१९८५ साली गोष्ट आहे. आम्ही त्यावेळी घरी बसूनच जाहिरातींची कामं करीत होतो. एके दिवशी एक व्यक्ती स्कुटरवरुन आमच्या घरासमोर आली व ‘नावडकर इथेच राहतात का?’ असं विचारलं. आम्ही होकार दिल्यावर आत येऊन कामाचे स्वरुप सांगितले.. त्यांना ‘स्त्रीधन’ चित्रपटाच्या बुकलेटसाठी आतील मजकूर करुन हवा होता.. एस्. फत्तेलाल यांच्या धाकट्या मुलाची, यासीन साहेबांची ही पहिली भेट होती…
ते काम आम्ही वेळेत पूर्ण केले. त्या दरम्यान दोघेही बंधू आमच्या परिचयाचे झाले. थोरले बाबासाहेब व धाकटे यासीनसाहेब! दिसताना यासीन हे, बाबासाहेबांपेक्षा उंचीने जास्त असल्याने ते थोरले वाटायचे. यासीन बडबडे तर बाबासाहेब शांत व मोजकेच बोलणारे.
त्यांनी डेक्कनवर ‘अंजु फिल्म्स’ नावाने छोटे आॅफिस उघडले होते. आम्ही ‘स्त्रीधन’ चित्रपटाच्या जाहिरातींच्या निमित्ताने त्यांना वारंवार भेटत होतो. आमच्या चित्रकला, चित्रकार, हिंदी-इंग्रजी चित्रपट या विषयांवर भरपूर गप्पा होत असत. त्यांचा आवडता चित्रकार हा ‘मटानिया’ होता. त्यांची अनेक चित्रे त्यांच्या संग्रही होती.
चित्रपटाच्या प्रिमियर शो चे आम्ही कलात्मक निमंत्रण कार्ड केले. जाहिराती केल्या. दिवाळीच्या निमित्ताने ग्रिटींग कार्ड केले.
त्यांची वैयक्तिक कामे करीत असताना त्यांनी एकदा त्यांच्या वडिलांनी, एस्. फत्तेलाल यांनी काढलेले ‘प्रभात’ची तुतारी वाजविणाऱ्या स्त्रीचे चित्रं फिनिशिंग करण्यासाठी आमच्याकडे दिले..
एवढ्या थोर चित्रकाराचे ते चित्र हातात घेताना अतिशय आनंद झाला होता.. ते काम करुन दिल्यावर दोघेही बंधू खुष झाले..
बाबासाहेबांचा जन्म ६ ऑक्टोबर १९३६ सालचा. ‘प्रभात’चे भागीदार व प्रसिद्ध कलादिग्दर्शक एस्. फत्तेलाल उर्फ साहेबमामांचे ते थोरले चिरंजीव! त्यांचं बालपण ‘प्रभात’च्या आवारातच गेल्यामुळे त्यांना चित्रपटांविषयी गोडी निर्माण झाली..
शिक्षण चालू असतानाच ‘अयोध्यापती’ व ‘शंकराचार्य’ या चित्रपटाच्या निर्मितीप्रसंगी त्यांनी वडिलांच्या हाताखाली सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले.
एमइएस कॉलेजमधून बी.ए. ची पदवी प्राप्त केल्यानंतर ‘युगे युगे मी वाट पाहिली’ या चित्रपटाचे प्रमुख निर्माते म्हणून त्यांनी काम पाहिले. दरम्यान एफटीआयआय मध्ये दाखविले जाणारे अनेक देशी-परदेशी चित्रपट पाहून त्यांच्या ज्ञानात भर पडली.
संगीतकार राम कदम यांच्याशी मैत्रीचे संबंध असल्यामुळे त्यांनी एकत्र येऊन ‘चित्रमाऊली’ बॅनरखाली वसंत पेंटर यांच्या सहकार्याने ‘सुगंधी कट्टा’ चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटास राज्य सरकारचे दहा पुरस्कार मिळाले.
या यशामुळे त्यांनी उत्साहाने ‘चोरीचा मामला’ हा चित्रपट काढला. निळू फुले व ललिता पवार यांच्या या अप्रतिम चित्रपटास दादासाहेब फाळके पारितोषिक मिळाले.
बाबासाहेबांचं हे यश पाहून, अण्णा देऊळगांवकर यांनी ‘सासुरवाशीण’ या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांच्यावर सोपविले. हा चित्रपट सलग चाळीस आठवडे हाऊसफुल्ल चालला..
बाळासाहेब सरपोतदार यांनी ‘हिच खरी दौलत’ या मराठीतील पहिल्या मल्टीस्टार चित्रपटाची धुरा बाबासाहेबांवर सोपविली.
१९८० साली त्यांनी यशवंत दत्तला घेऊन ‘पैज’ हा चित्रपट त्यांनी केला. त्यानंतर ‘स्त्रीधन’ची निर्मिती केली. त्याच दरम्यान त्यांचा आमच्याशी परिचय झाला..
आमच्या भेटीगाठी होत होत्या. प्रिमियर शो च्या प्रसंगी दोघेही बंधू आम्हाला हमखास भेटायचे..
१९९६ साली ‘साईबाबा’ हा त्यांचा चित्रपट प्रदर्शित झाला. तो अखेरचाच ठरला.. त्यानंतर त्यांनी डेक्कनवरचे ऑफिस बंद करुन ते घरी शिफ्ट केले.. आमच्या भेटी कमी होऊ लागल्या..
हाज यात्रेला जाऊन आल्यावर त्यांना फुफ्फुसाचा दुर्धर विकार जडला. दीड वर्षाच्या उपचारानंतर ते शेवटच्या प्रवासाला निघून गेले..
आधी यासीन नंतर बाबासाहेब.. दोघेही गेल्यानंतर, एस्. फत्तेलाल यांच्या कलेचा वारसा अनंतात विलीन झाला..
पुत्र सांगती, चरित पित्याचे..
आम्ही भाग्यवान.. त्यांनी आम्हाला त्यांच्या वडिलांची कीर्ति सांगितली.. जे भारतीय चित्रपटसृष्टीतील कलादिग्दर्शकांचे मेरूमणी होते..
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
६-१०-२१.
Leave a Reply