नवीन लेखन...

पुनर्जन्म (लघुकथा)

माझा तळहात फाटक गुरुजींच्या हातात देऊन मी अधीरतेने बसलो होतो. गुरुजी भलंमोठ्ठ भिंग हातात घेऊन माझ्या हस्तरेषांचे सूक्ष्म परीक्षण करत होते. गुरुजींचे चित्त एकाग्र होते, माझ्या हातावरील पकड मजबूत होती.गुरुजींची करारी भावमुद्रा, तीक्ष्ण नजर माझ्या हातातील भूगोलाचे अध्ययन करून माझा इतिहास सांगण्यात मश्गुल झाली. मला ऐकू येत होता तो त्यांचा करडा आवाज, लक्षात येत होती ती त्यांच्या आवाजातील जरब. ते जो माझा इतिहास सांगत होते, तो बराचसा खरा, कांहींसा खोटा आणि कांहींसा दोन्ही पारड्यात घालता येऊ शकेल असा लवचिक!

गेल्या वर्षभरात परिस्थिती ने माझी जी दैना केली होती, तीमुळे माझी बुद्धी बधिर आणि मन अस्थिर झाले होते. बऱ्याच नातेवाईक मित्राच्या मते तडकाफडकी निर्णय घेण्याच्या माझ्या स्वभावामुळे, मी एक बॅड पॅच मधून जात होतो. हे खरे हि होते, एक काळ असा होता, की मी तडकाफडकी निर्णय घेत होतो आणि यश माझ्या पदरात मोठे माप टाकत होते.या निर्णयक्षमतेमुळे विलक्षण वेगाने माझी प्रगती झाली आणि तशाच एक धाडसी निर्णयाने अधोगती.

याच अधोगतीला कुणी अपयश म्हणते तर कुणी बॅड पॅच. त्यावरून मला विन्स्टन चर्चिल चे एक प्रसिद्ध वाक्य आठवले…..If you are going thru bad time……keep going !

म्हणजे चर्चिलने मला ओरडून सांगितले होते, लेका,तू बॅड पॅच मध्ये चालत राहिलास, हात पाय हलवत राहिलास तर नक्की त्यातून बाहेर पडशील. हे कळूनही मी हात न हलवता एका ज्योतिषाच्या हाती देऊन गप्प बसलो होतो.

जणू कांही फाटक गुरुजी अंतर मंतर जंतर करुन माझ्या वक्री ग्रहाना ठीक करणार होते, या घरातील शनीला दोन घरे बाजूला ठेऊन या घरात गुरूची प्राणप्रतिष्ठा करणार होते.

प्रत्येकाच्या आयुष्यात किमान एक तरी ‘बॅड पॅच‘ येतो.शांत सुरळीत सुरु असलेल्या आयुष्यात काहीतरी बिघडतं, आर्थिक घडी विस्कटून जाते, ती सावरताना तारांबळ उडते, पुनः वेगवेगळ्या चूक घडतात आणि मग नात्यांमध्ये काहीतरी बिघडतं. गेल्या दहा वर्षात जी काम डोळे झाकुन केली तरी व्हायची, ती आता डोळ्यात तेल घालून, ढोर मेहनत करूनही होत न्हवती.

आर्थिक अडचणी वाढू लागल्या की नातेसंबंध बिघडू लागतात, ते सावरायचे कसे याचा विचार करताना स्वतःची प्रकृती ढासळू लागते.संकट येऊ लागली की एकाच वेळी अनेक बाजूनी येतात आणि अनेकांचे सल्ले मानून मी मारुतीला दर मंगळवारी लवंगांचा हार आणि शनिवारी शनिमंदिरात बाटलीभर तेल घालू लागतो.

हा असा बॅड पॅच आला की तो आपल्या आयुष्यात  कांही महिने किंवा कांही वर्ष हि रेंगाळतो.
आपलं आयुष्य आंतर्बाह्य हालवून टाकतो… जगणं नकोसं करुन सोडतो…

असा फाटक गुरुजींच्या हातात हात देऊन बसायची मला हौस का आहे ? पण अडला हरी….आपण जेव्हा संकटात असतो तेंव्हा आपल्याला दिला जाणारा प्रत्येक सल्ला आपल्याला ऐकणे भाग पडते. समोरच्याचा हेतू असतो की मी अडचणीतून बाहेर पडावे. माझाही हेतू तोच असते, पण माझी समोरच्याच मन दुखवण्याची कुवत नसते, खरेतर ऐपत हि नसते, मग सल्ला पटला नाही तरी ऐकला जातो. इतक्या गोष्टी केल्या, वाया गेल्या, हि करून बघू या आशेवर ती हि केली जाते. सल्ला हि अशी बाब आहे जी कधीच संपत नाही.दुसरं म्हणजे ज्याचं ठीक ठाक चाललंय त्याला माझ्या प्रॉब्लेम मधील कांही कळत नसलं तरी मी अडचणीत असल्याने सल्ला देण्याचा परवाना त्याला मिळालेला असतो.

आपण कितीही नको म्हणलं, टाळायचं ठरवलं तरी हा असा बॅड पॅच येतो. कुठेतरी एक चूक होते, कधी दुसरी होत नाही, तरी अडचणी येतात. कधी कधी पहिली चूक सांभाळताना दुसरी आणि तिच्यातून बाहेर पडताना तिसरी चूक होते. एका प्रवाहात आपण वहात असतो, कितीही हात पाय चालवले तरी प्रवाहाविरुद्ध पोहता येत नाही. दिशा बदलून,परिस्थिती शी जुळवून घेण्यासाठी समझोता करून प्रवाहसोबत वाटचाल करायचा प्रयत्न केला तरी, तो प्रवाह, क्रिकेटच्या गुगली सारखा वागतो आणि त्याचं नक्की काय चाललंय हे न कळून आपलीच विकेट जाते.

अरे, हे पैसे घेऊन भविष्य सांगणाऱ्यांचं काही खरं नसतं, आपण टकले गुरुजींना विचारुया. माझ्या एका मित्राने सल्ला दिला. कोण बाबा, हे टकले गुरुजी ? अरे ते खूप मोठे स्वामी भक्त आहेत, पी डब्ल्यू डी मध्ये इंजिनियर होते. निवृत्तीनंतर सगळ्यातून विरक्त झालेत, दमण ला स्थायिक झालेत. ते मार्ग दाखवतील. नको, दमण ला जाण्याची माझी कुवत नाही आणि माझ्यात शक्ती हि नाही.

अरे, जायचं नाही, फोन करून सांगायचं, ते फक्त संध्याकाळी ५ ते ६ मध्ये फोन घेतात, इतर वेळी त्यांची उपासना चालू असते.

बरोबर ५ वाजून ५ मिनिटांनी फोन केला, त्यांनी उचलला, माझ्या अडचणीची सुरवात कुठून झाली, कशी झाली हे त्यांनी ऐकले आणि शांतपणे म्हणाले, उपाय आहे, उद्या याच वेळी फोन करा सांगतो.

ती रात्र नवी आशा घेऊन आली, जी व्यक्ती मार्गदर्शन करणार आहे ती उच्चशिक्षित आहे, स्वामीभक्त आहे आणि अर्थार्जन हा हेतू नाही त्यामुळे जो सल्ला मिळेल तो योग्य मिळेल, या विश्वासाने मी रात्रभर कूस फिरवत राहिलो.

त्याच उमेदीत दिवस उजाडला,संध्याकाळची वाट पाहू लागलो. ५ वाजताच फोन केला. ते म्हणाले, तुम्ही असं करा, एखाद्या खाटकाकडे जा ….. माझ्या अंगावर काटा आला. सगळी हयात शाकाहरात गेलेली, खाटीक आणि मासळी बाजाराकडे मी जाऊ कशाला? शांतपणे ते म्हणाले, तिथं कापायला आणलेल्या एका शेळीचे प्राण वाचवा. माझ्या चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह त्यांनी जाणले आणि म्हणाले, ती शेळी तुम्ही विकत घ्या आणि पाळण्यासाठी एखाद्या शेतकऱ्याला द्या. मला बरं वाटलं, माझे दिवस बदलतील न बदलतील पण एक जीव वाचवण्याचं समाधान मिळेल.

दुसऱ्या दिवशी खाटका कडे गेलो, तिथे ८-१० शेळ्या बांधलेल्या. मी विचारले, यातली कापणार कोणती ? तो विचित्र नजरेने माझ्याकडे बघत म्हणाला, गिऱ्हाईक येईल तसं ओळींन सगळ्या ! मी शेळ्यांच्या कडे पाहिले, त्या माझ्याकडे खूप आशेनं पहात असल्याचं जाणवलं.जणू त्यांना कळले होते, की मी प्राण वाचवायला आलोय. मी खाटिकाला माझ्या येण्याचे प्रयोजन सांगितले, तो मंद हसला,म्हणाला कोणती देऊ ?
मी मोठ्या गहन संकटात अडकलो होतो, त्याहून हे संकट मोठे होते, दहा मूक जीव मला वाचवं म्हणून डोळे भरून आर्जव करत होते आणि मी मात्र एकाचाच जीव वाचवणार होतो.

शेळी निवडायची माझी कुवत न्हवती.मी त्या मूक पशूंच्या डोळ्यात पाहू शकत न्हवतो. मला त्या शेळ्यांची कींव, दया येता येता आता माझीच कींव येऊ लागली.जणू मीच एक खेळणं होतो नियतीच्या हातचं ! असहाय्य, अपंग, दुर्दैवी…. निर्णय घेताना कचवचणारं……

दुसऱ्या क्षणी मी निर्णय घेतला आणि त्याच क्षणी मला वाटलं माझ्या आयुष्यातील अडचणी किती क्षुद्र आहेत! किती क्षुल्लक आहेत !
व.पु.नी लिहिलेलं वाक्य आठवलं, जगातील कोणत्याही अडचणी/प्रश्न सोडवण्यासाठी तीन गोष्टी लागतात. माणसं, पैसा व वेळ.
माणसं आहेत, पैसे उभा करता येईल आणि वेळ मिळत जाईल.

माझे मन आत्मविश्वासाने भरून गेले होते. अडचणीत आल्यापासून खाली मान घालून चालणारा मी आज, ताठ मानेने घरी चाललो होतो आणि  तिथे बांधलेल्या सर्व शेळ्या आनंदाने माझ्या समवेत चालत होत्या.

मी टकले काकांना मनोमन धन्यवाद देत होतो. डोळ्यासमोर दिसत होत्या धूसर होत जाणाऱ्या माझ्या अडचणी आणि ठळकपणे दिसत होते अनेक मार्ग ! जे मला अडचणीतून बाहेर काढणार होते, मला पुन्हा यशो शिखरावर नेणार होते. नवी आशा, नवी उमेद यामुळे माझा गमावलेला आत्मविश्वास परत आला होता, जणू या सर्व शेळ्यांच्या बरोबर, माझा पूर्वजन्म झाला होता !

© अरविंद टोळ्ये
९८२२०४७०८०
(संपूर्णतः काल्पनिक)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..