आज बारा जुलै : पानशेत धरण फुटीच्या आधीचे अर्थात बुधवार दिनांक बारा जुलै एकोणीसशे एकसष्ठ पूर्वीचे पुणे !
पुणे येथील पानशेत धरण फुटलेल्या घटनेला आज पंचावन्न वर्षे पूर्ण झाली ! बुधवार दिनांक बारा जुलै एकोणीसशे एकसष्ठ, त्यादिवशी दिव्याची आवस होती ! एवढा काळ लोटला, तरीही माझ्यासारख्या जुन्या पुणेकरांच्या मनात पानशेत धरणफुटीच्या त्या भयानक आठवणी अजुनीही विस्मुतीमध्ये गेल्या नाहीत.
मी तर तेव्हां डेक्कन जिमखान्यावरील डे जि भावेस्कूलमध्ये [आत्ताचे सौ विमलाबाई गरवारे प्रशाला] शिकत होतो. त्यावेळी पुण्याला शांत पुणे, पेन्शनरांचे पुणे, सायकलींचे पुणे, अश्या विविध चांगल्या विशेषणांनी संबोधले जायचे. पर्वती, पद्मावती, विठ्ठलवाडी, कोथरूड, ही ठिकाणे पुणे शहरापासून खूप दूर मानली जायची. सुट्टीच्या दिवशी, आलेल्या पाहुण्यांना पेशवे पार्क, तळ्यातला गणपती (आत्ताची सारसबाग) दाखवायला न्यायचे म्हणजे, आपण किती लांब आलो, असे वाटायचे. पौषाच्या महिन्यात पद्मावती येथे आवळीभोजनाला जायचो. कार्तिकी एकादशीला विठ्ठलवाडीला शाळेची सहल जायची. तेव्हा ह्या ठिकाणी बसची सोय नव्हती.
आप्पा बळवंत चौक ते डेक्कन जिमखाना बसचं तिकीट फक्त पाच पैसे होतं, आम्हां शाळकरी मुलांचा महिन्याचा तेव्हां बस पास काढला जायचा फक्त दीड रुपयात ! पुण्यात एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये रिक्षा आली, तथापि रस्त्यावर मोठी वर्दळ होती ती सायकलींची, हं, प्रवाशांकरिता वाहन म्हणजे घोड्याचा टांगा ! शनिवार पेठेतून, शिवाजीनगर एसटी बस स्टँडला जाण्यासाठी टांगेवाल्याला फक्त चार-सहा आणे द्यावे लागायचे, अर्थात तेव्हां ते सुद्धा जास्त वाटायचे.
संध्याकाळी शनिवारवाड्यापुढील पटांगणात नामवंतांची व्याख्याने ऐकायला मिळायची. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, ह्यांची ऐकलीली श्राव्य अशी व्याख्याने आजही आमच्या कानामनात घुमत आहेत. गणेशोस्तव साजरे व्हायचे, मेळे भरायचे, त्यामध्ये पं भीमसेनजी जोशी, गजाननराव वाटवे, ज्योत्स्ना भोळे, सरस्वती काळे, बी सायन्ना पार्टी, ह्यांच्या गाण्यांचे कार्यक्रम व्हायचे. गणपतीमध्ये मंडळांतर्फे रस्त्यावर चित्रपट पाहायला मिळायचे.
उन्हाळ्यामध्ये कुठल्याही रसवंतीगृहात जा, पाच पैशात अर्धा ग्लास, तर दहा पैशात फुल ग्लास रस निवांतपणे पिउन आनद लुटत होतो. फक्त चार आण्यात म्हणजेच पंचवीस पैशात आईसप्रोट – कुल्फी मिळायची. शनिवारवाड्यावर चार आण्यात मस्त भेळ मिळायची !
मंडई मध्ये गेल्यावर एक-दोन रुपये देऊन पाच-सहा पिशव्या भरून भाजी आणली जायची. गोडेतेलाचा भाव दहा आणे शेर झाला म्हणल कि, अरे बापरे, असे वाटायचं ! दिवाळीमध्ये फक्त दहा रुपयात, दहा पिशव्याभरुन फटाके आणले जायचे. घरातील सर्व भावंडांमध्ये ते वाटूनसुद्धा, थोडे बाजूला ठेवले जायचे, ते तुळशीच्या लग्नाला शिल्लक ठेवले जायचे.
अगदी मनापासून, प्रांजळपणे सांगू कां ? तेव्हां आमच्या पिढीने अनुभवली ती मनाची श्रीमंती, आता दिसतीय ती पैशाची !
— उपेंद्र चिंचोरे
Leave a Reply