“दैवजात दुःखे भरतां दोष ना कुणाचा,
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.. दोष ना कुणाचा..”
हे बाबूजींचं गाणं ऐकत स्मिता खिडकीत विचार करत उभी होती. तिची पण अशाच प्रकारची अवस्था झाली होती. सौ. स्मिता अमोल तावडे एका खासगी शाळेत गणित विषयाची शिक्षिका होती. तिची साधारणतः २०-२२ वर्ष नोकरी झाली होती. घरी तिचा नवरा तिला खूप सपोर्ट करणारा आणि अगदी प्रेमळ होता. अमोल लहान असतानाच तिचे सासरे गेले. तेव्हा तिच्या सासूबाईंनी खमकेपणाने अमोलला सांभाळलं. सासऱ्यांच्या जागी बँकेत कामाला लागून नोकरी केली. असं अमोल आपल्या आईविषयी सर्वांना अभिमानाने सांगायचा. त्यामुळे स्मिताच्या सासूबाईंना नोकरी करण्याचं महत्त्व माहिती होतं. त्याही नोकरी करत असताना आणि नंतर स्वेच्छानिवृत्त्ती घेतल्यावरही स्मिताला पूर्ण सहकार्य करायच्या. स्मिताचा मुलगा नीरवला त्यांनी खूप छान सांभाळलं. त्यामुळे स्मिताला एकमार्गी नोकरी करता आली. पण अचानक ३ वर्षांपूर्वी स्मिताच्या सासूबाईंना मणक्याचं कधीही भरून न येणार दुखणं निघालं आणि सगळं घर कोलमडलं.
ज्या दिवशी त्यांना हे कळलं त्यानंतर आठवडाभर स्मिता ने तारेवरची कसरत करून बघितली. पण तिलाही आजपर्यंत कायमच सासूबाईंचा भक्कम पाठिंबा होता त्यामुळे सगळं एकटीने करायची वेळच आली नाही. शिवाय सासुबाईंकडे म्हणावं तितकं लक्ष देता येत नव्हतं याची बोच तिला सतावत होती. शेवटी आठवडाभराने तिने सगळ्यांना बसवून सांगून टाकलं, “आई, अमोल मी एक ठरवलं आहे. आणि उद्या जाऊन त्या निर्णयाची पूर्तता करणार आहे.” स्मिताच्या सासूबाई म्हणजेच कुमुदताई आणि अमोल एकमेकांकडे नुसतेच बघत बसले. तसंही कुणालाच काही दिवसांपासून काहीच सुचत नव्हतं. त्यात आता ही काय सांगते यावर दोघे विचार करत बसले. तेव्हा स्मितानेच सांगितलं, ” मी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अजून नोकरीची चांगली १०-१२ वर्ष शिल्लक आहेत. पण तरी मला हा निर्णय घेण्यावाचून काहीच पर्याय दिसत नाहीये. आई आता तुमच्या आजारपणात तुम्हाला माझी जास्त गरज आहे आणि त्यासाठी मी हा निर्णय घेत आहे. मी ही आता विशीत नाहीये की सगळीकडे हिरीरीने धावेन आणि शरीर काहीच कुरबुर करणार नाही. त्यामुळे मला नोकरी सोडण्याचा धाडसी निर्णय घेणं क्रमप्राप्त आहे.” तिच्या शेवटच्या शब्दांमध्ये असलेली हतबलता आणि डोळ्यातून नकळत वाहणारी अगतिकता दोघांना खूप काही सांगून गेली. त्यावेळी कुमुदताई आणि अमोल दोघांनी वेगवेगळे पर्याय सुचवले. पण हिला कुठल्याही बाईच्या ताब्यात सासूबाईंना द्यावं असं वाटत नव्हतं. शेवटी कामाला ठेवलेली बाई आणि सून यात आपणच जास्त चांगलं करू हा विश्वास तिला होता. आणि अखेर तो निर्णय तिने सगळ्यांच्या गळी उतरवलाच. सासूबाईंना कोण आनंद झाला. अशी सून मिळणं खरंच भाग्याचं. नाहीतर आजकाल कुठे करतात सूना. त्यात नोकरी सोडायला लागतेय म्हंटल्यावर तर अजिबातच नाही. अमोल आणि नीरव आपापली नोकरी आणि शिक्षण सांभाळून जमेल तशी मदत करत होतेच. कुमुद ताई मात्र सगळ्या येणाऱ्या जाणाऱ्यांना सुनेचं कौतुक सांगत रहायच्या. इतकं सगळं करूनही त्यांची तब्येत म्हणावी तशी सुधारत नव्हती हीच काय ती चिंतेची बाब होती. सहा महिन्यांपूर्वी स्मिता आणि अमोल रात्री झोपेत असताना अचानक कुमुद ताईंचा जोरात ओरडण्याचा आवाज आला. दोघे तडक पोहोचले आईच्या खोलीत. पण देवाजीच्या मनात वेगळेच होते. कुमुद ताईंचा जीव कुडीतून केव्हाच बाहेर पडला होता.
हे सगळं आत्ता ही आठवून स्मिताला भरून येत होतं. त्यात बाबूजींच्या गाण्याचे बोल तिला आणिकच विद्ध करत होते. किती खरं आहे. आपण नोकरी सोडली, सासूबाईंना काय हवं नको ते सगळं केलं पण त्यांच्या शेवटच्या क्षणी काही म्हणजे काही करू शकलो नाही आपण. खरंच किती पराधीन आहोत आपण. आयुष्यभर नुसतंच मी आणि माझं करत बसतो पण जातानाचे क्षण कसे असतील याबाबत काहीही आपल्या हातात नाही. “मी पणा” इथेच सोडून जावं लागतं. असा निराश विचार करतच ती कामाला उठली.
आताशा स्मिताला घर खायला उठत होतं. नीरव आणि अमोल दोघेही नोकरीवर जात होते. आणि अख्खा दिवस हिला भकास रिकामा वाटायचा. असं रिकामं बसण्याची सवयच नव्हती तिला पहिल्यापासूनच. काहीतरी वेगळं, नवीन करावं असं तिला सारखं वाटत होतं. याबाबत रात्री जेवण झाल्यावर तिने अमोलकडे विषय काढायचं ठरवलं. जेवणं झाली. थोड्या वेळाने नीरव त्याच्या खोलीत जाऊन झोपला. आता आजीची खोली त्याला मिळाली होती त्यामुळे तो खोलीतच जास्त असायचा. अमोल खिडकीतून बाहेर बघत उभा होता तेव्हाच स्मिता ने विषय काढला. “अमोल, मला तुझ्याशी बोलायचं आहे.” त्यावर अमोल लगेच मागे वळून म्हणाला, “अगं, खरंतर मलाही तुझ्याशी परवापासून बोलायचं आहे. पण कसं बोलू तेच कळत नाहीये.” “का रे काय झालं. बोल ना. काही त्रास आहे का नोकरीत. जाऊदे अशीही दोन तीनच वर्ष राहिली आहेत. काढ कशीतरी करत.” त्यावर अमोल म्हणाला, ” अगं कुठून कुठे पोहोचतेस तू! मला माझ्या नोकरीबद्दल नाही, तुझ्या नोकरीबद्दल बोलायचं आहे. तू घरात एकटीच असतेस. एखादी साधीशी नोकरी का नाही बघत तू. आपल्याला पैशांची गरज नाहीये पण तुझा वेळ जाईल चांगला म्हणून म्हणतोय. आता आईची जबाबदारी पण नाहीये.” स्मिता अवाक झाली. “अरे, कसली टेलीपथी आहे. मी ही याच बाबतीत बोलणार होते. नाही म्हणजे नोकरी करण्यासंदर्भात नाही. आणि आता अशीही मला या पन्नाशीत कोण देणार नोकरी. त्यापेक्षा माझ्या डोक्यात एक कल्पना आहे. मी आशू सोबत काम करायचं असं ठरवलं आहे.” अमोल विचारात पडला. त्यावर स्मिताच पुढे बोलली, “अरे असं काय? आशू म्हणजे अश्विनी रे. माझी मैत्रीण. तिने वर्षभरापूर्वीच मला तिच्या अनाथालयात मदतीला येशील का विचारलं होतं. तेव्हा आईंचं सगळं करायला लागायचं म्हणून मी नाही म्हणाले. पण तिला अशा मदतनीस सारख्याच लागतात. मी तिथे गेले तर माझा वेळ जाईल त्या मुलांच्यात. आणि त्यांना माझ्या शिक्षकी पेशाचा छान उपयोग होईल. काहीतरी विषय शिकवता येईल मला. नाहीतर माझा हातखंडा असलेला विषय गणित आहेच. तो तर मुलांना भविष्याच्या दृष्टीने शिकवायला हवाच. मला ही छान वाटेल शिकवल्याने. शेवटी ज्ञानदान श्रेष्ठ दान. कशी वाटते आहे कल्पना?” अमोलला ही कल्पना खूप आवडली. त्याने हळूच स्मिताला जवळ घेत कानात कुजबुज केली, “हो! तू नक्कीच जा तिकडे. होऊन जाऊदे आमच्या बाईसाहेबांचा पुन:श्च हरिओम. आणि आता काय मॅडम म्हणतील ते ऐकायलाच लागेल. नाहीतर रात्र खराब जाईल ना माझी.” त्यावर स्मिता त्याच्या कुशीत शिरत म्हणाली, ” चल चावट. तुला तर चान्सच हवा असतो मला चिडवण्याचा आणि जवळ घेण्याचा.”
स्मिता च्या मनात आज बरेच वर्षांनी नवी आशा पल्लवित होत होती. पुन्हा त्याच जोमाने ती सज्ज झाली होती. आणि तिला खात्री होती तिच्या सासूबाई असत्या तर त्यांना स्मिताचा हा निर्णय नक्कीच आवडला असता…
ll शुभं भवतु ll
सौ. अतुला प्रणव मेहेंदळे
Leave a Reply