श्रावण म्हणजे चैतन्य…आनंद…उत्साह. तो आता उंबरठ्याशी आला आहे. सणांचा-व्रतवैकल्यांचा हा महिना
पूजेच्या निमित्ताने या विविध वनस्पतींशी जो संपर्क येतो तो आरोग्यदायक असतो. निसर्गाशी संबंध जोडलेला राहावा, आसपासच्या वृक्षसंपदेची माहिती असावी, घराच्या आसपास कोणकोणती झाडे-वेली असाव्यात हे ज्ञात व्हावे, असे कितीतरी उद्देश पत्री गोळा करण्यामागे असतात. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पत्रीत अंतर्भूत असलेली प्रत्येक वनस्पती आरोग्य-रक्षणामध्ये अग्रेसर असलेली दिसते. पत्री फक्त शारीरिक आरोग्यासाठीच नव्हे, तर मानसिक, आध्यात्मिक विकासासाठी उपयुक्त असते.
श्रावण म्हणजे ऊन-पावसाचा खेळ, तसेच पूजा-व्रत-वैकल्यांचा कालावधी. हरितालिका, नागपंचमी, मंगळागौरी अशा अनेक पूजा श्रावणात येतात. भाद्रपदातील गणेशोत्सवाचे वेधही श्रावणात लागल्यावाचून राहात नाहीत. या सर्व पूजांसाठी “पत्री’ म्हणजे निरनिराळ्या वनस्पतींची पाने, फुले वापरली जातात. पूजेच्या निमित्ताने या विविध वनस्पतींशी जो संपर्क येतो तो आरोग्यदायक असतो. निसर्गाशी संबंध जोडलेला राहावा, आसपासच्या वृक्षसंपदेची माहिती असावी, घराच्या आसपास कोणकोणती झाडे-वेली असाव्यात हे ज्ञात व्हावे, असे कितीतरी उद्देश पत्री गोळा करण्यामागे असतात. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पत्रीत अंतर्भूत असलेली प्रत्येक वनस्पती आरोग्य-रक्षणामध्ये अग्रेसर असलेली दिसते. आज आपण श्रावणात वापरल्या जाणाऱ्या पत्रींची माहिती करून घेऊ या.
श्रावणातील पत्री
अशोकाची पाने
शोभेचा उंच वाढत जाणारा अशोक हा खरा अशोक नव्हे. सीतेचा अशोक हा खरा अशोक. पत्री म्हणून तसेच औषधात सीतेचा अशोक वापरला जातो. अशोक स्त्रीत्वाचे रक्षण करणारा, स्त्रीसंतुलन करणारा असतो. गर्भाशय, बीजाशयासंबंधित अनेक विकारांवर आयुर्वेदात सीतेच्या अशोकाचा उपयोग केला जातो.
आवळ्याची पाने ही वाहण्याने आरोग्यरक्षण होते, असे सांगितले आहे. आवळ्याला “धात्री’ असे पर्यायी नाव आहे. एखादी दाई जशी बाळाची काळजी घेते, तसा आवळा आरोग्याचे रक्षण करण्यासाठी तत्पर असतो. आवळ्याची फळे रसायन गुणांनी परिपूर्ण असतातच, पानेसुद्धा अतिप्रमाणात होत असलेली लघवी कमी करणारी असतात.
दूर्वा पत्री म्हणून दूर्वा अर्पण करणे हे परमात्मप्राप्तीचे साधन असते, असे आपल्या शास्त्रांमध्ये सांगितले आहे. दूर्वा म्हणजे जमिनीवर पसरणारे एक प्रकारचे गवत असते. आयुर्वेदातही दूर्वा हे एक महत्त्वाचे औषध आहे. गर्भधारणा व्हावी व गर्भधारणेनंतर गर्भरक्षण व्हावे म्हणून स्त्रीच्या व गर्भवतीच्या आसपास ज्या वनस्पती असाव्यात त्यात दूर्वांचा उल्लेख आहे. दूर्वा थंड असतात, रक्तदोष दूर करतात, भूतबाधा म्हणजे अदृश्य जीवजंतूंना दूर ठेवतात. उष्णतेमुळे नाकातून रक्त येते, त्यासाठी दूर्वांचा रस नाकात घालण्याचा उपयोग होतो. दूर्वा स्वच्छ धुवून त्यांचा रस खडीसाखरेसह घेतल्यास पित्त कमी होते, रक्त शुद्ध होते, अनेक त्वचाविकार, नागीण वगैरे त्रास दूर होऊ शकतात. संगणकासमोर बसण्याने डोळ्यांची आग होत असल्यास दूर्वांचा रस घेण्याचा उपयोग होतो. दूर्वांच्या हिरवळीवर अनवाणी पायाने चालण्यानेही डोळ्यांची ताकद वाढते, डोळ्यांवरचा ताण कमी होतो.
कण्हेर कण्हेरीची पाने वाहण्याने तापत्रयांचा नाश होतो. तापत्रय म्हणजे शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक ताप तसेच वातज, पित्तज, कफज हे ताप. पांढऱ्या कण्हेरीचे मूळ कानावर बांधले असता सर्व प्रकारचे ताप बरे होतात, असा आयुर्वेदात उल्लेख सापडतो. पांढरी, गुलाबी, लाल असे कण्हेरीचे फुलांच्या रंगांवरून निरनिराळे प्रकार असतात. यातील पांढरी कण्हेर औषधात वापरली जाते. विंचू, सर्पदंशावर पांढऱ्या कण्हेरीचे मूळ उगाळून लेप केला जातो.
कदंब कृष्णाला प्रिय असणाऱ्या कदंब वृक्षाची पाने वाहण्याने डोक्याचे व मेरुदंडाचे रक्षण होते. आयुर्वेदात कदंब विषनाशक, शुक्रवर्धक (धातू वाढविणारा), वर्ण सुधारणारा सांगितला आहे. तोंड आले असता कदंबाच्या सालीच्या काढ्याच्या गुळण्या करण्याचा उपयोग होतो.
ब्राह्मी ब्राह्मी अर्पण करणे मेंदूसाठी हितावह असते, असे शास्त्र सांगते. आयुर्वेदातही मेंदूच्या आरोग्यासाठी, मेंदूतील दोष दूर होण्यासाठी ब्राह्मीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. शांत झोप लागण्यासाठी, मनावरचा ताण कमी करण्यासाठीसुद्धा ब्राह्मी उत्तम असते.
धोत्रा धोत्रा वाहण्याने श्वसनक्रिया उत्तम राहते. आयुर्वेदातही धोत्र्याच्या पानांचा लेप संधिवातावर उपयोगी असतो. धोत्र्याच्या पानांची धुरी घेतल्यास छातीतील कफ कमी होतो, दम्याची घुसमट कमी होते.
धोत्र्याची फुले
धोत्रा अर्पण करणे धनदायी असते. धोत्र्याचे पंचांग (मूल, फळ, साल, मूळ व पाने) एकत्र करून धुरी घेण्याने खोकला बरा होतो. धोत्र्याच्या फुलांना मादक गंध असतो.
आघाडा हा अर्पण करणे विषनाशक असते. आघाडा फक्त पावसाळ्यात उगवतो. पावसाळ्यात छातीत कफ होण्याची, दम्याचा त्रास होण्याची प्रवृत्ती असते, यावर आघाड्याचा क्षार उत्तम असतो. आघाड्याच्या क्षारामुळे मूत्रप्रवर्तन व्यवस्थित होण्यास उपयोग होतो. अपामार्ग क्षाराने सिद्ध केलेले तेल कानात टाकल्यास कान दुखणे कमी होते. काटा टोचला व मोडून आतच राहिला तर त्यावर आघाड्याची पाने बारीक करून बांधण्याची पद्धत आहे, त्यामुळे वेदना थांबतात व काटा वर निघून येतो.
बेल बेल वाहण्याने त्रिदोषांचा नाश होतो, पापांचा नाश होतो. बेलाचे फळ, मूळ, पाने औषधी असतात. अर्धवट पिकलेले बेलफळ मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करते, तर पूर्ण पिकलेल्या फळाने शौचाला साफ होते. बेलाचा मुरंबा आव होणे, फार वेळा शौचाला होणे वगैरे त्रासांवर उपयोगी असतो. बेलफळ यकृताची कार्यक्षमता सुधारण्यासाठीही वापरले जाते. बेलाच्या पानांचा रस जंत नष्ट करण्यासाठी वापरला जातो. बेलाची पाने अंगाला लावली असता शरीराचा दुर्गंध दूर होतो. बेलाच्या पानांचा रस खडीसाखर घालून घेण्याने शक्ती वाढते, अतिरिक्त उष्णता कमी होते.
गंध फुलांचा…
चाफ्याची फुले चाफा वाहण्याने चतुर्वर्ग साध्य होतात, म्हणजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चारही पुरुषार्थांची सिद्धी होते. चाफ्याच्या फुलांचा काढा घेण्याने सर्दी बरी होते, उत्तम भूक लागते, असे आयुर्वेदात सांगितले आहे. थंडी वाजून येणाऱ्या तापावर चाफ्याच्या कळ्या विड्याच्या पानातून घेण्याचा उपयोग होतो.
केवडा
केवड्याचे फूल अर्पण करण्याने बुद्धी वाढते, असे सांगितले आहे. अपस्मारावर केवड्याची फुले व केवड्याच्या कणसावरील बारीक कण एकत्र करून तयार केलेल्या मिश्रणाचे नस्य घ्यायला सांगितले आहे. केवड्याच्या पारंब्या बलकर, देहाला दृढ करणाऱ्या व रसायनगुणांनी युक्त असतात.
कण्हेर फुले
कण्हेरीची फुले वाहण्याने स्त्रीत्वाचे रक्षण होते. कण्हेरीचे मूळ विषारी असते. दंशावर पांढऱ्या कण्हेरीचे मूळ उगाळून लावले असता विष उतरते. पांढऱ्या कण्हेरीची फुले वाळवून त्यांचे नस्य करण्यानेही सापाचे विष उतरते. नागीण उठते त्यावर लाल कण्हेरीची फुले व तांदूळ पाण्यात रात्रभर भिजत घालून दुसऱ्या दिवशी वाटून लेप करता येतो.
बकुळ फुले
सुगंधी, छोटी-छोटी बकुळ फुले वाहण्याने स्त्रीच्या तारुण्याचे, स्त्रीत्वाचे रक्षण होते. आयुर्वेदातही बकुळीची ताजी फुले, बदाम व खडीसाखर यांचे मिश्रण तीन दिवस घेण्याने पाळीच्या वेळचा अतिरक्तस्राव किंवा अंगावरून पांढरे पाणी जाणे वगैरे त्रास दूर होतात असे सांगितले आहे. बकुळीच्या फुलांचा वास घेण्याने हृदयाची ताकद वाढते.
कमळ
कमळ वाहण्याने शत्रूचा नाश होतो. कमळाचे फूल सुगंधी, वर्णकर, शीतल व रक्तदोष बरा करणारे असते. पांढऱ्या कमळाच्या पाकळ्या, ज्येष्ठमध व खडीसाखर यांचा थंड काढा पिण्याने पित्तामुळे आलेला ताप बरा होतो.
गुलाब
सुगंधी गुलाब वाहण्याने शांती प्रस्थापित होते. गुलाब सौम्य, थंड व रक्तशुद्धी करणारा असतो. गुलाबाच्या वाळलेल्या कळ्या साखरेसह खाऊन वर पाणी पिण्याने पोट साफ होते. गुलकंद हे प्रसिद्ध औषध गुलाबाच्या फुलांपासून बनवितात व ते पित्तशमनासाठी तसेच मलशुद्धीसाठी उत्तम असते.
जास्वंद
जास्वंदाची फुले वाहण्याने लोकसंग्रह वाढतो. जास्वंदीची फुले केसांसाठी उत्तम असतात. जास्वंदीची फुले वाटून किंवा रस काढून केसांना लावली असता केसांची वाढ होते व केस काळे होतात. चाई लागली असता त्या ठिकाणी जास्वंदीच्या फुलांचा रस चोळण्याचा फायदा होतो.
मोगऱ्याची फुले
मोगऱ्याची सुगंधी फुले सर्वांच्या परिचयाची असतात. ही वाहण्याने परमात्मप्राप्ती होते असे शास्त्र सांगते. मोगऱ्याचे फूल गुणाने थंड, सुखप्रद व पित्तशामक असते. मोगऱ्याची पाने गर्भिणीच्या अंगावरून पांढरे पाणी जाते त्यावर उपयोगी असतात.
अशोकाची फुले
स्त्रीत्वरक्षक, गर्भाशयशुद्धीकर आहेत. स्त्रियांचा शोक नाहीसा करण्याचा विशेष गुणधर्म अशोकाच्या फुलांमध्ये असतो. या प्रकारे पत्री फक्त शारीरिक आरोग्यासाठीच नव्हे, तर मानसिक, आध्यात्मिक विकासासाठी उपयुक्त असते. देवदेवतांना वाहण्याच्या निमित्ताने पत्रींची ओळख झाली, संपर्क कायम राहिला तर आवश्यकतेनुसार त्यांचा आरोग्यरक्षणासाठी फायदा करून घेता येईल.
डॉ. देवेंद्र साठे.
Leave a Reply