जगातील कोणत्याही देशाच्या नागरिकाच्या ‘तुम्ही कुठले?’ या प्रश्नाला जेव्हा ‘मी पुणेकर!’ असं उत्तर मिळतं तेव्हा समोरची व्यक्ती त्याच्याकडे आदराने पाहू लागते. इतकी पुणेकरांच्या मागे ‘पुण्याई’ उभी आहे…
पुणे म्हणजेच पूर्वीचं ‘पुनवडी’ला शतकांपासूनचा इतिहास आहे..अगदी ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, पेशवे, टिळक, आगरकर पासूनचा!
शिवाजी महाराजांचं बालपण इथंच लाल महालात गेलं. मोठेपणी शाहिस्तेखानाला धडा त्यांनी इथंच शिकवला. त्यावेळपासूनचं ग्रामदैवत कसबा गणपती आजही पुणेकरांचं ‘आराध्य दैवत’ आहे!
पेशवेंच्या काळामध्ये शनिवार, नारायण, सदाशिव अशा पेठा वसवल्या गेल्या. कालांतराने या पेठा पुण्याचं ‘भूषण’ ठरल्या. इथं ज्ञानी, बुद्धिमान लोकांनी वास्तव्य केलं. त्यांचं राहणीमान आणि वर्तणूक ही शिस्तबद्ध व व्यवहारी होती. पुढे ही एक प्रकारची ‘प्रवृत्ती’च झाली. या वेगळेपणालाच ‘पुणेकर’ हे नाव पडले.
स्वातंत्र्यानंतर पुण्यातील सर्व जाती-धर्मांतील जे मूळ रहिवासी होते, ते अस्सल ‘पुणेकर’च होते. त्यांना पुण्याचा सार्थ अभिमान होता. सरकारी नोकरी किंवा व्यवसाय करुन ते सुखी समाधानी होते. सांस्कृतिकदृष्ट्या पुण्याचा विकास होत होता. संगीत नाटकं, मराठी चित्रपट यांना चांगले दिवस होते. अनेक नामवंत महाविद्यालयातून नवीन पिढी शिक्षण घेत होती. शनवार वाड्याच्या पटांगणात नामवंतांची व्याख्यानं, जाहीर भाषणं होत होती.
सर्व काही आलबेल असताना १९६१ साली पानशेत धरण फुटलं आणि पुणं वाहून गेलं. पुण्याचं आर्थिक, सामाजिक, भौतिक सर्व प्रकारचं भरुन न निघणारं नुकसान झालं. काही वर्षांतच पूरग्रस्तांसाठी नवीन वसाहती निर्माण झाल्या आणि पुणं पसरत गेलं. जिथं उजाड, मोकळी माळरानं होती तिथंही वस्ती वाढू लागली. वाडे जाऊन इमारती उभ्या राहू लागल्या. जे सूज्ञ पुणेकर होते, ते उपनगरात जाऊन राहू लागले.
१९६५ सालच्या भारत पाक युद्धाचे वेळी शहरात रात्री कटाक्षानं ब्लॅकआऊट पाळलं जात असे. घरातील उजेड बाहेर रस्त्यावर पडू नये म्हणून पुणेकर घरातील खिडक्यांना वर्तमानपत्रांचे कागद चिकटवयाचे. रात्री भोंगा वाजला की रस्त्यावर चिटपाखरूही दिसत नसे. विमानांचा घोंगावणारा आवाज आला की, सर्वांना धडकी भरत असे.
१९७१ साली देखील अशीच परिस्थिती होती. कर्फ्युमुळे कडक संचारबंदी पाळली जायची. हे सर्व पुणेकरांनी अनुभवलेले आहे.
७२ सालच्या दुष्काळात रेशनिंगवर मिलो मिळायचा. त्याच्या तांबूस दिसणाऱ्या भाकरी खाऊन तेव्हा पुणेकरांनी दिवस काढलेले आहेत.
याच दरम्यान कोरेगाव पार्क परिसरात आचार्य रजनीश यांचा आश्रम होता. त्यांचे अनुयायी भगवी वस्त्र परिधान करून शहरात फिरताना दिसायचे. परदेशातील, विशेष करुन अमेरिकेतील त्यांच्या शिष्यांना पहाण्यासाठी तरुणवर्ग त्यांच्या आश्रमाभोवती घिरट्या घालत असे.
नंतरच्या वीस वर्षांत पुणे अस्ताव्यस्त पसरले. पिंपरी-चिंचवड हा भाग औद्योगिक परिसर म्हणून ओळखला जाऊ लागला. सिंबाॅयसिस सारखी काॅलेजेस पुण्यात, परदेशी विद्यार्थ्यांसाठी सुरु झाली. साहजिकच पाश्र्चात्य संस्कृती फर्ग्युसन रोडवर दिसू लागली. परराज्यातून आलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचं अंधानुकरण केलं.
हळूहळू पुण्यातील उपहारगृहांची संख्या कमी होऊन मॅक्डोनल्डची हाॅटेलं वाढू लागली. स्मोकिन, डाॅमिनंटचा पिझ्झा आणि पास्ता या फ्रेंच पदार्थांनी घुसखोरी केली. उच्च मध्यमवर्गीय आणि श्रीमंत वर्ग या महागड्या पदार्थांना बळी पडला. जंगली महाराज रोडवरील टुमदार बंगल्यांची ओळीनं आधुनिक हाॅटेलं झाली. अमृततुल्य मध्ये फार तर वीस रुपयांत मिळणारी काॅफी चंगळवाद्यांसाठी ‘सीसीडी’च्या अनेक शाखांमधून तीनशे रुपयांहून अधिक किंमतीला मिळू लागली.
२००० पासून पुणे हे पूर्णपणे बदलून गेलं. ‘विद्येचं माहेरघर’ ऐवजी सर्वधर्मसमभावाच्या गर्दीचं ते ‘सासर’ झालं! भारतातील अनेक राज्यांतून शिक्षण घेण्यासाठी जे विद्यार्थी आले ते शिक्षण पूर्ण झाल्यानंतर इथेच नोकरीला लागल्यावर, पुन्हा आपल्या राज्यात गेलेच नाहीत. परिणामी पुणेकरांमध्ये ही बाहेरची भर पडून पुण्याची लोकसंख्या अवास्तव फुगली.
पुणे शहराच्या शेजारील अनेक जिल्ह्यांतून नोकरी, व्यवसायासाठी आलेली कुटुंब पुण्यातच स्थायिक झाली. काही वर्षांनंतर त्यांनी ‘आम्ही सातारकर’, ‘आम्ही नाशिककर’, ‘आम्ही ठाणेकर’ अशा मित्र मंडळांची स्थापना केली. आपल्या भागातून पुण्यात येऊन यश, कीर्ती मिळविल्याबद्दल या मंडळांनी त्यांचे पुरस्कार देऊन भव्य सत्कार केले. पुणेकरांनीही अशा कर्तबगार व्यक्तींना ‘पुणे भूषण’ पुरस्कार देऊन गौरविले.
पुणेकर सांस्कृतिक कलाकारांचे कौतुक करण्यात नेहमीच अग्रेसर असतात. चित्रपटांच्या सर्वोत्कृष्ट जाहिरातीसाठी तीनवेळा राज्य पुरस्कार मिळाल्याबद्दल चित्रपट महामंडळ, पुणे शाखा व रोटरी क्लब, पुणे या संस्थांनी आम्हा बंधूंचा सत्कार केला होता.
मुंबईतील बाॅम्बस्फोटानंतर कित्येक जण मुंबई सोडून पुण्याचे रहिवासी झाले. पुण्यातील जागा भाड्याने देणे-घेणे व्यवहारामध्ये अमराठी दलालांनी
जागेच्या किंमती कमिशन जादा मिळावे म्हणून भरमसाठ वाढवल्या. सर्व सामान्यांना हे भाडे परवडणारे नव्हते. त्यामुळेच पुणेकरांनी लांब उपनगरात जाऊन रहायला सुरुवात केली. जे धनिक होते ते शहरातच राहिले. साहजिकच शहरातील पुणेकरांची संख्या इतरांच्या मानाने कमी होत गेली.
युपीएससी, एमपीएससीच्या परीक्षा देण्यासाठी पुण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या फारच मोठी आहे. त्यांच्यासाठी अनेक अॅकॅडमींची पुण्यात स्थापना झाली. त्यांच्या कार्यशाळा चालूच असतात. पुण्यावर हा अतिरिक्त बोजा पडल्याने पुणे जे फक्त रविवारी गर्दीचे दिसायचे ते आता कायमस्वरूपी गर्दीचे दिसू लागले.
पुण्यामध्ये मगरपट्टा व हिंजवडीला ‘आयटीक्षेत्र’ वाढल्यामुळे पुणे बदलून गेले. पुणेकर खरेदी करताना विक्रेत्याशी नेहमी घासाघीस करायचा, तेच आता आयटीवाला वाट्टेल तेवढे पैसे द्यायला मागेपुढे पहात नाही, साहजिकच पुणेकर खरेदी करताना संकोचू लागला.
कोरोनाच्या संसर्गामुळे आता गेले दोन वर्ष पुणे शहराला मरगळ आलेली आहे. ज्यांचं हातावर पोट आहे, ते हतबल झाले आहेत. ज्यांना पेन्शन आहे, ते कसेबसे दिवस काढताहेत. जे आयटीवाले आहेत, ते घरात बसून काम करताहेत. आजपर्यंत एवढ्या संकटांतून बाहेर पडलेला पुणेकर कधीही हरणार नाही. कोरोनाचं सावट गेल्यावर तो पुन्हा ताठ मानेनं उभा राहिल… कारण तो ‘हाडाचा पुणेकर’ आहे…
© – सुरेश नावडकर
मोबाईल : ९७३००३४२८४
११-५-२१
खरंय …. हाडाने आणि मनाने पुणेकर असणारा माणूस कधी हरूच शकत नाही….