पहाट झाली.
काळपट आकाश उजळू लागलं.
गार वारा भिरभिरू लागला.
पाखरांचा किलबिलाट सुरू झाला.
पाने सळसळली.. .. झाडांची झोप उडाली.
फुलं हळूहळू फुलू लागली.. .. वाऱ्यावर डोलू लागली.
आणि…
एका झाडाला वाटलं, ‘छे! हे आता रोजचंच झालंय.
रोज-रोज का सकाळी फुलायचं आणि वाऱ्यावर डोलायचं?
हे सारं बदललंच पाहिजे.
रोज पहाट आणि रोज रोज किलबिलाट.
नको हा सकाळचा गोंगाट.
सकाळपासून संध्याकाळपर्यंत हा सूर्याचा रखरखाट.
ते गरमागरम वारे आणि खरबरीत धुळीचे फवारे.
दिवसभर या पक्षांची किरकिर आणि माणसांची चिरचिर.
यापेक्षा….
सकाळी मस्त आराम करावा.
पानं मिटून फुलांनी शांत झोपावं, कळीतल्या कळीत.
सूर्य मावळला की आरामात उठावं.
संध्याकाळी गार वारे सुरू झाले की फांद्या ताणून आळस झटकावा.
अलगद सळसळावं.
मग..
एकेक पान जागं व्हावं.
एकेक फूल उमलत जावं.
प्रत्येक फुलातून सुवासाचं सुंदर कारंजं उसळत यावं.
आणि..
रात्रीची वेळ असल्याने… अंधार गडद असल्याने…फूल सुध्दा पांढरं असावं.
काळोखात सुध्दा इतरांच्या डोळ्यात भरावं.
घमघमीत वासानं त्यांना झपाटून टाकावं.
त्यांचा दिवसभराचा थकवा त्यांना विसरायला लावावं.
तेव्हा किती मजा येईल!’
आणि खरंच..
दुसऱ्या दिवशी सकाळी
ते झाड उठलंच नाही.
आनंदाने सळसळलंच नाही.
त्याची फुलं फुललीच नाहीत.
वाऱ्यावर ती डोललीच नाहीत.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सूर्य मावळला.
दिवेलागण झाली.
अंधार गडद होऊ लागला.
सकाळी कामावर गेलेली माणसं, थकून-भागून घरी परत येऊ लागली.
इतक्यात….
फुलांचा घमघमाट सुटला…
थकलेल्यांचा थकवा पळाला!
थकलेली माणसं ताजीतवानी झाली!!
एकदम रिचार्ज झाली!
माणसे आनंदाने म्हणाली,
“अरे व्वा! आमची रातराणी बहरली वाटतं!!”
– राजीव तांबे.
Leave a Reply