राजा शिवछत्रपती
छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ जाऊन आज साडे तीनशे पेक्षा जास्त वर्ष झाली, तरीही इतिहासातील त्यांचा मान आणि स्थान याला अजूनही धक्का लागलेला नाही. इतिहासाच्या पानात आणि रयतेच्या मनात निरंतर राज्य करणारा राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना संबोधले जाते.आंतरराष्ट्रीय कीर्तीचे राजे आणि जागतिक दर्जाचे योद्धे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख आहे.लोककल्याणकारी नेता, धुरंधर सेनानी, कर्तव्यनिष्ठ राजा म्हणून महाराजांना उपमा दिली जाते. आदर्श पुत्र, सावध नेता, कुशल संघटक, दुर्जनांचा कर्दन काळ, एका नव्या युगाचा निर्माता, रयतेचा राजा, बलाढ्य योद्धा असे व्यक्तिमत्त्वाचे कितीतरी तेजस्वी पैलू आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकारणातून आणि पराक्रमातून आपल्याला दिसून येतात. समतेचा दाता, धर्म सहिष्णुपणाचा उद्गता म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख आहे.
जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेचे माजी. राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा म्हणतात, जर छत्रपती शिवाजी महाराज आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही त्यांना सूर्य असे संबोधले असते. भारताच्या स्वतंत्र संग्रामात महत्वपूर्ण भूमिका निभावणारे,आझाद हिंद सेनेचे थोर संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात, भारताला जर स्वतंत्र मिळवून द्यायचे असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या युध्दनीतीने लढणे. ज्या इंग्रजांनी तब्बल दीडशे वर्ष राज्य केलं त्या इंग्रजांचा इंग्रज गव्हर्नर म्हणतो, जर छत्रपती शिवाजी महाराज अजून दहा वर्ष जगले असते तर आम्हा इंग्रजांना संपूर्ण हिंदुस्तानचा चेहरा देखील पाहता आला नसता.
व्हिएतनाम देश..! अगदी आपल्या मुंबई शहरापेक्षा क्षेत्रफळाच्या दृष्टीने लहान असलेला देश..! तब्बल वीस वर्षे व्हिएतनामशी चाललेल्या युद्धात बलाढ्य अमेरिकेला हार पत्करावी लागली. मिळालेल्या मोठ्या विजयानंतर व्हिएतनाम देशाच्या राष्ट्राध्यक्षांना एका मुलाखती मध्ये विचारणा करण्यात आली.त्यांनी दिलेल्या उत्तराने निश्चितच आपणास अभिमान वाटेल, ते म्हणाले.. युद्धाच्या कालखंडात माझ्या हाती मला एका महान योद्धाचं चरित्र होत..आम्ही त्या चरित्रातील युद्ध – निती अवलंबली..आणि आम्हाला आमचा विजय दिसून आला.. तो महान राजा आमच्या देशात जन्माला आला असता तर आम्ही संपूर्ण जगावर राज्य केलं असतं.. तो राजा म्हणजेच राजा शिवछत्रपती..!
थोर विचारवंत आणि राष्ट्रपुरुष स्वामी विवेकानंद म्हणाले होते,छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही, तर आजच्या तरुण पिढीसाठी ती एक ऊर्जा आहे जिचा वापर हिंदुस्थानला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी होऊ शकतो.
शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या साक्षीने अगदी मुठ्ठभर मावळ्यांना सोबत घेवून राज्य निर्माण केलं आणि त्यास नाव दिलं स्वराज्य…. स्वराज्य…? म्हणजे स्व- स्वतःचं…स्वतःचं राज्य..निर्माण केलं. का बरं नाव दिलं असेल महाराजांनी स्वराज्य..? ज्यावेळी कोणीही या नावाचा उच्चार करेल.. त्यावेळी स्वतःचं राज्य म्हणजे माझं राज्य…. याचा असा उल्लेख होईल म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यास स्वराज्य असे नाव दिले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी साडे तीनशे पेक्षा जास्त किल्ले स्वराज्याला जोडले. त्यांपैकी एकशे अकरा दुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या 50 पन्नास वर्षांच्या कालखंडात उभे केले.
स्वराज्य हे एका दिवसात तयार झाले नाही, स्वराज्य हे अनेक मावळ्यांच्या बलिदानाने तयार झाले आहे. शीर धडावेगळे झाले तरी लढत असणारा बाजी असो किंवा कोंढाणा सर करणारा तानाजी…! अवघ्या साठ मावळ्यांना सोबत घेऊन पन्हाळा घेणारा कोंडाजी असो किंवा पुरंदरावर पाचशे मावळे घेऊन लढणारा मुरारबाजी..! शिवकाळ असा काळ होता जिथं माणसं स्वतःच्या स्वराज्यासाठी लढत राहिली. स्वराज्यासाठी मारायला आणि मरायला मागेपुढे बघत नव्हती.
काळ्याकुट्ट अंधारातून दिशा काढत, पारतंत्र्याच्या जोखडातून, गुलामीच्या वस्तीतून स्वातंत्र्याची दिशा काढत कसे स्वतंत्र मिळवावे याचे तंतोतंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज…! छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आजच्या तरुणाई साठी एक नवी ऊर्जा, प्रेरणा, स्वाभिमान आणि अभिमान..!
इतिहासातून इतिहास घडविता येतो, एवढाच आशावाद वक्त करण्याचा प्रयत्न..! स्वराज्याच्या थोरल्या धन्याला मानाचा मुजरा..
जय जिजाऊ जय शिवराय..!
— कु. प्रज्वल सुनिल धुमक
Leave a Reply