आमच्या भात शेती मध्ये भात पेरायच्या शेतात भाजीपाला आणि मळ्याचा सिझन संपल्यावर साधारणपणे एप्रिल अखेरीस किंवा मे महिन्याच्या सुरवातीला चौकोनी आकारात वाळलेला पालापाचोळा व गवत जमा करून काही दिवस तसेच पडून दिले जाते. कडक उन्हामध्ये गवत आणि पालापाचोळा वाळला की एखाद दिवशी दिवस मावळतीला हा चौकोनी आकारात आच्छादलेला पालापाचोळा पेटवला जातो. वारा ज्या दिशेने असेल त्याच्या विरुध्द दिशेने पेटवल्याने गवत आणि पालापाचोळा हळू हळू धुमसत धुमसत पेटत राहतो. शेतातील गवत आणि गवताचे पडलेले बी यामध्ये भाजून आणि जळून नष्ट व्हावे हा उद्देश आहे असे सांगितले जाते. या संपूर्ण प्रक्रियेला म्हणजे पाला पाचोळा गोळा करून आणि नंतर पेटवून होईपर्यंत शेतात राब केला किंवा राब पेटवून झाला असं बोललं जातं.
पूर्वी गावातील प्रत्येक घराघरात ज्यांची शेती आहे ते प्रत्येक जण असे राब पेटवायची व्यवस्था करत असत. पण हळू हळू राब पेटवण्याचा प्रकार नामशेष होत चालला आहे. आमच्या शेतात तर जिथे राब पेटवला असेल तिथे तर जास्त गवत निघताना दिसते याउलट आमचे चुलते राब वगैरे काही भानगड न करता भात पेरतात तर त्यांच्या आवणा मध्ये गवताची काडी दिसत नाही. जेव्हा पेरलेल्या भाताचा राब चिखल करून दुसऱ्या शेतात लवण्यायोग्या होतो तेव्हा त्यास आवण असे बोलले जाते. भात लावणीला त्यामुळेच आवणी असे सुध्दा बोलले जाते. शेत आवले म्हणजे भाताचे रोप राब असलेल्या शेतातून काढून चिखल केलेल्या दुसऱ्या शेतात लावणे.
केवळ भाताचे रोप असे आहे जे एका शेतातून काढून दुसऱ्या शेतात लावले की त्याला भरघोस पीक येतं. त्यामुळेच आपल्याकडे लग्न लावताना अक्षता म्हणून तांदळाचे दाणे डोक्यावर उडवले जातात. म्हणजे एका घरातील मुलगी दुसऱ्या घरात गेल्यानंतर ती ज्या घरात जाईल तिथे भरभराटी आणि समृद्धी येईल असे काहीसे शास्त्र आहे असे बोलले जाते.
बाबा त्यांची पारंपरिक शेती पद्धती सोडायला अजून तयार नाहीत त्यामुळे दरवर्षी राबाची प्रक्रिया आम्हाला तरी अनुभवायला मिळत आहे. ज्या शेतात राब केला जातो त्याच शेतात भाताचे बियाणे पेरले जाते भात पेरलेल्या या संपूर्ण जागेला पुन्हा राब असेच बोलले जाते. म्हणजे पेरलेल्या सगळे बियाणे व्यवस्थित रुजले तर राब चांगला निघाला असे बोलतात. राब पेटवल्यानंतर पाऊस पडला की शेतात जो चौकोनी राब असतो तेव्हढा भाग ओलसर काळा कुट्ट झालेला असतो. मग त्या रबावर पूर्वी नांगर हाकलून उखळण काढली जायची पण बैल जोड्या जाऊन आता कित्येक वर्ष झाली मग टिलर किंवा ट्रॅक्टरच्या साहाय्याने उखाळण काढली जाते. पूर्वी नांगरून झाल्यावर भात पेरला जायचा मग त्यावर बैल जोडीचा नांगर काढून वजनदार फळी किंवा दात आळ फिरवलं जायचं जेणेकरून भाताचे दाणे माती खाली गाडले जायचे. पण आता बैलजोड्या पण गेल्या आणि फळ्या व दात आळी सुध्दा नामशेष होत गेल्या.
आम्ही लहान असताना बैलजोडी असलेल्या नांगरावर किंवा दात आळ्यावर वजन म्हणून बसायचो. उखळणी आणि पेरणीच्या वेळेस नांगरावर बसून शेतभर बैलांच्या शेपटीचे फटकारे खात राबाचा सुगंध घेण्याची मज्जा आणि अनुभव कधीही न विसरण्या सारखा आहे. पूर्वी एक दोन दिवस सगळ्यांची राब उखळायची आणि पेरायची घाई उडालेली असायची पण हल्ली मोजकेच शेतकरी शेती करत असल्याने पूर्वी सारखी लगबग आता बघायला मिळत नाही. भात पेरून झाल्यावर येणारे कोवळे अंकुर जस जसे मोठे होत जातात तसतस राब पोपटी रंगाचा दिसायला लागतो. जेव्हा राब जमिनीच्या वर चार इंच येतो तेव्हा त्या राबावर पांढऱ्या शुभ्र युरिया खताचा मारा केला जातो. खत मारून झाले की दोन तीन दिवसातच पोपटी रंगाचा राब गडद हिरवा रंग घेऊ लागतो. भात पेरून झाल्यापासून रोज बघत राहिले की राबाचा रंग रोजच बदलत आहे असे वाटत राहते. औषधे खते आणि आधुनिकीकरण करून उत्पादन वाढवता येते हे मान्य आहे पण एका दाण्याचे शेकडो हजार आणि लाखो दाणे करण्याची किमया फक्त सृष्टी आणि निसर्गाकडे आहे हे कोणीच नाकारू शकत नाही.
राब करण्यापासून, पेरण्यापासून, आवणी होईपर्यंत आणि त्यानंतर कापणी आणि लाणी होईपर्यंत शेतात राब राबतो तो शेतकरीच असतो. शेतकरी कुटुंबात जन्माला आल्यामुळे शेतीची आणि मातीशी असलेली नाळ शेती परवडली नाही किंवा तोट्यात गेली तरीसुध्दा अजूनपर्यंत काही केल्या तुटत नाही.
© प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनियर
कोन,भिवंडी,ठाणे.
Leave a Reply