![p-78140-puravyane-shabit](https://www.marathisrushti.com/articles/wp-content/uploads/sites/3/2021/06/p-78140-puravyane-shabit.jpg)
माझं लहानपण सदाशिव पेठेत गेलं. पावन मारुती चौकातच शेडगे आळीकडे वळल्यावर करडे यांचं भांड्यांचं दुकान होतं. माझ्या आईने पुण्यात आल्यापासून वाचवलेल्या पैशांतून आवश्यक ती स्वयंपाकाला लागणारी भांडी खरेदी केली. कधी ताट-वाटी तर कधी डबा-पातेले. कोणत्याही वस्तूची खरेदी झाली की, त्यावर ती न विसरता नाव आणि तारीख टाकून घ्यायची. करडेमामांचं अक्षरही सुरेख, सुवाच्य होतं. ते एनग्रेव्हींग मशीनने ‘काशिनाथ रावजी नावडकर १-९-१९७०’ असं नाव आणि तारीख टाकून द्यायचे. कधी आम्हा बंधूंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एखादा स्टीलचा डबा ती खरेदी करीत असे, त्यावेळी ती वस्तू आठवणीत रहावी म्हणून आमचं नाव व तारीख त्यावर टाकून घेत असे.
भांड्यांवर नाव टाकण्यामागे कारण असं असायचं की, कधी शेजारी पाजारी ते भांडं काही वस्तू घालून दिलं, तर ते सहज परत मिळावं व त्याची त्यांच्या भांड्यात सरमिसळ होऊ नये म्हणून…त्यावर नाव असल्याने आपण ते भांडे आपलेच आहे, हे ‘पुराव्याने शाबित’ करु शकतो..
मंडई जवळील रामेश्वर चौकात गेलं की, ओळीने भांड्यांची भरपूर दुकाने आहेत. तिथे अॅल्युमिनियम, हिण्डालियम, तांब्याची, स्टीलची, पितळेची भांडी मिळतात. अॅल्युमिनियमची पातेली एकात एक अशी पंधरा-वीस घालून ती तिरपी ठेवलेली असतात. त्यांची झाकणं बाजूला ठेवलेली असतात. हल्ली वापरात नसलेला, आकर्षक तांब्याचा पाणी तापविण्याचा बंब हा आजही आपलं लक्ष वेधून घेतो. स्टीलच्या कळशा एकावर एक रचलेल्या असतात. ठोक्याचे तांब्याचे हंडे, तपेली, पिंप पहात रहावेसे वाटतात. स्टीलच्या व पितळेच्या बादल्या दुकानात वरती टांगलेल्या असतात. बाहेर अॅल्युमिनियमच्या, स्टीलच्या मांडण्या उभ्या केलेल्या असतात. आतमध्ये गेल्यावर ताटं, वाट्या, पेले, तांबे, पराती, किटल्या, डबे, जग, झारे, उलथानी, पक्कड, किसण्या, टिफीनचे डबे, इत्यादींनी दुकान गच्च भरलेले असते.
पूर्वी या भांड्यांच्या दुकानाबाहेरील फळीवर पोतं टाकून भांड्यांवर नावं टाकून देणारा बसलेला दिसे. त्याच्या एका हातात एक टोकदार खिळा व दुसऱ्या हातात छोटी हातोडी असे. तो कळशी आपल्या दोन पायांमध्ये पकडून त्यावर सांगितलेले नाव सुवाच्य अक्षरात टाकत असे. नावाची चिठ्ठी एकदा त्याला लिहून दिली की, लग्नासाठी खरेदी केलेल्या सर्व भांड्यांवर एकसारखे नाव तो टाकत राही. नाव लिहिताना खिळ्याचा ठोका एकेक एमएम अंतरावर घालणे हे त्यांचे कसब असे. सर्व भांड्यांवर नावं टाकताना कधी कधी त्याला चार पाच तासही लागत. टाकलेल्या नावावरुन आपल्या हाताचं बोट फिरवताना त्या अक्षरांचा खरखरीत स्पर्श जाणवायचा. एका नावामागे दोन रुपयांच्या मिळकतीतही त्याला समाधान असायचं.
कालांतराने नावं टाकण्याची आधुनिक मशीन आली आणि दुकानदारच ते टाकून देऊ लागला. तो बहुधा अमराठी असल्याने नावात व्याकरणाच्या चुका होऊ लागल्या. अक्षर चांगले असेलच याची खात्री नसायची. विजेवर चालणाऱ्या त्या मशीनने भांड्याला स्पर्श केला की, टर्रर्रऽऽ टर्रर्रऽऽ असा आवाज येत असे. अक्षरं लिहून झाल्यावर वरती रेघ मारताना टर्रर्रर्रर्रर्रर्रर्रऽऽऽ असा सलग आवाज येई.
भांडी आळीतील हा नावं टाकण्याचा प्रकार आता कमी झाला आहे. धातूच्या भांड्यांना नवीन पर्याय आल्याने टपर वेअर, अॅक्रॅलिक, नाॅनस्टीक भांडी खरेदी केली जातात. ‘युज अॅण्ड थ्रु’ चा जमाना आहे. त्यामुळे नाव टाकून कशावरही हक्क गाजविण्याची आता कुणाचीही इच्छा नसते. आता एकमेकांना कोणी काही वस्तू घालून भांडे देत नाही. दिलं तर कायमस्वरूपी दिलं जातं, ते परत करावं अशी अपेक्षा ठेवलेली नसते.
हे झालं भांड्यांच्या बाबतीत. मी जेव्हा नवीन सायकल घेतली. तेव्हा तिच्या हॅण्डलवर करडे मामांकडून सुवाच्य अक्षरात नाव टाकून घेतलं होतं. पूर्वी संभाजी पुलावर (लकडी पूल) डेक्कनच्या बाजूला एकजण फाऊंटन पेनवर नाव टाकून देणारा दिसायचा. तो एका टोकदार सुईने पेनावर नाव कोरायचा. नाव कोरुन झाल्यावर रंगीत तेलकट खडू त्यावर घासायचा. त्यामुळे ते नाव छान रंगीत दिसायचे.
काहीजण छत्रीवर ऑईलपेंटने नांव टाकून घ्यायचे. छत्र्या सगळ्या सारख्याच दिसतात व त्या कुठे विसरल्या तर पुन्हा तिच्यावर आपला हक्क दाखविण्यासाठी नाव असलेले कधीही बरें!!
पूर्वी मोठ्या लोखंडी पेटीवर मालकाचं नांव लिहिलेलं असायचं. विशेषतः मिलीट्रीमध्ये असणाऱ्यांच्या मोठ्ठया पेटाऱ्यांवर नाव आणि त्याचं पद लिहिलेलं असायचं. रेल्वेच्या प्रवासात असे पेटारे हमखास दिसायचे.
आता आपल्या वस्तूंवर नाव टाकणारा एकच व्यवसाय राहिला आहे, तो म्हणजे समारंभाला भाड्याने भांडी देणारं ‘मंगल केंद्र’! त्यांच्या प्रत्येक वस्तूंवर, टेबल, खुर्च्यांवर लाल आॅईलपेंटने नाव टाकलेले असते.
इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर नावाची एंबाॅस केलेली रंगीत टेप काहीजण लावतात. विशेषतः लॅपटाॅपवर, सीपीयु वर. काहीजण स्टीकर लावतात. एकूण काय नावाचा आग्रह आता कोणी फारसा धरत नाही…
मात्र अजूनही एका ठिकाणी खरेदी केलेल्या वस्तूंवर नाव टाकून घेतलेच जाते, ते म्हणजे चांदीच्या वस्तू!! या वस्तू पिढ्यानपिढ्या जीवापाड जपल्या जातात…आजी आजोबांनी खरेदी केलेली चांदीची भांडी नातू सणावाराला, लग्न समारंभाला, वाढदिवसाला वापरतो… त्या ‘नावा’मध्ये नात्यांचा अनोखा ओलावा असतो…
© – सुरेश नावडकर
मोबाईल ९७३००३४२८४
५-५-२१.
नावडकर यांचे लेख आवडण्याचे कारण म्हणजे त्यांची सोपी, समजणारी, हलकीफुलकी भाषा. ते विषयही अशा तऱहेने रंगवतात कि वाचता वाचता आपल्या डोळ्यापुढे ते चित्रच उभा राहते. आणि हेच त्यांच्या लिखाणाचे रहस्य आहे. हाही लेख त्यापैकी एक आहे. भांड्यावर नाव घालून घेणारे सध्या कमीच
लोक असतात.
अशाच लेखांची त्यांच्याकडून अपेक्षा आहे.
डॉ. दिलीप कुलकर्णी.
१६. ०७. २०२१
मोबा. ९८८१२०४९०४