पुणं हे शहर मराठी माणसाच्या दृष्टीनं औत्सुक्याचं शहर ठरलं आहे. माणूस मग तो पुण्याचा असो वा नागपूर-नाशिकचा, पुण्याबद्दल त्याचं स्वतचं असं ठाम मत असतं. तो नागपूरचा असेल, तर त्याला या गावाचा हेवा वाटतो. नाशिकचा असेल, तर पुण्याला स्थायिक व्हावं असं वाटत असतं. पुण्यातल्या माणसाला, मग तो मूळ पुण्याचा असो वा नसो अपार असं कौतुक असतं. आता हे शहर बदललंय, तिथला माणूस बदललाय, असं सांगितलं तर विश्वास नाही बसायचा; पण माझ्या अनुभवांती सांगतो- पुणं बदललंय, पार बदललंय. हो, या शहराची ख्याती आता `आयटी सिटी’ अशी होऊ लागलीय; पण मला ते सांगायचंय ते हे नाहीय.
पुण्यातला माणूस अतिशय कामसू झालाय, सुसंवादी झालाय. हे मला सांगायचंय. काय? पटत नाही? मग त्यासाठी तुम्हाला पुण्यातल्या रस्त्यावर फेरफटका मारायला लागेल, माणसं पाहावी लागतील, त्यांचं निरीक्षण करावं लागेल…. हो, मी ते केलंय अन् पुणेरी माणसाची काही वैशिष्ट्येही आवर्जून नोंदवून ठेवलीयत. आता हेच पाहा ना. मी इथं पुण्यातल्या लॉ कॉलेज रोडला उभा आहे. अरुंद रस्त्यावरनं होणारी कसरत पाहातोय. तो युवक पाहिलात, मोटरसायकलवरचा? त्याची मान वाकडी झालीय. किंबहुना, त्यानं मान खांद्याला टेकवलीय… छे!छे! मोटरसायकलवर योगा करीत नाहीये तो… तो मोबाईलवर बोलतोय. पुण्यात राहायचं तर दुचाकीवरची कसरत हा तर स्थायीभाव झालाच; पण त्याला अलीकडे सतत जगाच्या संपर्कात राहावंस वाटू लागलंय. त्यासाठी तो वेळ घालवू इच्छित नाही. तो बोलू इच्छितो. फोन वाजला किंवा थरथरला, की तो लगेच कानाला अन् मान खांद्याला! पाहा जमतंय का? जमणारच नाही. कारण त्यासाठी पुणेकर होता यायला हवं. आता काही नवशिकेही असतात… एका हातानं मोटरसायकल चालवून संवाद साधत असतात. त्याच्या समवेत जाणाऱया `बुर्ज्वा’ मंडळींना त्याची भीती वाटते; पण तो मात्र संवादात मग्न असतो. एक काळ असा होता, की पुणेकर कधी कोणाचे `ऐकून घ्यायला’ तयार नसायचे. आता ते श्रवण अन् संवाद दोन्ही करतात. म्हणतात ना हे युग वेगवान आहे… हो आहे, अन् तो वेग टिकवायचा असेल, तर एवढं तरी करायलाच हवं की! वेगावरनं आठवलं…कधी काळी वर्ध्याच्या बजाजनी पुण्यात व्हेस्पा स्कूटर काढली.. आत ती लुप्त होतेय. कारण बजाजनंही आता पल्सर नामक वेगवान दुचाकी निर्माण केलीय. इतरही स्पर्धेत आहेतच. त्यामुळं गर्दीच्या रस्त्यावरनं वेगात कसं दौडत जावं हे पाहायला थोडं कर्वे रोडला किंवा जे. एम. रोडला जायला हवं. तुम्ही वळण्याचा विचार करीत असाल तेव्हा झूप्प !!! असा आवाज होईल नि एखादी करिश्मा तुम्हाला हवेचा झोत देऊन जाईल. तुम्ही दहा पावलं मागे गेलात, तर खुशाल समजा पुण्यात राहण्याची पात्रता तुम्ही गमावलीच. शेवटी वेगानं जायचं तर अडचणींवर मात करून किंवा अडचणींना बाजूला सारून जायला हवं. पुणेकरांमधला हा पुढे जाण्यातला बदल आज आंतरराष्ट्रीय क्षेत्रातही सहजी पाहायला मिळतो.
हे सारं करताना देशाच्या लोकशाहीचा विसर त्याला पडलेला नाही. संसदेत, विधिमंडळात जसा झिरो अवर असतो तसाच इथल्या रस्त्यावर प्रत्येक सिग्नलमध्ये एक झिरो सिग्नल असतो. तो केव्हा सुरू होतो आणि केव्हा संपतो, यासाठी चौक पार करण्याचा प्रयत्न करायचा… बस्स. तुमच्या लक्षात येईल, की संधी केव्हा आणि कशी साधायची. हे पुणेकरांपेक्षा इतर कोणाला कसे कळणार? आता एखादा नागपूरकर याला `संधीसाधू’ही म्हणेलही; पण म्हणो बापडा-पुणेकर मात्र रेड सिग्नललाही सहजी पार करू शकतो. अर्थात, या क्षेत्रात जुनेपुराणे पुणेकर अद्याप आहेतच. ते सिग्नललाही थांबतात; पण त्यांना पुढं जायचं असतं. त्यामुळे दिवा लाल असतांनाही ते सतत हॉर्न देत राहातात. याला कोणी काही म्हणो, मी मात्र त्याला पुणेकरांची अभिव्यक्ती म्हणतो. शेवटी 50 सेकंदाने का होईना, रेडचा ग्रीन सिग्नल होतोच की नाही? पुण्यातल्या बदलाचं आणखी एक व्यवच्छेदक लक्षण पाहायचं असेल, तर शनिवार-रविवारची सायंकाळ मोकळी काढायला हवी. बाहेरच भोजनाचा प्लॅन करायला हवा. मग डेक्कनला जा… सर्व हॉटेल्स तुडुंब भरलेली. अर्धा तास प्रतीक्षा! कर्वे रोड, टिळक रोडला हाच कालावधी तासावर जातो. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गाड्या म्हणजे क्लस्टर्स वाटावीत अशी. एखाद्या साखरेच्या दाण्याभोवती मुंग्या जमा व्हाव्यात तसं वाटतं; पण पुढे जायलाच हवं कारण आज घरातल्यांना विश्रांती दिलीय. पिझ्झा खावा तर तिथंही उभंच राहावं लागणार…..काय? घरी जाऊयात….? पुन्हा तेच. पुण्यातल्या माणसाची चिकाटी विचारात घ्या. तो थांबेल; पण गप्प बसणार नाही. आपल्या आप्त-नातलगांसह असणारा प्रत्येक माणूसही तुम्हाला सतत संवादात दिसेल. तो मित्रांना, सहकाऱयांना सांगत-विचारत असतो…हॅले, डेक्कनला फार गर्दी झालीय… कॅम्पात येऊ का?
— किशोर कुलकर्णी
Leave a Reply