भारतात प्रत्येकाच्या घरात आणि त्यानंतर हाता हात फोन आणि मोबाइल्स येऊन तसा बराच कालावधी लोटलाय जेव्हा पत्रव्यवहार आपल्याकडे संपर्काचं प्रमुख माध्यम म्हणून वापरलं जातं तेव्हा नकळत टेलिफोनच्या खणखणाटानं, हे वातावरण “आवाजी” केलं आणि पहाता पहाता टेलिफोन सर्वसामान्यांपर्यंत मर्यादित रुपात पोहोचला, त्यावेळी “पी.सी.ओ.”, “एस.टी.डी.”, “आय.एस.डी.” अशा विभागलेल्या स्थितीत अनेक पाट्यांची दुकानं आपल्याला गल्ली बोळात दिसायची; आज म्हणजे गेल्या ८-१० वर्षांपासून या पाट्या सहजरित्या आपल्या नजरेआड कधी गेल्या तेच कळलं नाही. सहाजिकच आहे मोबाईल, पेजर्स, इ-मेल्स, एस.एम.एस. चा वापर यामुळे “पी.सी.ओ.” कुठच्या कुठे पळाला; स्काईप मुळे तर समोरा समोर बसून बोलता येईल इतकं आपण जवळ आलो, अंतर आहे फक्त एका स्क्रीनचं; असो.
साधारणत: ७०-८० च्या दशकात जेव्हा टेलिफोनचं संभाषण सर्वांच्या आवाक्यात आलं त्यावेळी पीं.सी.ओ. बुथच्या बाहेर किंवा बुथ नसेल तरी पण स्वकीयांबरोबर बोलण्यासाठी रीघ लागायची, हे चित्र शनिवारी रात्री आणि रविवारच्या दिवशी हमखासपहायला मिळायचं, तीन मिनिटाला एक रुपये असा हिशोब असलेल्या फोन कॉल्सचा नियम आजही अव्याहतपणे सुरु आहे.
या “ओपन संभाषणामुळे” एकतर सर्व खासगी बाब, तिथल्या उपस्थितांना कळायच्या, त्यामुळे फोनवर बोलताना काहीसं भान ठेवून बोलावं लागतं ! त्यातल्या त्यात जर हे संभाषण एखाद्या “प्रियकर” किंवा “प्रियसी” असेल तर मग विचारायलाच नको; हाच “पी.सी.ओ.” देशातील कितीतरी व्यक्तींच्या रोजगाराचं साधन बनलेला, अनेकांचे संसार कसबसे या व्यवसायातून सावरले देखील ८० तसंच ९० च्या दशकात अपंगांसाठी खास “पी.सी.ओ बुथ्स” चालवण्याची परवानगी मिळाली, त्यामुळे त्यांच्या रोजगाराचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागला.
या पब्लिक फोन्समुळे, देशातील तळागळातील लोकांना यानिमित्ताने आधुनिक उपकरणाची ओळख तरी झाली! साधारणत: ९८ ते २००० पर्यंत पी.सी.ओ. आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनून होते, विशेष करुन गरीब आनि मध्यमवर्गीयांचे सुद्धा.
हळुहळू पेजर्स, इंटरनेट ने आपल्या आयुष्यात शिरकाव केला. फोन इतकच हे माध्म “स्पीडी” आहे त्यामुळे फोनपेक्षा कधी-कधी या तंत्राची गरज देखील जवळची वाटू लागली; प्रोफेशनल लेव्हल वरुन ह्या तंत्रानी नकळत आपल्या “पर्सनल लाईफ” मध्ये प्रवेश केला. एव्हाना मोबाईल फोन्सनी पण डोकं वर काढायला सुरुवात केली होती; एरव्ही लाखापर्यंत मिळणारा मोबाईल २००० सालानंतर काही हजारांवर येऊन ठेपलेला, सहाजिकच अनेक उच्चमध्यमवर्गीयांच्या हातामध्ये तो खेळू लागला, २००२ नंतर मोबाईल्स अधिक स्वस्त झाले प्रिपेड, पोस्टपेड वर इन्कमिंग फ्री झाल्याने व आऊटगोइंग कॉल्स आवाक्यात आल्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या हाता हातात फोन्स दिसू लागले.
अचानकच एखाद दिवशी रस्त्यावरुन जाताना काहीसं चुकल्यासारखं वाटू लागलं, कारण दुकानांवर फोन अगदीएकटाच पडून असायचा, आजही आहे. “अॅण्ड्रॉइड फोन्स” मुळे त्या लाल डब्याकडे फारसं कुणी फिरकत देखील नाही; स्वकीयांशी बोलण्यासाठी, लोकं फारसं त्याकडे अपवादानेच किंवा अगदीच गरज असेल तर फिरकतात, टेलिफोन बुथ्सच्या जागांचं रुपांतर दुकानांमध्ये झालं आहे, “फुल फ्लेज टेलिफोन बुथ्स” कुठेच दिसत नाही, केव्हातरी पांढर्या-निळ्या रंगात पी.सी.ओ. ची पाटी दिसते, तेव्हा डोळ्यासमोर आपण देखील केलेल्या “कॉल्सचा काळ” उभा राहतो.
फार क्वचित जेव्हा केव्हा मोबाइलची बॅटरी डाऊन होते, किंवा बॅलन्स नसतो त्यावेळी, पब्लिक फोनची वाट निवडावी लागते. पण बर्याचवेळा हिंडून फिरुन देखील फोन सापडत नाही, तेव्हा मात्र पब्लिक फोन्सची खूप जास्तच गरज भासू लागते व पब्लिक फोन्सची आठवण पुन्हा आपल्या माणसांविषयी मनातल्या मनात बरंच काही बोलून जातो, या दूरध्वनीच्या निमित्ताने.
— सागर मालाडकर
Leave a Reply