आजची तारीख ही सबंध भारतीयांच्या अभिमानास पात्र ठरत होती , आहे आणि नेहमीच राहिल. ह्या तारखेचा इतिहास कधीच विसरता येण्यासारखा नाही. इतिहासात हा दिवस सुवर्णाक्षरात कोरला गेला आहे.
८ ऑगस्ट १९४२ रोजी गांधीजींनी ‘भारत छोडो आंदोलन’ सुरू केले आणि ब्रिटीशांना भारत सोडून जाण्यास भाग पाडण्यासाठी ‘करेंगे या मरेंगे’ या सामूहिक नागरी तत्वावर आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला. ह्यावेळी रेल्वे स्थानकं, टेलिग्राफ कार्यालये, सरकारी इमारती आणि वसाहती नियमांच्या संस्थांवर मोठ्या प्रमाणात हिंसाचार करून या आंदोलनास पाठिंबा देण्यात आला. तेथे सर्वत्र तोडफोड करण्याचे प्रकार घडले आणि सरकारने या हिंसाचाराला गांधींना जबाबदार धरले, सर्व प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली, काँग्रेसवर बंदी घालण्यात आली आणि आंदोलन दडपण्यासाठी पोलिस आणि सैन्याला पाचारण करण्यात आले.
दरम्यान, कलकत्त्यामधून ब्रिटिशांच्या ताब्यातून पळून नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी परदेशी भूमी गाठली आणि ब्रिटिशांना भारतातून काढून टाकण्यासाठी इंडियन नॅशनल आर्मी (आयएनए) संघटनेची स्थापना केली.
सप्टेंबर १९३९ मध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाले आणि भारतीय नेत्यांचा सल्ला न घेता गव्हर्नर जनरलने भारताला युद्ध करणारा देश म्हणून घोषित केले (ब्रिटीशांच्या वतीने). सुभाषचंद्र बोस यांनी जपानच्या मदतीने ब्रिटीश सैन्याशी लढाई सुरू केली आणि अंदमान आणि निकोबार बेटांना केवळ ब्रिटिशांपासून मुक्त केले नाही तर भारताच्या पूर्व सीमेमध्ये प्रवेश केला. पण १९४५ मध्ये जपानचा पराभव झाला आणि नेताजी जपानहून विमानामार्गे सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी निघाले परंतु ते ज्या विमानाने प्रवास करत होते त्याचा अपघात झाला आणि त्या दुर्घटनेतच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
“तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूंगा”- हे त्यांनी केलेले सर्वात लोकप्रिय विधान होते, जिथे त्यांनी भारतीय लोकांना त्यांच्या स्वातंत्र्य चळवळीत सामील होण्यासाठी उद्युक्त केले.
मंडळी म्हणतात ना की , स्वातंत्र्याची तोरणं बाजारात विकत मिळत नाहीत. त्यासाठी हजारो प्राणांची समरयज्ञात आहुती द्यावी लागते. खरोखरच आपल्या देशासाठी कित्येक क्रांतिकारकांनी , जनतेनी आपल्या प्राणांचे मोल चुकवले तेव्हा जाऊन आज आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत. त्यांनी जर त्याकाळी आपल्या प्राणांची आहुती दिली नसती तर आज आपल्यावर काय परिस्थिती गुदरली असती ह्याचा आपण आपल्या मनाशी सखोल विचार करणं ही आताच्या काळाची गरज आहे.
जय हिंद. वंदे मातरम् .
Quit India Movement, Mahatma Gandhi, 8 August 1942
Leave a Reply