनी संगीताची दीक्षा घेतली. चौदा वर्षं त्यांना अण्णासाहेबांचा सृजनशील सहवास लाभला. विद्येचं कोठार अण्णासाहेबांनी या ज्ञानोत्सुक विद्यार्थ्यापुढे खुलं केलं. उस्ताद रहिमुद्दीन डागर यांच्याकडून महालेंना धृपदाची तालीम मिळाली.
पं.यशवंत महाले नावाचं चैतन्यानं सळसळणारं झाड लखनौच्या विद्यानगरीत संपन्न झालं. १९७४ साली अण्णासाहेबांच्या मृत्यूनंतर ज्येष्ठ गुरुबंधू पं. गिंडे यांचीही खास तालीम त्यांना मिळाली. गिंडे आणि पं.यशवंत महाले यांना अण्णासाहेबांच्या हृदयात मानसपुत्राचं स्थान होतं. अण्णासाहेब आणि नातू यांच्याकडून महालेंनी बंदिशी रचण्याची प्रेरणा घेतली. सुजनदास या टोपण नावानं त्यांनी विविध भावरंग चित्रित करणाऱ्या १४० बंदिशी बांधल्या.
‘यशवंत संगीतामृत’ या पुस्तकातून स्वरलेखनासहित त्या प्रसिद्ध झाल्या. त्यांची सी.डी.ही निघाली. सुजनदास या टोपणनावातही त्यांनी आपली गुरुप्रीती जपली आहे. सुजन या नावानं अण्णासाहेबांनी बंदिशी बांधल्या, तर स्वत: गुरुपदी पोहोचल्यावरही सुजनदास म्हणवून घेण्यात महालेंना आपलं समाधान गवसलं. यमन रागातील एका बंदिशीत पं.यशवंत महाले म्हणतात, ‘गुरुसेवा से जो गुन पावे सोही रिझावे गुनियनको, सुजनदास कर जोर करत नित सीस नमावत गुरु चरनन को’ संगीत ही गुरुमुखी विद्या असल्यामुळे गुरु-शिष्यांतील प्रेमादर आणि भावपूर्ण नातं हा अभिजात संगीताच्या परंपरेचा अविभाज्य घटक बनला आहे.
सतत ज्ञानसाधना करत राहणं, आपल्या मनाचं आणि विद्येचं क्षितिज विस्तारणं हा महाले यांचा जीवनधर्म आहे. ते सतत अस्वस्थ असतात. स्वत:विषयी असमाधानी असतात. त्यांना काही तरी खटकत असतं. आपुलाचि वाद आपणांसि चालू असतो. त्यांच्या ज्ञानवैभवाचं मूळ या त्यांच्या अस्वस्थतेत आहे. ती त्यांची ऊर्जा आहे. त्यांना ध्यास असतो तो परिपूर्णतेचा. उत्तमातल्या उत्तमाचा. त्यामुळेच त्यांच्या प्रज्ञेचं चैतन्य आजही वृद्धिंगत होतं आहे. गुरुंपासून महालेंनी केवळ गायनविद्याच प्राप्त केली असं नव्हे, तर निर्मम वृत्तीनं मौलिक विद्या विनामूल्य दान करण्याचं व्रतही घेतलं. या वयातही तरुणांनी लाजावं अशा उत्साहानं परंपरेच्या जतन-संवर्धनाचं काम करत आहेत. गुरुंच्या बंदिशी केवळ पुस्तकातच बंदिस्त राहू नयेत; बंदिशींचं भावपूर्ण गायन कसं करावं, त्यातलं सौंदर्य कसं प्रकट करावं, हे शिष्यांना कळावं असं महालेंना वाटलं. म्हणून त्यांनी अण्णासाहेब, नातू, गिंडे यांच्या बंदिशी ध्वनिमुद्रित करून त्यांच्या सी.डी. काढल्या. देशभरच्या नियतकालिकांतून अण्णासाहेबांनी लिहिलेले लेख आणि त्यांची व्याख्यानं शोधून काढून त्यांचं संकलन केलं आणि ग्रंथरूपात ते अभ्यासकांना उपलब्ध करून दिलं. त्यांचं शोधकार्य आजही उत्साहानं चालू आहे.
स्वरसाधनरत्न, स्वरव्रती, स्वामी श्रीवल्लभदास पुरस्कार, पं.जानोरीकर संगीतभूषण पुरस्कार, श्री वल्लभ स्वामी पुरस्कार असे अनेक पुरस्कार पं. यशवंत महाले यांना मिळाले आहेत.
२०१९ मध्ये पं.यशवंत महाले यांचे दोन ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत.
१. आग्रा घराना – परंपरा और बंदिशे. यात पं.यशवंत महाले यांनी घराण्याचा इतिहास कथन केला असून आग्रा घराण्याच्या १४८ बंदिशी स्वरलेखनासहित दिल्या आहेत. पुस्तकाबरोबर बंदिश गायनाची सी. डी. देण्यात येणार आहे.
२. रागांग राग विवेचन – या पुस्तकात पं. के. जी. गिंडे यांनी काही दशकांपूर्वी दिलेली व्याख्यानं आणि प्रात्यक्षिकं यांचं अत्यंत अभ्यासू पद्धतीनं पं.यशवंत महाले यांनी विश्लेषण केलं आहे. तरुण गायकांना हा चिंतनशील ग्रंथ अत्यंत उपयुक्त ठरेल.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply