पुरुषसूक्त हे ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलातील नव्वदावे सूक्त आहे. आपल्याला दिसणारे जग हे विराट परमेश्वराचा केवळ अंशभाग आहे हा या सूक्ताचा मुख्य विषय. विश्वपुरुष व त्याच्यापासून निर्माण झालेली सृष्टी यांचे वर्णन करणार्या या सूक्तात सोळा ऋचा असून रचयिता नारायण ऋषी व देवता पुरुष (परमेश्वर) आहे. मुख्यत्वे अनुष्टुप् छंदात रचलेल्या या सूक्ताची शेवटची ऋचा मात्र त्रिष्टुप् छंदात गुंफलेली आहे. पहिले पाच मंत्र त्या भव्य आदितत्त्वाचे (पुरुषाचे) वर्णन आहे. येथे पुरुष या शब्दाने अभिप्रेत आहे ते चराचराला व्यापणारे एक अमूर्त, अविनाशी, अनंत, अशरीरी तत्व. श्लोक ६ व ७ त्या विराट पुरुषाचाच यज्ञ करून यज्ञाचे हवन केल्याचे वर्णन येते. सर्वसाधारणतः यज्ञ एका विशिष्ट हेतूने किंवा देवतेच्या कृपाप्रसादासाठी केला जाई. परंतु येथे हा यज्ञ देवांनीच मांडला आहे. ८ ते १५ पर्यंतच्या ऋचांमध्ये त्या यज्ञातून काय निर्माण झाले याचा उहापोह आहे. या उत्पत्तीचा क्रमही लक्षणीय आहे. त्या काळी यज्ञात पशूंचा बळी देण्याची प्रथा होती आणि त्या प्राण्याचे वेगवेगळे भाग शिजवून त्या यज्ञातील वेगवेगळ्या ऋत्विजांना अधिकाराप्रमाणे आणि यजमानाला भक्षणार्थ दिले जात. या मानस यज्ञात तर प्रत्यक्ष त्या विराट पुरुषाचाच बळी दिला आहे. त्यामुळे त्यातून संपूर्ण विश्व आणि समाज निर्मिती झाल्याची कल्पना मांडली आहे.
काही अभ्यासकांच्या मते पुरुषसूक्तात प्रथमच चार वर्णांचा स्पष्ट उल्लेख येतो. परंतु अनेक अभ्यासकांच्या मते येथे चार लोकसमूहांचा निर्देश असला तरी त्यास ‘वर्ण’ असे म्हटलेले नाही. त्यामुळे चातुर्वर्ण व्यवस्था वैदिकोत्तर काळात रूढ झाली असावी. काही अभ्यासकांच्या मते ह्या दोन ऋचा (क्र ११ व १२) प्रक्षिप्त (मागाहून भर घातलेल्या) आहेत. ह्याच सूक्ताच्या आधारे (ऋचा क्र.१५) नरमेधाचा पुरावा दिला जातो. परंतु बहुतेक भाष्यकारांनी पशू या शब्दाचा अर्थ सर्वद्रष्टा परमेश्वर (पश्यति इति पशुः) असा लावला आहे. या सूक्तातील बहुतेक वर्णन मानसयज्ञाचे आहे. सृष्टीची उत्पत्ती होताना एखाद्या पुरुषाच्या अंगांपासून विश्वाचे वेगवेगळे भाग तयार झाले अशी कल्पना जगभरातील पुराकथांमध्ये आढळून येते.
ऋग्वेदाखेरीज इतर अनेक वैदिक साहित्यात हे सूक्त उद्धृत केलेले आहे. यजुर्वेदात त्यातील १५ वा मंत्र ७ वा करून त्यात अधिक सुसंबद्धता आणली आहे. पौराणिक काळापासून हे सूक्त नित्य पठणात असून षोडशोपचार पूजा करताना पुरुषसूक्तातील एकेक ऋचा म्हणून एकेक उपचार अर्पण करण्याची पद्धत रूढ आहे. याशिवाय हल्ली पूजा, आरत्यांनंतर म्हटल्या जाणार्या मंत्रपुष्पांजलीतही पुरुषसूक्तातील ‘यज्ञेन यज्ञमयजन्त देवाः’ या मंत्राचा विनियोग केला जातो.
सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपात् ।
स भूमिं विश्वतो वृत्वात्यतिष्ठद्दशाङुलम् ॥१॥
मराठी- ज्याला हजार मस्तके, डोळे, पाय आहेत, असा पुरुष (परमात्मा) या धरतीला वेढून दहा बोटे अधिकच उरला आहे.
पुरुष एवेदं सर्वं यद्भूतं यच्च भव्यम् ।
उतामृतत्वस्येशानो यदन्नेनातिरोहति ॥२॥
मराठी- जे काल होते, आज आहे आणि उद्या असेल ते जग म्हणजे हा पुरुषच आहे. अमरत्वाचा अधिपती असलेला हा पुरुष अन्नरूपाने त्या सर्वापलिकडे जातो.
टीप- येथे काही अभ्यासकांनी दुसर्या चरणाचा अर्थ ‘प्राणिमात्रांच्या सुखदुःखाप्रीत्यर्थ परमेश्वर आपले मूळ स्वरूप सोडून जगामध्ये येतो. वस्तुतः ते त्याचे मूळ स्वरूप नव्हे’ असा केलेला आढळतो.
एतावानस्य महिमातो ज्यायाँश्च पूरुषः ।
पादोऽस्य विश्वा भूतानि त्रिपादस्यामृतं दिवि ॥३॥
मराठी- ही अशी या पुरुषाची थोरवी त्यामुळे तो सर्वश्रेष्ठ आहे. त्याचा एक पाय या विश्वात आहे तर तीन पाय अंतरिक्षात आहेत. (हे जग म्हणजे त्याचा एक चतुर्थांश आहे तर उर्वरित तीन चतुर्थांश दिव्य लोकात आहे.)
त्रिपादूर्ध्व उदैत्पुरुषः पादोऽस्येहाभवत्पुनः ।
ततो विष्वङ् व्यक्रामत्साशनानशने अभि ॥४॥
मराठी- असा हा तीन अंश (विश्वाच्या पलिकडे) उंच अवकाशात असणारा पुरुष (सृष्टीची उत्पत्ती,स्थिती आणि लय स्वरूपात) पुनः पुनः अंशरूपात प्रकट झाला. त्यानंतर त्याने अन्न भक्षण करणार्या आणि न करणार्या अशा अनेक रूपांनी विश्व व्यापून टाकले.
टीप- काही अभ्यासकांनी ‘एक अंशभाग उत्पत्ती – लयाच्या चक्रामध्ये भ्रमण करीत राहतो’ असा अर्थ लावला आहे.
तस्माद्विराळजायत विराजो अधि पूरुषः ।
स जातो अत्यरिच्यत पश्चाद्भूमिमथो पुरः ॥५॥
मराठी- त्या (आदिपुरुषा) पासून भव्य (ब्रह्माण्डरूपी) पुरुष निर्माण झाला. पण त्याहीपेक्षा तेजस्वी परमात्म्याने त्याला व्यापून, त्यानंतर भूमी व शरीरधारी जीवांना उत्पन्न केले.
यत्पुरुषेण हविषा देवा यज्ञमतन्वत ।
वसन्तो अस्यासीदाज्यं ग्रीष्म इध्मः शरद्धविः ॥६॥
मराठी- जेव्हा देवांनी (या) पुरुषाला यज्ञीय अग्नी मानून होम सुरू केला, तेव्हा त्या (यज्ञा) साठी वसंत ऋतू साजूक तूप, ग्रीष्म ऋतू समिधा आणि शरद ऋतू (इतर) हविद्रव्ये झाले.
तं यज्ञं बर्हिषि प्रौक्षन्पुरुषं जातमग्रतः ।
तेन देवा अयजन्त साध्या ऋषयश्च ये ॥७॥
मराठी- जो सर्वांच्या अगोदर उत्पन्न झाला अशा त्या पुरुषाचे बर्ही (कुश गवत) गवताच्या आसनावर प्रोक्षण केले (जल शिंपडले) आणि त्याच्याच योगाने देव आणि साध्य प्रवर्गातील (दैवी) ऋषींनी हवन केले.
तस्माद्यज्ञात्सर्वहुतः सम्भृतं पृषदाज्यम् ।
पशून्ताँश्चक्रे वायव्यानारण्यान् ग्राम्याश्च ये ॥८॥
मराठी- संपूर्ण आहुती दिल्यानंतर त्या यज्ञापासून कणीदार रवाळ तूप तयार झाले. आणि त्यापासून हवेवर उपजीविका करणारे (पक्षी), तसेच जंगली आणि पाळीव पशू निर्माण झाले.
टीप- काही अभ्यासकांनी ‘पृषदाज्य’ चा अर्थ दहीमिश्रित तूपभात, तसेच दही युक्त तूप असा केलेला आढळतो.
तस्मात् यज्ञात् सर्वहुत ऋचः सामानि जज्ञिरे ।
छन्दांसि जज्ञिरे तस्माद्यजुस्तस्मादजायत ॥९॥
मराठी- त्या सर्व आहुती दिलेल्या यज्ञापासून ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद (हे तीन वेद) आणि (वैदिक गीतांचे गायत्री सारखे) छंद निर्माण झाले.
टीप- येथे अथर्ववेदाचा उल्लेख नाही हे लक्षणीय आहे.
तस्मादश्वा अजायन्त ये के चोभयादतः ।
गावोः ह जज्ञिरे तस्मात् तस्माज्जाता अजावयः ॥१०॥
मराठी- त्या यज्ञापासून घोडे,गाई,बोकड,एडके असे दोन्ही जबड्यात दात असणारे प्राणी उत्पन्न झाले.
यत्पुरुषं व्यदधुः कतिधा व्यकल्पयन् ।
मुखं किमस्य कौ बाहू का ऊरू पादा उच्येते ॥११॥
मराठी- या (विराट) पुरुषाला कोणकोणते अवयव होते? (देवांनी) त्याची कशीकशी कल्पना केली ? त्याचे तोंड काय होते; दोन हात, मांड्या आणि पाय यांच्यासाठी काय योग्य होते ?
ब्राह्मणोऽस्य मुखमासीद् बाहू राजन्यः कृतः ।
ऊरू तदस्य यद्वैश्यः पद्भ्यां शूद्रो अजायत ॥१२॥
मराठी- ब्रह्म जाणणारा त्याचे मुख, क्षत्रिय त्याचे हात, व्यापार उदीम करणारा त्याच्या मांड्या होते व पायांपासून शूद्र उत्पन्न झाला.
चन्द्रमा मनसो जातश्चक्षोः सूर्यो अजायत ।
मुखादिन्द्रश्चाग्निश्च प्राणाद्वायुरजायत ॥१३॥
मराठी- चंद्राची उत्पत्ती त्याच्या मनापासून, रवीची डोळ्यांपासून, इन्द्र आणि अग्नी मुखापासून आणि प्राणापासून वारा (हवा) उत्पन्न झाला.
नाभ्या आसीदन्तरिक्षं शीर्ष्णो द्यौः समवर्तत ।
पद्भ्यां भूमिर्दिशः श्रोत्रात्तथा लोकाँ अकल्पयन् ॥१४॥
मराठी- त्याच्या बेंबीपासून अंतराळ, शिरापासून स्वर्ग, दोन पावलांपासून धरती, कानांपासून सर्व दिशा आणि विचिध लोक निर्माण झाले अशी देवांनी कल्पना केली.
सप्तास्यासन् परिधयस्त्रिः सप्त समिधः कृताः ।
देवा यद्यज्ञं तन्वाना अबध्नन्पुरुषं पशुम् ॥१५॥
मराठी- या होमकुंडाभोवती सात कठडे होते, यज्ञासाठी एकवीस समिधा केल्या होत्या. देवांनी त्या विराट पुरुषाला बळी देण्याचा पशू म्हणून खांबापाशी (बलिस्तंभाशी) बांधले.
टीप- विविध अभ्यासकांनी ‘परिधी’ व ‘समिधा’ यांचा वेगवेगळा अर्थ घेतलेला दिसतो.
परिधी :- १. सप्तछंद (गायत्री, अनुष्टुप्, त्रिष्टुभ, जगती, उश्निह, बृहति, पङ्क्ती हे सात छंद वैदिक वाङ्मयात मुख्यत्त्वे वापरलेले आहेत.) २. सात समुद्र
समिधा :- १.एकवीस छंद २. बारा मास, पाच ऋतू, तीन लोक आणि आदित्य. ३. पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये, शरीरातील पंचनाड्या, मन, बुद्धी, जाणीव, अहंकार, धर्म आणि अधर्म.
यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् ।
ते ह नाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः ॥१६॥
मराठी- देवांनी यज्ञ करून यज्ञरुप विराट पुरुषाचे पूजन केले, जे यज्ञ आणि तत्सम धार्मिक उपासनेचे प्राथमिक स्वरूप (धर्मविधी) होते. पूर्वी ज्या स्वर्गात महान देवता आणि साध्य (ऋषी) निवास करीत ते स्थान (यज्ञ करून) त्यांनी निश्चितच प्राप्त केले.
हेच पुरुष सूक्त इतर ग्रंथातही (तैत्तिरीय आरण्यक) आढळून येते. तेथे त्यात अठरा मंत्र आहेत. अधिकचे दोन मंत्र असे :
वेदाहमेतं पुरुषं महान्तम् आदित्यवर्णं तमसस्तु पारे ।
सर्वाणि रूपाणि विचित्य धीरः नामानि कृत्वाऽभिवदन्यदास्ते ॥१७॥
मराठी- मी त्या महान बुद्धिमान पुरुषाला जाणतो, जो सूर्यासारखा तेजस्वी आहे, जो अंधकारा पलिकडे आहे, ज्याने सर्व आकृती आणि आकार निर्माण केले, सर्वांना नावे दिली आणि जो सर्व गुणविशेषांपेक्षा श्रेष्ठ आहे आणि सर्व विश्व सांभाळतो.
धाता पुरस्ताद्यमुदाजहार शक्रः प्रविद्वान्प्रदिशश्चतस्त्रः।
तमेवं विद्वानमृत इह भवति नान्यः पन्था अयनाय विद्यते ॥ १८॥
मराठी- सर्वप्रथम ब्रह्मा प्रजापतीने या पुरुषाला ओळखले (जगासमोर आणले), त्यानंतर सर्व दिशांमध्ये पसरलेल्या या पुरुषाची इन्द्राला जाणीव झाली. हा पुरुष ज्याला समजला, त्याला या जन्मातच अमरत्व मिळते (मोक्ष मिळतो), त्यासाठी दुसरा कोणताच मार्ग आवश्यक नाही.
खालील मंत्र तैत्तिरीय आरण्यकाच्या प्रथम प्रपाठकातील प्रथम अनुवाकात आहे. तो पुरुषसूक्ताच्या सुरुवातीस म्हटला जातो.
ॐ तच्छं योरा वृणीमहे । गातुं यज्ञाय । गातुं यज्ञपतये ।
दैवी स्वस्तिरस्तु नः । स्वस्तिर्मानुषेभ्यः । ऊर्ध्वं जिगातु भेषजं ।
शं नो अस्तु द्विपदे । शं चतुष्पदे।
ॐ शांतिः ॐ शांतिः ॐ शांतिः
मराठी- आम्ही आमच्या सध्याच्या आजारांच्या व भविष्यात होणार्या रोगांच्या निवारणाकरिता त्या (ओम् किंवा परमेश्वरा) ची विशेषत्त्वाने प्रार्थना करतो. (हा) यज्ञ (विघ्नरहित) गतिमान व्हावा (पार पडावा), तसेच त्याच्या यजमानाला चांगली गती मिळावी म्हणून विशेषत्त्वाने प्रार्थना करतो. आमचे स्वर्गीय कल्याण व्हावे. आमच्या मुला नातवंडांचे कल्याण होवो. आमच्या औषधी (वनस्पती) उंच वाढोत. आमच्या (नातलग, दासदासी इत्यादी) माणसांचे, तसेच (गाई, घोडे इ.) पशूंचे कल्याण होवो. सर्वत्र शांती नांदो.
खालील ऋचा तैत्तिरीय आरण्यकातील ३ र्या प्रपाठकातील १३ व्या अनुवाकात येतात.
अद्भ्यः संभूतः पृथिव्यै रसाच्च विश्वकर्मणः समवर्तताधि ।
तस्य त्वष्टा विदधद्रूपमेति तत्पुरुषस्य विश्वमाजानमग्रे ॥
मराठी- हा विराट आकाराचा नारायण नामक पुरुष सर्वत्र पसरलेल्या जलामध्ये (मण्डवत्- दुधातील लोण्याच्या गोळ्यासारखा) उत्पन्न झाला. केवळ जलच नव्हे तर पृथ्वीशी संबंधित जे जे रस होते त्यापासून तो उत्पन्न झाला. या विश्वाला उत्पन्न करणार्या परमेश्वरापासून श्रेष्ठ ब्रह्मा उत्पन्न झाला. या विश्वाच्या निर्मात्याने (ब्रह्म्याने) चौदा लोक उत्पन्न केले व तो त्या लोकात व्याप्त झाला.
टीप- त्वष्टा या शब्दाचे अनेक अर्थ – जसे एक आदित्य (सूर्य), विश्वाचा निर्माता, बांधकामाशी संलग्न कारागीर – आहेत. वेगवेगळ्या अभ्यासकांनी विभिन्न अर्थ घेऊन त्या दृष्टीने दुसर्या चरणाचा अर्थ लावलेला दिसतो. त्यात ‘ त्या रसाला धारण करून सूर्य रोज प्रकट होतो ’ असाही अर्थ दिसतो. सायणाचार्यांनी ‘ब्रह्म्याने चौदा लोक निर्माण केले’ असा अर्थ घेतला आहे.
वेदाहमेतं पुरुषं महान्तं आदित्यवर्णं तमसः परस्तात्
तमेवं विद्वानमृत इह भवति नान्यः पंथा विद्यतेऽयनाय ॥
मराठी- मी त्या महान बुद्धिमान पुरुषाला जाणतो, जो सूर्यासारखा तेजस्वी आहे, जो अंधकारा पलिकडे आहे. त्याला ओळखूनच मृत्यूला जिंकता येते. प्रगतीसाठी दुसरा मार्ग नाही.
प्रजापतिश्चरति गर्भे अन्तः अजायमानो बहुधा विजायते
तस्य धीराः परिजानन्ति योनिं मरीचीनां पदमिच्छन्ति वेधसः ॥
मराठी- ज्याला (लौकिक अर्थाने) जन्म (आणि मरणही) नाही असा ब्रह्मा (प्रजापती) या ब्रह्माण्डरूपी गर्भाच्या अंतर्भागी विहार करतो. योगाने आपल्या चित्तवृत्ती ज्यांनी संयत केल्या आहेत असे धैर्यशील जन त्या प्रजापतीचे जगत्कारणरूप जाणतात. ज्ञानी जन मरीची (सारख्या सप्तर्षीं) चे (अढळ) पद मिळावे अशी कामना करतात.
यो देवेभ्य आतपति यो देवानां पुरोहितः
पूर्वो यो देवेभ्यो जातः नमो रुचाय ब्राह्मये ॥
मराठी- जो देवांसाठी प्रकाशतो, जो देवांचा सल्लागार आहे, जो देवांच्या आधी अस्तित्त्वात आला, अशा तेजस्वी परब्रह्म स्वरूपाला मी नमस्कार करतो.
रुचं ब्राह्मं जनयन्तः देवा अग्रे तदबृवन् ।
यस्त्वैवं ब्राह्मणो विद्यात् तस्य देवा असन् वशे ॥
मराठी- अशा तर्हेने सृष्टि उत्पत्तीच्या अगोदरपासून अस्तित्वात असलेल्या चैतन्यमय परब्रह्मासंबंधी देव बोलले. जो हे जाणणारा ब्रह्मवेत्ता असेल, देव त्याचे अंकित होतात.
ह्रीश्च ते लक्ष्मीश्च पत्न्यौ अहोरात्रे पार्श्वे नक्षत्राणि रूपं ।
अश्विनौ व्यात्तम् इष्टं मनिषाण अमुं मनिषाण सर्वं मनिषाण ॥
मराठी- हे ब्रह्मन्, लज्जा आणि लक्ष्मी या तुझ्या दोन भार्या आहेत. दिवस आणि रात्र या तुझ्या दोन कडा आहेत. (आकाशात पसरलेले) चांदणे तुझे शरीर आहे. दोन अश्विनीकुमार तुझे विस्तृत मुख आहेत. तू आम्हाला इच्छिलेले (आत्मज्ञान) दे, जगात दृश्यमान गाई-घोडे इत्यादी दे, सर्व ऐहिक संपत्ती दे.
ॐ शांतिः ॐ शांतिः ॐ शांतिः ॥
******************
धनंजय बोरकर (९८३३०७७०९१)
नमो नम: !
प्रिय श्री. धनंजयराव
मी आताच पुरुषसूक्ताचा माराह्ती अनुवाद वाचला. छान झालाय. मी एक लेख लिहित आहे. त्याकरिता मला हा अन्नुवाद उपयोग पडू शकतो. आपल्याला विनंती आहे कि. कृपया हा अनुवाद माल मेल करावा ही विनम्र विंनती .
धन्यवाद.
मुकुंद भालेराव
छत्रपती संभाजी नगर / पोंडा – गोंये
मोबाईल: ८३० ८८ ३५३ १३
सुन्दर धनंजयराव तुम्ही आम्हाला पुरुष सुक्तचा अर्थ मोजक्या शब्दात v वैचारिक पणे समजाऊन सांगितलं dhanyawad
छानच!अशाच प्रकारे गायत्री मंत्र अर्थ मुद्रा 24 अक्षरांची फोड करून दाखवलीत तर बरे होईल आज काल संस्कृत कोणालाच कळत नाही ??
श्री.धनंजयराव बोरकर सर
आपले शतश:धन्यवाद.
आपण उत्तम रितिने,नेमक्या शब्दात पुरुषसूक्ताचा अर्थ व महिमा समजाविला आहे.संस्कृत अभ्यास भाषा नसलेल्या मला वयाच्या ६२ व्या वर्षी हे सूक्त तुमच्या या लेखामुळे समजले व श्रध्दा दृढ झाली.
संस्कृत पुरुषसूक्तम चे पठण नेहमीच करतोय पण सविस्तर मराठी भाषांतर आपल्या मुळे माहित झाल धन्यवाद ??
संस्कृत पुरुषसूक्तम चे पठण नेहमीच करतोय पण सविस्तर मराठी अर्थ बोरकरसर आपल्या मुळे माहित झाला धन्यवाद ??
खूपच सुंदर भाषांतर केले आहे असेच कार्य आपल्या हातून उतोरोत्तर घडावे
पुरूषसुक्त फक्त ऐकले पण आज प्रत्यक्षात त्याचा अर्थ वाचण्यात आल्यामुळे कळला
छान लिहिले आहे सहज सोप्या भाषेत
No words to express the feelings!
आपण अत्यंत महत्वपूर्ण कार्य करीत आहात यात वादच नाही. खूप सुंदर आणि मुद्देसूद भाषांतर केले आहे. हिंदुत्वाची पताका फडकावली जात आहे. ह्याचा आनंद आहेच. आपल्याला खूप यश लाभो हीच श्री चरणी प्रार्थना.
धनंजयरावांनी आता तर अगदी कमाल केली आहे.
माझ्यासारख्या अडाणी माणसाला पुरुषसूक्त
हे त्याच्या नावावरूनच माहिती आहे.
पण आज धनंजयरावांनी एक षटकारच मारला आहे.
आम्हाला अेक फारच उपयुक्त ज्ञानामृत पाजले आहे.
आता धनंजयरावांकडे एकच मागणी आहे.
त्यांनी आम्हाला यूट्यूबवरील एखादे संकेतस्थळ सुचवावे,
जेणेकरून आम्ही पुरुषसूक्त तालबध्द म्हणू शकू.