अशारीर प्रेमाची ओळख, महती सांगणारा ” अमर प्रेम ” हा चित्रपट ९वीत असताना (पौगंडावस्थेची सुरुवात) मी भुसावळला “वसंत “टॉकीज मध्ये वडिलांबरोबर पाहिला. त्याआधीचा “आराधना ” मात्र योग्य वयात (अभियांत्रिकी महाविद्यालयात असताना मिरजेच्या “मंगल ” चित्रपटगृहात (त्यामधील “कोरा कागज ” च्या “तेरा ” शब्दानंतर ” चौदा, पंधरा — ” अशी कोटी करीत आसपास हंशा पिकविल्याचेही आठवते.) पाहिला होता.
खन्ना, शर्मिला किंचित उतरणीला लागलेले, त्यामुळे नुसत्या दिसण्यापेक्षा स्वतःच्या कर्तृत्वाशी काही प्रयोग करण्याच्या मूडमधले ! विनोद मेहेरा सारख्या देखण्या नव्या पिढीला शिरकाव करून देणारा हा चित्रपट.
प्रमुख कलावंतांच्या अभिनयाइतकीची या चित्रपटाची ओळख म्हणजे ” आरडी , किशोर, लता !” या तिघांच्या कर्तृत्वाने आमच्या मनाचा पडदा आजही व्यापला आहे. ” आंधी ” मधील प्रत्येक गाण्यावर जसा एकेक प्रदीर्घ लेख होऊ शकेल, तसेच इथे संभवते. आरडी /किशोर/लता यांच्या ( त्यांतही किशोर जास्त ) कलाप्रवासाचा आढावा अशक्य आहे पण तशा प्रयत्नात असताना कोणालाही हा चित्रपट ओलांडून जाणे केवळ अशक्य. आणि हो, सुरुवातीचे ” डोली में बिठाईके ” हे सिनिअर बर्मनदांचे (मंदिरातील पुजाऱ्याचे स्वर) शब्द विसरून चालणारच नाही. संपूर्ण चित्रपटाचा मूड सेट करून खुर्चीतच सरसावून बसायला लावणारे.
ज्योतीने तेजाची आरती ” हे सुरांच्या प्रांगणात नंतर श्रीधर फडके यांनी करून दाखविले – पिताश्री सुधीर फडकेंना ” फिटे अंधाराचे जाळे ” गायला लावून, स्वतःच्या संगीत दिग्दर्शनात ! अशावेळी या पिता-पुत्रांच्या पोतडीत काय दडलेले असेल , आजही कळायला मार्ग नाही. पुत्राच्या मार्गदर्शनाखाली वटवृक्षासारख्या पित्याने आपली कला सादर करायची- दोघांवरही प्रचंड दडपण नक्कीच येत असेल.
घरच्यांनी त्यजलेला खन्ना, एका योग्य क्षणी चुकीच्या ठिकाणी आणून सोडलेला. त्याचेच काय सगळ्यांचेच पाय ” रैना बिती जाय ” पाशी कायमचे थबकतात. आणि तो सूर-सौंदर्याचा पाश त्याला सोडवत नाही. क्षणिक अभिसारिका, क्षणात नंदूची नसलेली आई आणि उत्तरायणात “टाकून घातलेल्या नवऱ्याची ” सेवा करणारी मोलकरीण ! काय आवाका मिळाला शर्मिलाला- आणि त्या प्रत्येक टप्प्याचे तिने सोने केले. ( हाच परिस तिने “आराधना ” मधल्या भूमिकेलाही लावला होता.)
आजच्या काळात असे पात्र लिहिणारे आणि निभावणारे पटकन डोळ्यापुढेही कोणी येत नाही.
” कुछ तो लोग कहेंगे ” हे पुष्पाला समजावणारा खन्ना स्वतःला हे आधी सांगतो आणि व्यक्तिगत आयुष्यात अधिक कडवट होतो. ” चिंगारी कोई ” ही पाण्यावरची तरल कविता – गंगेलाही धन्य करणारी, हावडा ब्रिज ला थबकवणारी आणि शर्मिलाला गुह्य सांगणारी. खन्ना ते गाणं चेहेऱ्यावर जगतो. हे अद्भुत त्याने आणि किशोरनेही “खामोशी ” मधील ” वो श्याम ” मध्ये याआधीच करून दाखविले होते. गाणं ओठांवर आणि चेहेऱ्यावर जगणे याचे हे आदर्श वस्तुपाठ आहेत.
गीतकाराच्या शब्दांना ओठ आणि चेहेरा असे कॉम्बो मिळणं म्हणजे अगदी ” हे सुरांनो चंद्र व्हा ” सारखा क्षण !
आतून पोखरलेला पण बाह्यतः कणखर खन्ना वेळोवेळी पुष्पाला मात्र आय “हेट” टिअर्स म्हणत सावरत असतो. देखण्या, तरुण नंदूला त्याच्या बालपणीच्या आठवणीतल्या झाडापाशी खन्ना आणून सोडतो आणि माय -लेकरांना भेटवतो. आता त्याला कळतं – अश्रू कायम खारट नसतात. एका भेटीच्या कुशीत दुसरा निरोप दडलेला असतो. आणि निरोप म्हटलं की अश्रू मस्ट !
भेट जशी स्मितहास्या शिवाय साजरी होत नाही, तसे निरोपाच्या क्षणी अश्रू असायलाच हवेत मि. खन्ना ! त्यांचा तिरस्कार करू नकोस. जे गेलेत, जाणार आहेत हे माहीत असते, तेव्हा तेव्हा डोळे ओले व्हायला हवेतच. आमच्या डोळ्यांमध्ये तर पाण्याच्या टाक्या बसविल्या आहेत. वेळी-अवेळी, सकारण -अकारण ते पाणी बांध फोडून बाहेर येते. बरं झालं “अमर प्रेम ” ने तुला हा धडा दिला – ” आय लव्ह टिअर्स ! ”
अश्रुंसारखे सांत्वन करण्याचे सामर्थ्य तर स्पर्शातही नसते.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply