MENU
नवीन लेखन...

पुलवामा, पाणी आणि पृथ्वीराज

संदर्भ – लोकसत्ता २३.०२.१९ .
बातमी : (शीर्षक) : ‘पाणी तोडण्यांचे अधिकार मंत्र्यांना नाहीत – पृथ्वीराज चव्हाण’.

पाणी व पृथ्वीराज –
• पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर देशात संतापाची लाट उठलेली आहे. सरकारनेंही पाकविरुद्ध बरीच पावलें उचलली आहेत, आणि त्या पावलांना जनतेचा सपोर्टच आहे.
• याविषयांतर्गत श्री नितिन गडकरी यांनी काल स्टेटमेंट केलें की ‘नद्यांचें पाकला जात असलेले अतिरिक्त पाणी आम्ही थांबवूं’. त्यांच्या ऑफिसनें हेंही स्पष्टीकरण दिलें की ‘ही योजना आधीच ठरलेली आहे ; आतां मंत्रीमहोदय फक्त ती एक्सपीडाइट करण्यांबद्दल बोलताहेत’.
• यानंतर वर उल्लेखलेली पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया आलेली आहे.
• मी कुणा अमक्याच्या बाजूनें अथवा तमक्याच्या विरुद्ध असा कांहीं स्टँड घेत नाहींये.
मात्र, तुमचाआमचा गैरसमज टळावा म्हणून , खरी स्थिती आपल्यासमोर असली पाहिजे, असें माझें मत आहे. म्हणून ही टिप्पणी.

• पृथ्वीराज चव्हाण हे उच्चविद्याविभूषित गृहस्थ आहेत. त्यामुळें, त्यांना गडकरी यांच्या बोलण्याचा अर्थ समजला नसेल, असें म्हणणें धार्ष्ट्याचें ठरेल.
• खरें तर , या प्रसंगी सर्व लोकांनी , अगदी विरोधी पक्षांनीही, सरकारला साथ द्यायला हवी. पृथ्वीराज चव्हाण हे एक सभ्य राजकारणी म्हणून ओळखले जातात. त्यामुळे ते या गोष्टीचें भांडवल करतील असें वाटलें नव्हतें. पण ते तसें करीत आहेत. ‘बोलविता धनी वेगळाची’ असें कांहीं असावें काय, असा दाट संशय येतो.
• असो. खरी परिस्थिती काय, तिची पार्श्वभूमी काय, गडकरी कुठल्या संदर्भात बोलत आहेत, हें आपण समजून घेतलें पाहिजे.

पार्श्वभूमी व विश्लेषण
• ही बाब आहे पंजाबातल्या नद्यांची. फाळणीनंतर कांहीं काळानें , झेलम (जेहलम), चिनाब, रावी, बियास, सतलज व सिंधु (इंडस) या सहा नद्यांचें पाणी भारत व पाकिस्ताननें कसें वाटून घ्यायचें हें ठरलें.
• खरें तर, त्याच वेळींच, भारतानें, पाकिस्तानचा अधिकार होता त्यापेक्षा जास्त पाणी पाकिस्तानला द्यायचें
स्वत: होऊन मान्य केलें . आम्ही कर्णाचे अवतार ना ! ( म्हणजे, तत्कालीन भारत-सरकार). त्यामळे, आम्ही ‘मोठ्या भावाची’ भूमिका अदा करीत स्वत:होऊन पाकला जास्त पाणी देऊं केलें ! अहो, तुम्ही स्वत:ला लाख ‘मोठा भाऊ’ मानाल, पण पाक त्याला स्वत:ला ‘लहान भाऊ’ मानत होता काय ? ‘हँस के लिया पाकिस्तान । लड़ के लेंगे हिदुस्तान ।’ ही तर त्यांची घोषणा होती. १९४७ सालीं त्यांनीच कबिलेवाल्यांच्या आडून काश्मीरवर आक्रमण केलें नव्हतें काय ? आणि काश्मीरनें भारतात विलीन होण्यांच्या कागदपत्रांवर सही केल्यानंतरही तें आक्रमण चालूंच राहिलें नव्हतें काय ? म्हणजेच, तें आक्रमण भारताविरुद्ध नव्हतें काय? आणि तरीही, आम्ही धरमराजाचे अवतार बनून पाकला पाण्याचा जास्त कोटा देऊं केला.
खरें तर, दानही सत्पात्रीं असावें लागतें.
• इथें मला गांधीजींचा एका अन्य बाबतीत संदर्भ देणे योग्य वाटतें.
• गांधीजी तर संतच होते. त्याच्या बद्दल व्यक्तिश: मला आदरच आहे. मात्र, असें असलें तरी, तो अंध आदर नाहीं. आपण निष्पक्ष विश्लेषण केलें पाहिजे, व चूक ती चूकच म्हटलें पाहिजे.
फाळणीच्या अटींप्रमाणें भारतानें पाकला कांहीं कोटी रुपये द्यायचें होते, व त्यातील कांहीं रक्कम देऊनही झालेली होती. पाकच्या आक्रमणानंतर भारत सरकारनें बाकीच्या ५५ कोटी (लक्षात घ्या, हे १९४७ चे ५५ कोटी आहेत) रुपयांची पेमेंट थांबवली. ‘हे पैसे देणारच नाहीं’ असें भारत सरकार म्हणालें नव्हतें, तर, ‘पाकच्या आक्रमणामुळे ही पेमेंट थांबवली जात आहे’, असें तें होतें. त्या वेळीं काय झालें ? त्या वेळी, ते ५५ कोटी रुपये भारतानें लागलीच पाकला द्यावेत म्हणून गांधीजींनी प्राणांतिक उपोषण केलें आणि सरकारमधीळ आपल्या शिष्यांचें ’इमोशनल ब्लॅकमेलिंग’ केलें. झाले ! भारत सरकारनें ते थांबवलेलें पेमेंट पाकला देऊन टाकलें ! सॉरी मित्रांनो, पण त्यावेळी संतपण आणि राजकारण एकत्र नांदायला नको होतें. गांधीजी तत्वत: जरी बरोबर होते, तरी राजकारणाच्या दृष्टीनें त्याचें चुकलेंच. ( अखेरीस, संत असले तरी गांधीजी माणूसच होते, देव नव्हे. आणि माणूस म्हटलें की चूक ही होऊं शकतेच . ‘टु अर् इज् ह्यूमन’ , अशी म्हणच आहे ).

• कुणाला प्रश्न पडेल की नद्यांच्या पाण्याशी गांधीजींचा संबंध काय ? त्यातून तर, पाण्याच्या मुख्य अग्रीमेंटच्या वेळी गांधीजी हयातही नव्हते.

तर, तो संबंध आहे तत्वज्ञानाचा. गांधीजींचे शिष्यच तर त्या कराराच्या वेळी सरकार चालवत होते. त्यांची पॉलिशी गांधी-विचारांशी सुसंगतच होती, असणारच ! ( टीप – हें विष्लेषण आहे, दोषारोपण नाहीं, हें कृपया वाचकांनी ध्यानांत ठेवावें ). आम्हांला विश्वबंधुत्व हवें होतें ; उदारतेचा शिक्का हवा होता ; आम्हाला, ‘आम्ही शंभर आणि पांच, पण इतरांसाठी एकशेपांच’ हा धर्मराजाचा कित्ता गिरवायचा होता ! ( पण आम्ही हेंच विसरलो की, एवढा विचार मानूनही युधिष्ठिर धर्मराजाला कुरुक्षेत्र-युद्ध रोखतां आलें नाहींच ; आणि येथें तर पाकनें आधीच युद्ध छेडल्याची पार्श्वभूमी होती. तर मग , आपण धर्मराज बनायचें कारणच काय होतें? ) .

एकतर, पाणी-कराराच्या वेळी भारतानें पाकला झुकतें माप दिलें ते दिलें ; आणि दुसरें म्हणजे, कराराप्रमाणें जे कांहीं पाणी वापरायचा भारताला अधिकार होता, तेवढें पाणीही आपण वापरलें नाहीं, वापरूं शकलो नाहीं ! फक्त एक भाक्रा पुरेसें नव्हतें. अजून बरेच कांहीं करायला हवें होतें. तें झालें नाहीं, त्यामुळे, भारताच्या हिश्शांचें पाणीही पाकिस्तानला मिळूं लागलें, अगदी फुक्कट ! आपल्या हिश्शाच्या पाण्याचा वापर भारत कां करूं शकला नाहीं, याची कारणें अनेकानेक असतील ; मात्र, त्यामुळे ‘मऊ लागलें की कोपरानें खणायचें’ हा खाक्या पाकिस्ताननें चालूं ठेवला की ! सो मच् सो, की मधल्या कांहीं वर्षांमध्ये भारत आपल्या हिश्शाचें पाणी वापरण्यासाठी धरणांची जी योजना करत आहे, त्याला पाकिस्ताननें आंतरराष्ट्रीय फोरमसमोर आक्षेप घेतला ! हें म्हणजे, ‘चोराच्या उलट्या बोंबा’ असें झालें की !

मात्र गेल्या कांहीं वर्षांमध्ये, पाकच्या कांगाव्यांना दाद न देतां भारत स्वत:च्या हिश्शाचें पाणी पाकला फुकटंफाकट मिळूं नये म्हणून उपाययोजना करीत आहे.

गडकरींच्या वक्तव्याच्या मागील पार्श्वभूमी ही अशी आहे.

 म्हणून, जर कोणी ती स्टेटमेंट ट्विस्ट करत असेल, तर आपण त्याला बळी पडायला नको, कारण आपल्याला आतां सर्व पार्श्वभूमी समजलेली आहे. जनता म्हणून आपण किमान एवढं तरी नक्कीच करूं शकतो.

— सुभाष स. नाईक

२३.०२.१९

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 294 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..