पुर्वीचे दिवस फार म्हणजे फार चांगले होते. कसे तर कुणीतरी विव्दान तासंतास अभ्यास करायचा. भरपूर शब्द एकत्र करायचा आणि त्यांच गाठोडं बांधून सगळ्या शब्दांना एकत्र बांधायचा. मग तयार व्हायचं माझं अस्तित्व. मग तयार व्हायचं एक जग, विश्व.
हे विश्व कधी कल्पनेचं असायचं, कधी वास्तवाच्या निखाऱ्यांची धग त्यात असायची. कधी अनुभवाचे मोती त्यात असायचे. कधी ज्ञानाचा कुंभ असायचा. एक ना अनेक गोष्टी त्यात असायच्या. पूर्वी असही व्हायचं मला हाताळाणारे खुप असायचे. सारखं या हातावरून त्या हातावर, या टेबलावरून त्या टेबलावर, या खुर्चीवरून त्या खुर्चीवर जाणं व्हायचं. कुणी माझ्या अंतरंगातल्या शब्दांवर चर्चा करायचं. कुणी माझ्या शब्दांचे अर्थ लावून जीवनाचं सार्थक झाल्याचं मानायचं. तर कुणी माझ्या अंतरंगी शब्दांची प्रेरणा घेऊन जीवनाची नवी सुरवात करत असे. कुणी मला डोक्यावर घेऊन मिरवत असे, कुणी माझी पुजा करत असे. एक ना अनेक प्रकार पुर्वी माझ्या संदर्भात होत होते. महाविद्यालयांत तर माझं जोरदार स्वागत होत असे पूर्वी. तेथील ग्रंथालयांत तर माझीच चलती असायची. ग्रंथालयातील कपाटांत तर माझे सगळे सवंगडी एकाच रेषेत, एकाच माळेत असायचे. कुणी वरच्या कप्प्यात तर कुणी खालच्या कप्प्यात. पण सारे एकत्रच असायचे. अगदी कुराण, गीता, बायबल सुद्धा एकत्रच रहायचे. नांदायचे. कुणालाच कशाचाही गर्व नसायचा. ना शब्दांचा, ना धर्माचा. मध्येच कुणीतरी यायचं माझी मागणी करायचं. कुणी तरी यायचं मला अलगद उचलून जवळ घ्यायचं. कुणीतरी मला कुणाच्या तरी हातात सोपवायचं. या देवाण घेवाणीचं पुढचे सुत जमायची. मग ही जोडी आयुष्यभरासाठी एक व्हायची. कधी कुणाच्या आठवणीत माझ्या पानांत ठेवलेला गुलाब अन त्याच्या सुगंधाने माझं अंतरंग सुगंधीत व्हायचं. कधी कुणीतरी आईच्या मांडीवर बसुन उजळणी करायचं. आईच्या बोटामागे बोट ठेवून बोबड्या बोलानं काही तरी बडबडायचं. कधी कुणीतरी रात्री उशिरापर्यंत मला हाताशी धरून वाचत रहायचं, शब्द साठवत रहायचं.. आणि तसंच मला छातीशी धरून झोपी जायचं. मग मी देखील अलगदपणे झोपी गेलेल्याला थोपटत रहायचो रात्रभर… असो…
पुस्तके माणसाला सातत्याने काही ना काही देतच असतात. पुस्तके बोलत नसली तरी माणसाला बोलणं शिकवतात. जगणं शिकवतात, लढणं शिकवतात. पुस्तके माणसला सांगतात जीवनाचं तत्वज्ञान, पुस्तके माणसाला सांगतात, गुजगोष्टी, पुस्तके साधतात हितगुज, पुस्तके घडवतात वास्तवाचं दर्शन, पुस्तके देतात जगण्याचं भान, पुस्तके असतात दोस्त, पुस्तके असतात मार्गदर्शक.
थोडसं तांत्रिकही पाहू या पुस्तकाबाबत… अरब लोकांनी पुस्तक निर्मितीत मध्ययुगीन इस्लामिक सुवर्णयुगादरम्यान क्रांती आणली. ८व्या शतकात चिनी लोकांकडुन कागद निर्मिती शिकल्यावर पुस्तक निर्माण करण्यात ते पहिले होते. यासाठी त्यांनी विशेष कौशल्ये आत्मसात केली. पुस्तक निर्मितीत काम करणाऱ्यांना ‘वराक्विन’ असे नाव होते. त्यांनी वजनाने हलकी, रेशमाने शिवलेली व तक्त्यावर चामडी आच्छादन असलेली पुस्तके निर्माण केली. त्यांनी वापरलेला कागद हा ओलावा-रोधक होता. त्यामुळे वजनदार पुठ्ठ्याचे कव्हर वापरायची गरज नसे. मराकेच व मोरोक्को या शहरात पुस्तकनिर्मितीच एक नवा उद्योग सुरू झाला. १२व्या शतकात तेथे ‘कुतुबिय्यिन’ नावाचा एक रस्ता होता जेथे सुमारे १०० च्या वर पुस्तकांची दुकाने होती. कौतौबिया मशिदीचे नाव त्यावरूच पडले कारण ती त्या ठिकाणी होती. आणखीही बऱ्याच गोष्टी आहेत. पुस्तकांच्या संदर्भातल्या… किती लिहणार… लिहिता लिहता त्याचंही पुन्हा पुस्तकं तयारच होईल नाही का…
शेवटी गुलजारांच्या शब्दांत…
‘किताबे झांकती है
बंद अलमारी के शिशो सें
बडी हसरत से तकती है किताबे..
महिनो अब मुलाकात नही होती
जो शामे उनकी सोबत मे
कटा करती थी
अब अक्सर गुजर जाती है
कम्प्युटर के पडदो पर
बडी बेचैन रहती है किताबे…..
— दिनेश दीक्षित
९४०४९५५२४५
Leave a Reply