हा तमिळ कालदर्शिकेनुसार सुरू होणारा तामिळनाडू मधील नवीन वर्षारंभाचा सण आहे.
हिंदू सौर कालगणनेनुसार चैतिराई या तमिळ महिन्यानुसार हा सण साजरा केला जातो. याला ‘पुथंडु ‘ असे संबोधिले जाते. ग्रेगोरिअन कालदर्शिकेनुसार हा सण सामान्यतः १४ एप्रिल या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी पुट्टांटु वाट्टुकल्ली किंवा इलिया पुट्टांटु नल्वाटुकल्ली असे म्हणत तमिळ बांधव एकमेकांना नूतन वर्षाच्या शुभेच्छा देतात.
‘पुथुवरुषम’ या दिवशी घराची स्वच्छता केली जाते. आंघोळ करून नवे कपडे परिधान केले जातात. घरातील देवघरासमोर फुले, फळे यांची आरास करुन देवपूजा करतात. घरातील ज्येष्ठ व्यक्तींना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतले जातात. जवळपासच्या देवळात जाऊन दर्शन घेतात. दुपारी शाकाहारी भोजनाचा एकत्रित आनंद घेतला जातो.
दक्षिण तामिळनाडूच्या काही भागात या सणाला ‘चैत्तिरीई विशू’ असे म्हणतात. केरळातील विशु सणाप्रमाणेच या दिवशी संध्याकाळी देवासमोर आंबा,केळे,फणस ही फळे मांडली जातात. नववर्षाच्या पहिल्या दिवशी मदुराई येथील मीनाक्षी मंदिर येथे मोठ्या सोहळ्याचे आयोजन केले जाते. तामिळनाडू व्यतिरिक्त श्रीलंका, मलेशिया, सिंगापूर, मॉरिशस आणि इतर देशांमध्येही पुथंडु साजरा केला जातो.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply