पुण्याच्या बुधवारपेठेतील भिडे वाड्यात १८४८ मध्ये जोतिराव फुले यांनी मुलींची शाळा उघडली, स्वतंत्रपणे मुलींची शाळा काढणारे ते पहिले भारतीय, त्या काळात पुण्यातला एक एक सनातनी ब्राह्मण म्हणजे ‘आरडीक्स पेक्षा महाभयंकर होता. सनातनी खवळले. स्त्री शिक्षण म्हणजे अनैतिकतेला आणि अनाचाराला निमंत्रण आहे, असा प्रचार त्यांनी सुरू केला. मुलींची शाळा उघडली खरी, पण त्यांना शिकवायला शिक्षिका कोण मिळणार? जोतिरावांनी आपली पत्नी सावित्रीबाई यांना पहिल्यांदा स्वतः शिकवलं आणि मग सावित्रीबाई मुलींना शिकवू लागल्या.
सनातन्यांनी सावित्रीबाईंवर शेण फेकलं. त्यांना दगड फेकून मारले. जोतिरावांच्या वडिलांवर दडपण आणून 1849 मध्ये त्या दाम्पत्याला गृहत्याग करायला भाग पाडलं, पण दोघेही हटले नाहीत. अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातींच्याही मुली शाळेत शिकू लागल्या.
काय काम केलं बाईंनी? ते असं की त्यांच्या शाळेत शिकणाऱ्या एका मुक्ता नावाच्या मांग मुलीनं 1855 साली लिहिलेल्या निबंधात स्त्री-मुक्तीचा पहिला उद्गार काढला. ती म्हणते: “ब्राह्मण लोक म्हणतात की इतर जातीनी वेद वाचू नयेत. याचा अर्थ आम्हाला धर्मपुस्तक नाही. मग आम्ही धर्मरहित आहोत का?… उच्च वर्गातील लोकांचा अपराध केला असता, इंग्रजी राज्यापूर्वी महार व मांगांचे डोके मारीत असत, गुलटेकडीच्या बाजारात फिरण्याची मोकळीक नव्हती, ती आता मिळाली.”
1862 मध्ये जोतिरावांनी बालहत्या प्रतिबंधकगृहाची स्थापना केली आणि अडचणीत सापडलेल्या विधवांना सुखरूप प्रसूत होण्यास मुभा दिली. खुद्द सावित्रीबाई या प्रमूतिगृहाची देखभाल करीत.
स्वत:च्या घरचा पाण्याचा हौद तळागाळातल्यांसाठी खुला करणं असो, की अंधश्रद्धा निर्मूलन असो, सावित्रीबाईंनी ज्योतिरावांची साथ सोडली नाही. आता खूप लिया शिकून मोठ्या होत आहेत. कुणी राष्ट्रपती होत आहेत, तर कुणी एव्हरेस्ट सर करतेय. सावित्रीबाईंच्या लेकींनी भरारी घेतलीय. खूप आनंदाची गोष्ट आहे, पण त्याच वेळी दुःखाच्या गोष्टी घडण्याचं प्रमाणही वाढलंय, विद्यार्थिनी आत्महत्या करताहेत, प्रेमात पडून मारल्या जात आहेत. हुंड्यासाठी विवाहिता जाळल्या जाताहेत, निराधार विधवा आणि गरीब कुमारिका, डान्स बारची वाट घरताहेत, सावित्री या शीर्षकाची माझी एक आठ ओळींची कविता आहे-
भांडी घासून ठेव… लादी पुसून ठेव
कपडे धुकर ठेव… कुकर लावून ठेव
चटणी वाटून ठेव…जीव कुटून ठेव
संपला आहे विषय… पुस्तक पिटून ठेव,
— डॉ. महेश केळुसकर
(अनघा प्रकाशनच्या खिरमट या लेखसंग्रहातील हा लेख. हे पुस्तक मार्च 2017 मध्ये प्रकाशित झाले.)
Leave a Reply