नवीन लेखन...

पुण्यातील ‘राष्ट्रीय फिल्म संग्रहालय’ (नॅशनल फिल्म अर्काइव्ह ऑफ इंडिया)

स्थापना : १ फेब्रुवारी १९६४
या ‘राष्ट्रीय फिल्म संग्रहालय’त भारतीय सिनेमाचा ऐतिहासिक खजिना आहे. खरं तर आजच्या ‘डिजिटल’ युगात कोणीही टेक्नोसॅव्ही चित्रपट चाहता म्हणतो, ‘माझ्याकडील हार्ड डिस्कमध्ये दोन हजार फिल्म्स आहेत.’ आज असा व्यक्तिगत संग्रह सहज शक्य आहे. पण गेल्या शतकात याचा मागमूसही नव्हता, त्या काळात ‘चित्रपट संग्रहालय’ ही कल्पना उदयास आली.

खरं तर सिनेमा जन्माला आला तोच ‘नायट्रेट’ फिल्मवर. चांदीची जर आणि नायट्रेटचा अंश यांच्या संयोगातून निर्माण केल्या जाणाऱ्या या कच्च्या व पक्क्य़ा फिल्मची जातकुळी ज्वालाग्राही. नायट्रेट फिल्मचे आयुष्य मानवाइतकेच. मुळातच नष्ट होण्याची असोशी असलेल्या या सिनेमाचे मूळ स्वरूपात जतन हा एक मोठय़ा जिकिरीचा विषय होता व आहे. तशात सिनेमा ही इतर कलाप्रकारांसारखी फार गांभीर्याने घेण्याची कला म्हणून बघण्यासच अर्धशतक लागलं. ‘दोन घडीची करमणूक’ म्हणून सिनेमाला इतर कलांच्या तुलनेत हिणवलं गेलं. या पाश्र्वभूमीवर चित्रपटकलेच्या या ‘बहिष्कृत’ जगाला जतन-संवर्धनाचं कोंदण मिळण्यास उशीर लागणं ओघानंच आलं.

१९१३ मध्ये दादासाहेब फाळके यांच्या ‘राजा हरिश्चंद्र’ या चित्रपटाने भारतीय सिनेमाचा प्रारंभ झाला. तेव्हापासून १९५२ पर्यंतच्या सर्व चित्रपटांच्या प्रती ‘नायट्रेट’वरच होत्या. ‘नायट्रेट’ जमान्यात चित्रपटांचे जतन, संग्रह या कल्पनांचा मागमूसही नव्हता. चित्रपट यशस्वीपणे चालावा, ही अटकळ बांधूनच निर्माण केला जायचा. तो यशस्वी ठरला तर काही काळ त्याच्या मूळ फिल्मचा, प्रिंटचा मुक्काम सिनेलॅबमध्ये असायचा. अन्यथा या चित्रपटांच्या मूळ प्रती बांगडय़ा वा पिशव्या तयार करण्यासाठी कच्चा माल म्हणून विकल्या जायच्या. चित्रपटाचे जतन हा विषय स्टुडिओ सिस्टीमबरोबर अस्तित्वात आला. ‘प्रभात’, ‘बॉम्बे टॉकीज’, ‘न्यू थिएटर्स’ या बॅनरचे स्वत:चे स्टुडिओ होते. लॅब होत्या. आणि स्टुडिओ निर्मित चित्रपटांचे जतन करणारी नायट्रेट गोदामं होती. या स्टुडिओंनी काही प्रमाणात स्वनिर्मित चित्रपटांचे जतन-संवर्धन केले. काही ‘लॅब’ वा ‘थिएटर्स’मध्ये ‘निर्वासित’ चित्रपटांचे आपोआप जतन झाले, तर काही चित्रवेडय़ा संग्राहकांनी प्रेमानं काही दुर्मीळ प्रिंट्सचा सांभाळ केला. खरं तर त्यांच्या दूरदृष्टीमुळेच आज आपणास काही अभिजात चित्रपट बघावयास मिळत आहेत.

‘चित्रपट संग्रहालय’ ही संकल्पना आपल्या देशात सिनेमाचा सुवर्णमहोत्सव साजरा झाला तरी अस्तित्वात आली नव्हती. १९५१ च्या पाटील कमिटीच्या शिफारसीनंतर, चित्रपटाच्या आगमनाच्या ६०-६५ वर्षांनंतर- म्हणजे फेब्रुवारी १९६४ मध्ये भारतात राष्ट्रीय फिल्म संग्रहालयाचे कार्य पुण्यात सुरू झाले. प्रथम फिल्म इन्स्टिटय़ूटच्या आवारात ‘फिल्म लायब्ररी’ म्हणून तिचे अस्तित्व होते. संस्थेचे संचालक जगत मुरारी आणि प्रा. सतीश बहादूर यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या २५ हजारांचे अल्प बजेट व १२३ चित्रपटांच्या संग्रहाने ही लायब्ररी सुरू झाली. बालपणापासून चित्रवेडे असलेल्या, चित्रपट दिग्दर्शक होण्याचं स्वप्न बाळगून मुंबईत आलेल्या आणि सिनेमावर निस्सीम प्रेम करणाऱ्या पी. के. नायर या तरुणाची सहायक म्हणून निवड करण्यात आली. पॅशनचं मिशनमध्ये रूपांतर झालं आणि संग्रहालयाच्या कल्पनेनं भरारी घेतली. पुढे नायर संग्रहालयाचे सर्वेसर्वा संचालक बनले. अल्पावधीतच संग्रहालयाचा मुक्काम जयकर बंगल्याच्या स्वतंत्र, देखण्या वास्तूत करण्यात आला. नायर रुजू झाले तोपर्यंत ‘नायट्रेट’ जमान्यातील ९० टक्के चित्रखनिजा केव्हाच नामशेष झाला होता.

मूकपट जमान्यात हजारो चित्रपटांची निर्मिती झाली होती. (किमान १७००!) पण शिलकीत काय उरले आहे याचा थांगपत्ता नव्हता. नायरांनी प्रथम या मूकपटांचा शोध घेतला. सात-आठ मूकपटांची काही रिळं व ‘राजा हरिश्चंद्र’ची काही रिळं त्यांनी महत्प्रयासाने मिळवली. आज संग्रहालयातील हा मानाचा तुरा आहे!

‘सावकारी पाश’ हा मूकपट व ‘आलमआरा’ या पहिल्या बोलपटासह अनेक ऐतिहासिकदृष्टय़ा महत्त्वाचे चित्रपट उपलब्ध होऊ शकले नाहीत, याची खंत बाळगत नायरांनी दिवसाचे चोवीस तास जमेल तसे, जमेल तेथून प्रयत्नांची पराकाष्ठा करत जुन्या, जीर्ण चित्रपटांचा शोध घेतला. बंद स्टुडिओच्या लॅब, गोदामं, चोरबाजार, रेल्वे-कस्टमची गोदामं, थिएटर्स व वितरण कार्यालयं आणि खासगी चित्रपट संग्राहकांशी सलगी करत अपूर्व असा चित्रखजिना अपार मेहनतीनं जमा केला व या संग्रहालयाला आकार दिला.

२५-३० वर्षे त्यांनी हे ‘सरकारी’ कार्यालय एखाद्या निष्ठावान संस्थाचालकाप्रमाणे चालविले. देशी-विदेशी अभिजात चित्रपट जमविले, जतन केले. ते फिल्म सोसायटीमार्फत देशभर पसरलेल्या चित्रप्रेमींना उपलब्ध केले. त्यातूनच जपानचा अकिरा कुरोसोवा, स्वीडनचा इंगमार बर्गमन, इटलीचा व्हिक्टोरिया डिसीक्का आणि भारताचे सत्यजित रे यांसारख्या अनेक दिग्गज दिग्दर्शकांशी देशाच्या कानाकोपऱ्यातील रसिकांची गाठ पडली. देशभर अभिजात चित्रपट संस्कृती बहरली. फिल्म इन्स्टिटय़ूटच्या विद्यार्थ्यांच्या अनेक पिढय़ांना या अभिजात चित्रपटांची पाणपोई मुक्त हस्ते उपलब्ध केली. ‘चित्रपट रसास्वादा’चा एकमेव उपक्रम सतीश बहादूर यांच्या सहकार्याने देशभर राबविला. सिनेमावरील ग्रंथांचे संदर्भ ग्रंथालय उभे केले. सिनेमावर अभ्यास-संशोधन करणाऱ्यांसाठी ‘नायर’ (पीकेएन) हा परवलीचा शब्द बनला.

सिनेमाचा चालता-बोलता कोश म्हणून त्यांचा इतका बोलबाला झाला, की संग्रहालयाला लोक ‘नायर फिल्म अर्काइव्ह’ म्हणू लागले!
संग्रहालयाच्या सुसज्ज अशा दोन इमारती असून, दोन अत्याधुनिक थिएटर्स, प्रीव्ह्य़ू थिएटर, कोल्ड स्टोअरेज, संदर्भ ग्रंथालय अशा सर्व सोयी आहेत. संग्रहालयात देशी-विदेशी १८,८०० चित्रपट जतन केलेले आहेत. दोन हजार डीव्हीडी व तितक्याच व्हिडिओ कॅसेट्स, तीस हजारांहून अधिक पुस्तके, ३५,००० पटकथा, २२,००० पोस्टर्स, १३,००० साँग बुकलेट्स, रेकॉर्ड्स, दीड लाखांहून अधिक छायाचित्रे व दोन लाखांहून अधिक वृत्तपत्र कात्रणे एवढा ऐवज आहे. यातील बऱ्याच गोष्टींचे डिजिटायजेशन केले गेले आहे. पन्नास हजारांहून अधिक चित्रपट-लघुपटांची माहिती, छायाचित्रे, पोस्टर्स एका सॉफ्टवेअरमध्ये उपलब्ध आहे.

नायर यांच्या काळात जतन-संवर्धन झालेला संग्रह अधिक समृद्ध व अत्याधुनिक करण्याचा प्रयत्न त्यांच्यानंतर आलेल्या संचालकांनीही केला. चित्रपट विशेषज्ज्ञ असलेल्या संचालक सुरेश छाब्रिया यांनी संग्रहालयाचे आंतरराष्ट्रीय महत्त्व अधोरेखित केलं. तर संचालक शशिधरन यांनी संग्रहालयाची गुंतागुंतीची रचना अधिक सुविहित करण्याचा प्रयत्न केला. अकाली निधन पावलेल्या संचालक विजय जाधव यांच्या कारकीर्दीत ‘डिजिटायजेशन’चा प्रकल्प सुरू करण्यात आला. सध्याचे संचालक प्रशांत पाठराबे यांनी या प्रकल्पाखाली ५५० जुन्या, दुर्मीळ चित्रपटांचे डिजिटायजेशन पूर्ण केले आहे. जनसामान्यांसाठी ‘डिजिटल लायब्ररी’ सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे.

‘नॅशनल फिल्म हॅरिटेज मिशन’ दृष्टिक्षेपात असून, त्यायोगे संग्रहालयाला नवसंजीवनी मिळणार आहे. केवळ हजारोंच्या संख्येने चित्रपटांचा संग्रह हाच या संस्थेचा उद्देश नाही. तर हा सारा संग्रह सर्वसामान्यांच्या आणि अभ्यासकांच्या उपयोगी यावा या दृष्टीने संग्रहालय अनेक उपक्रम राबवित असते. दरवर्षी एफटीआयआयच्या बरोबर फिल्म अॅचप्रिसिएशनचा एक महिन्याचा निवासी अभ्यासक्रम आयोजित केला जातो. तर फिल्म सोसायटीच्या सहकार्याने एक आठवडय़ाचे रसास्वाद शिबीर मराठीतून आयोजित केले जाते. त्याचबरोबर दर वर्षी चित्रपटाशी निगडित विषयांवर अभ्यासासाठी तीन वेगवेगळ्या पाठय़वृत्ती दिल्या जातात. फिल्म सर्कलच्या माध्यमातून अनेकांना संग्रहालयामार्फत वर्षभर वैविध्यपूर्ण चित्रपट पाहायला मिळतात. संग्रहालयाचे फेसबुक पेजवरून प्रत्येक दिवसाचं चित्रपटाच्या अनुषंगाने दिनविशेष प्रकाशित होत असते.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..