2 दिवस जेट लॅगच्या नावाखाली झोपेशी स्ट्रगल चालूच होता. अखेर शेवटी बुधवारी मी नेहमीप्रमाणे मुंबई ऑफिस मध्ये गेले. माझे तिथे झालेले मित्र-मैत्रिणी खूप दिवसांनी भेटले. मनसोक्त गप्पा झाल्या. हे वातावरण मी लंडन मध्ये थोड मिस केलं होत. सर्वांशी पोटभर गप्पा मारून नेहमी प्रमाणे कामाला लागले.
नीलमने माझ्याकडून पासपोर्ट आणि फोटोज् घेतले. आणि माझ्या वर्क परमिटची प्रोसेस सुरू केली. आता खर तर मला फार घाई नव्हती. कारण गणपती अगदी थोडक्यावर आले होते.आणि ऊमेशने सांगितल्याप्रमाणे ३-४ आठवडे लागणार होते वर्क परमिट मिळायला. नेमके तेच दिवस होते गौरी-गणपतीचे! असो.
तो वर बसलेला ठरवेल सगळं, आपण कशाला टेन्शन घ्या. ‘He always has the best for us.’ आपणच काही छो्या छोट्या गोष्टी मागून त्याला अडचणीत टाकतो. त्याने खूप चांगलं काही तरी ठरवलेलं असतं आपल्यासाठी आणि आपण आपल खुजेपण दाखवून देतो छोट्या छोट्या गोष्टी मागून. देवावर सगळं सोपवून मी माझा कर्मयोग चालू ठेवला.
1-2 दिवसातच माझा नेहमीचा लाल डब्याच्या प्रवास सुरू झाला. ट्युब ट्रेन ते लाल डब्बा स्थित्यंतर कठीण होते. पण बस मध्ये नेहमीचे ओळखीचे चेहरे बघून मधले काही दिवस स्वप्नसारखे बाजूला सरकले गेले. त्यांनाही चॉकलेट्स दिली. लंडन हकीकत त्यांनी खूप उत्साहाने ऐकली. मुंबई पावसाच्या ईथल्या गमती-जमती त्यांनी सांगितल्या. खरं तरं त्यात गमतीचा भाग कमी आणि हाल जास्त असतात, पण ते सगळं अंगवळणी पडलं होतं. त्यातही चाकरमानी हसून साजरे करतात. एकदा खूप पाऊस होता आणि ट्रॅफिक जाम होतं. तर आमच्यातल्या एकाने खाली ऊतरुन सगळ्यांसाठी वडा-पाव आणला. अगदी ड्रायव्हर आणि कंडक्टरसाठी सुद्धा! अरेरे! मी मिस केलं ते थ्रिल! तू आहेस तोपर्यंत परत एकदा अस करुयात अस आश्वासन घेऊनच मी त्यांना चॉकलेटस् दिली.अशी आनंदाची देवाण-घेवाण करत परेल कधी आलं कळलं पण नाही.
उंची मुळे मी शाळेत बॅक बेंचेर असायचे. लाल डब्यात सुध्दा आमचा ग्रूप लास्ट बेंच वर असायचा. मागे बसून आम्ही खूप धमाल करायचो.
अशा मस्तीत आणि गणपतीच्या तयारीत दिवस चालले होते. आणि एक निराशाजनक बातमी आली. आमच्या नात्याने दूरच्या पण ठाण्यातच असल्यामुळे घनिष्ठ संबंध असलेल्या शिरीष काकांना लंग्ज कॅन्सर डिटेक्ट झालाय आणि तो हळू हळू आपले जाळे पसरतोय.
शिरीष काकांसरखे हसरे खेळकर आणि आमच्यात आमच्या वयाचे होऊन मिसळणारे व्यक्तिमत्त्व दुसरे नाही. त्यांनाच का? देवावरच्या श्रद्धेला थोडा धक्का लागला. सर्वच जण थोडे खिन्न झाले होते.
मला येऊन आता 2 आठवडे झाले होते. मी नेहमीसारखी ऑफिसला जात होते. लंडनच्या लोकांशी आणि आमच्या फ्रान्समधल्या निओशी मीटिंगज् थ्रू संपर्कात होते. कोणीच वर्क परमिटबद्दल, माझ्या परत इथे येण्याबद्दल काही बोलत नव्हते. इथे मुंबई ऑफिस मध्ये पण सारं काही थंडावल्यासारखे होते. जाणार आहे ना मी परत? कोणी काही मेल नाही करत आहे, अजून काही डॉक्युमेंट्स नाही मागतं आहे. काय विचार काय आहे? परत मनाची घालमेल. पण शिरीष काकांची तब्येत आणि गणपतीची तयारी ह्या दोन भिन्न गोष्टींनी मन गुंतवून ठेवले होते. माझा तिसरा आठवडा पण ह्यातच निघून गेला.
18 सप्टेंबर 2004 – शनिवार. गणपतीचा पहिला दिवस! पुण्याला घरी गणपतीचे दर्शन आणि आशीर्वाद घेतले. पुण्यात नातेवाईकांना भेटले. रविवारी पुण्याहून परत आलो. पुण्याहून येतानाच मला जरा सर्दी झाल्यासारखं वाटत होतं. पण जाईल 1-2 दिवसात. म्हणून मी औषध सुरू केली होती.आनंदाश्रममध्ये जाऊन, आईकडच्या गणपतींचे दर्शन घेतले.
20 सप्टेंबर 2004 – सोमवारी नेहमी सारखी ऑफिस मध्ये गेले. दुपारच्या सुमारास नीलम माझ्या डेस्क पाशी आली. आणि म्हणाली, तुझ आज काम होईल. तर तू आजच रात्री निघ! काय?
मी एकदम शॉकड्… जायचं हे माहित होतं. पण असं? नीलम पुढे म्हणाली, तुझा पासपोर्ट, व्हिसा, तिकीट आणि करंन्सी तुला अटेंडंट एअर पोर्ट वर रात्री 12 वाजता आणून देईल. तू आत्ता फोरेक्स् कार्ड घे झेराकडून आणि घरी जाऊन तयारी कर. तसही तुझा पासपोर्ट येई पर्यंत 7- 8 वाजतील. तितका वेळ कुठे थांबते? मला क्षणभर काही सुचलं नाही. हे म्हणजे एस. टी.स्टँड वर जा, आणि मिळेल ती एस. टी. पकडून पुण्याला जा असं वाटलं.
पटकन उमेश, परेशला मेल टाकली. झेराकडून कार्ड घेतले. आणि फ्रेंड्सना गुड बाय् करून टॅक्सी करून घरी आले. शैलेशला ही कळवले असल्यामुळे तो ही ऑफिस मधून निघालाच होता. ह्या वेळेस पॅकिंगच टेन्शन नव्हत. थोडे फार कपडे, गरम कोट, शूज-सॉक्स्, थंडीसाठी लोकरीचे हातमोजे, आणि सगळ्यात महत्त्वाचे, आईने माझ्यासाठी स्वत: विणलेले लोकरीचे पंपशूजच्या आकारचे मोजे आणि एक मोबाईल हँडसेट अस सगळ बरोबर ठेवलं. तोपर्यंत उमेश, परेश ह्यांनी पण काही गोष्टी मागवल्या होत्या. त्याचाही बंदोबस्त केला.
ह्या वेळेस कटाक्षाने मी फक्त हलकी सॅक पाठीवर ठेवली. हात पूर्ण मोकळे ठेवले. 2 बॅग्स चेक इन साठी ठेवल्या. एक थिन जॅकेट ठेवलं होतं तस वरती. सामान घेऊन सुचेतात आलो. नरेन-साक्षीने दिलेला चालता-फिरता दवाखाना होताच माझ्याबरोबर!
आम्ही सगळे जेवण करून आनंदाश्रमात गेलो. गौरी आगमन झालं होत आज! आजची आरती महत्त्वाची होती.खर तर गौरी जेवण हे आम्हा माहेरवाशिणींसाठी हक्काचं जेवण होत! मी त्याला मुकणार होते. पण देवाने माझी गौरी दर्शनाची ईच्छा पूर्ण केली होती. अजून काय हवे होते?
काकूने पटकन देवीसमोर ठेवतात त्यातलीच करंजी मला दिली. आमची गौर करंजीचा प्रसाद न खाता कशी जाईल लंडनला? तिच्या ह्या वाक्याने सगळ्यांचा एकमेकांमधील जिव्हाळ्याचा लंडनच्या राणीला पण हेवा वाटला असेल. नात्यांच्या आणि प्रेमाच्या बाबतीत मी खूप भाग्यवान आणि श्रीमंत होते. कदाचित राणीपेक्षाही!!
— यशश्री पाटील.
Leave a Reply