नवीन लेखन...

पुस्तकांचे देणे, पुस्तकांवर बंदी !

पुस्तके असतात सोबती-एकाकी असताना ! अबोलपणे खुणावत असतात-मी आहे. केव्हढा धीर येतो मग. घरातल्या पुस्तकांनी ओथंबून चाललेल्या कपाटांकडे अभिमानाने नजर टाकता येते खरी पण त्याचवेळी सकाळी टीव्ही वर पाहिलेली दिवाळी अंकांच्या संचाची जाहिरात खुणावते, मित्रांच्या पुस्तक-प्रकाशनाची आवतणे येत असतात, प्रदर्शनांकडे पावले वळतात आणि काही काळाने कपाटांची “श्रीमंती” अधिक वाढते.

पुस्तकांमधील पात्रे समृद्ध करतात,संपन्न करतात.

कथा,कविता,कादंबरी,नाट्यलेखन, स्फुटलेखन साऱ्यांची रूपे भिन्न पण संस्कार एकच. पुस्तके प्रेरणा देतात, विकासाला शिडी पुरवितात आणि जगाची आतून-बाहेरून सफर घडवून आणतात. “जिणं समजायचे असेल तर जगायला हवं तसेच पुस्तक समजायचे तर ते वाचायला हवे.” आपण पुस्तकांना सक्षम बनविले की पुस्तके आपल्याला व्यक्तिगत/व्यावसायिक मदत करतात.

वंशभेद, लिंगभेद, काही विशिष्ट जातीधर्माच्या व्यक्तींनी लिहिलेली पुस्तके बंदीला सामोरी जातात. विशेषतः शालेय विद्यार्थ्यांकडून ती वाचली जाऊ नयेत यासाठी काटेकोर अडसर निर्माण केले जातात. आपल्या भावना दुखविणाऱ्या, आपल्या समजुतींना धक्का देणाऱ्या रचनांवर बंदी आणण्यासाठी अनेकजण पुढे सरसावतात. उजवी असो का डावी, एखादी विचारसरणी नेमकी घायाळ होते. त्यांना इतिहासाकडे नव्या दृष्टिकोनातून बघणे अमान्य होण्यासारखे असते किंवा काही पुस्तके वाचताना अस्वस्थ व्हायला होते म्हणूनही ती नसावीत असे वाटते.

आपण एक विसरतो का? पुस्तके वाचून अस्वस्थ झाल्यावर मनात काही अर्थपूर्ण प्रश्न उभे राहू शकतात आणि नंतरच्या वैचारिक चर्चेचा ती पाया ठरू शकतात. काहीवेळा टोकाच्या भावनांना हात घालणारी पुस्तके अंततः दमवणारी असतात, थकवा आणणारी असतात, शिणवतात. पण हेही लक्षात घेतले पाहिजे की काही पुस्तकांमुळे आपण आपल्या आरामदायी क्षेत्राच्या (कम्फर्ट झोन) बाहेर पडू शकतो आणि नव्या नजरेने सभोवताल न्याहाळू शकतो. स्वतःच्या गृहीतकांना आपण तपासून बघू शकतो आणि धाडस करून ती सुधारू शकतो.

पुस्तकबंदीची कारणे काहीही असू देत, त्यातून आपले नुकसान नक्की असते. नवी विचारसरणी, नवी संस्कृती, नवे धर्म, नव्या ऐतिहासिक चौकटी यांच्यासाठी आपले दरवाजे बंद होतात. लहान वयापासून असे संस्कार झाले तर ती पिढी तारुण्यात अनुकंपा, करुणा आणि इतरांचे विचार (भलेही पटत नसतील तरीही) शांतपणे ऐकून घेण्याची क्षमताच गमावून बसेल. विरुद्धार्थी दृष्टिकोन सहिष्णूपणे स्वीकारण्याची त्यांची मनोभूमी आक्रसून जाईल.
वयानुसार विषय हा निकष असावाच पण सर्रास बंदी म्हणजे एकप्रकारची सेन्सॉरशिप ! विद्यार्थ्यांना अवघड विषयांपासून अलग ठेवण्यासाठी दरवेळी ढालीचे संरक्षण देणे कितपत संयुक्तिक? मग प्रौढ वयात आवश्यक असलेलं मानसिक कणखरपण कोठून येईल? काही विषय कायम दूर ठेवलेलेच बरे, असे सरसकट गृहीतक कितपत उपयुक्त ठरेल?

वाचलेल्या प्रत्येक पुस्तकांशी / लिहिलेल्या प्रत्येक अक्षरांशी सहमत व्हायलाच हवे अशी जबरदस्ती नसते. काहीवेळा विरोधी स्वरांमधूनही वैचारिक आणि परस्परसंबंध विषयक आकलन,बुद्धिमत्ता वाढीला लागू शकते. वाद-विवाद स्पर्धेत विषयाच्या दोन्ही बाजूंनी बोलता आलंच पाहिजे ही तयारीची पूर्वअट असते.
पुस्तकांवर बंदी घातली तर उलट त्यांचा खप वाढतो. पालकांनी मनाई केली की उलट असे वाचन उत्सुकतेपोटी होतेच. सध्याच्या स्मार्टफोन च्या युगात सारे काही हाताच्या बोटांवर उपलब्ध होऊ शकते, अगदी बंदी घातलेले साहित्यही !

नवं शस्त्र शोधून काढलं की ते कधी ना कधी आपल्याही विरोधात वापरलं जाऊ शकतं याची जाण बाळगायला हवी. एका गटाने बंदीची मागणी केली की विरुद्ध बाजूने तितकीच प्रखर आणि तीक्ष्ण प्रतिक्रिया येत असते असा न्यूटनचा तिसरा नियम सांगतो. याचा परिणाम पूर्ण समाजाची अनुकंपा, प्रेमाची धारणा उसविण्यात होऊ शकतो आणि हे दीर्घकालीन परिणाम अधिक विघातक असतात.

सरतेशेवटी बंदी घातलेल्या साहित्याने आचार-विचारांमध्ये फारसा फरक पडतो असे नाही. विचार आणि स्वातंत्र्याच्या घसरड्या पायवाटेवर अशी बंदी बऱ्यापैकी निष्प्रभ ठरते याला इतिहास साक्ष आहे. कारण इतिहास चुकांमधून शिकण्यासाठीही असतो, आणि शक्यतो त्या पुन्हा होणार नाहीत याची किमान अपेक्षा बाळगणारा असतो.

पुस्तकांना आपले “संवर्धन” करू द्यावे.

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..