“तुझे तर काम असे असते ना..एक ना धड भाराभर चिंध्या”…
“चिंध्या? आता या चिंध्या कुठून मध्येच आल्या? मला काय वेड लागलंय का कपडे फाडून चिंध्या करायला”?
“अगं माझे आई..ही आपल्या मायबोलीतील म्हण आहे. नशीब मातृभाषेतूनच शिक्षण घेतले आहेस”…
“हो हो..मी मराठी ! त्या मी शिवाजीराजे भोसले बोलतोय सिनेमात कसे सगळेजण छातीवर मूठ आपटून मी मराठी म्हणतात अगदी तसाच मलाही अभिमान आहे मराठी असण्याचा”.
“उथळ पाण्याला खळखळाट फार”..
“आता हे उथळ पाणी कशाला मध्ये आणलंत हो? त्याऐवजी कल्लुळाचं पाणी कशाला ढवळीलं.. नागाच्या पिल्ल्याला तू कशाला खवळीलं…हे गाणं भारी आहे”…
“काय गं, तू खरंच डोक्यावर पडली आहेस का? उथळ पाण्याचा आणि या गीताचा अर्थाअर्थी संबंध तरी आहे का? आपली उचलली जीभ लावली टाळ्याला”…
“अहो, मराठीचे प्राध्यापक…मला हेच कळत नाही जीभ टाळ्याला का लावायची? मी कुणालाच पाहिले नाही टाळा जीभ लावून उघडताना ..चावीनेच उघड बंद करताना पाहिलेय”…
“अगं ऐ बाई..तो दरवाजाचा टाळा नाही गं ! आपल्या तोंडातील एका अवयवाचे नाव टाळा आहे”…
“मला हेच कळत नाही..आपली मराठी भाषा अतिशय समृद्ध आहे.एका एका शब्दाला कित्तीतरी समानार्थी शब्द असतात.मग दरवाजाला लावायचा टाळा आणि तोंडातील टाळा एकच का”?
“दरवाजाला आपण टाळा लावला की तो बंद होतो ना..तसेच जीभ टाळ्याला चिकटली की बोलणे बंद होते.. म्हणून असेल कदाचित”..
“थांबा मी टाळ्याला जीभ चिटकवून बघते खरंच बोलता येत नाही का ते”…
“एक काम कर.. अर्धातास तशीच प्रॅक्टिस करत..जर तुला बोलता आले तर तू वर्ल्ड रेकॉर्ड करशील टाळ्याला जीभ चिटकवून बोलण्याचे”…(मनाशी.. म्हणजे मलाही शांतता मिळेल.)
“अय्या खरंच? थांबा आता..हे कपाट नंतर आवरते.आता आधी हीच प्रॅक्टिस करते”..
“उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग”…
“आता हे काय नवीन? कोण उतावळा नवरा? तुम्ही? अय्या ! गुडघ्याला बाशिंग बांधले तर कसे दिसेल ते.. हसतील ना सगळे! आणि माझ्या माहितीप्रमाणे व्यक्ती फक्त एकदाच बाशिंग बांधते.. स्वतः च्या लग्नात ! म्हणजे तुम्ही आता दुसरे लग्न करताय…मी असताना? शोभते का तुम्हाला”?
“धन्य आहेस तू..मला सांग तू मराठीत दरवर्षी पास कशी व्हायचीस”?
“म्हणजे काय? तुम्हाला माहीतच नाही जसे काही”..
मला? मी काय तुझे पेपर तपासायचो की तुझ्या वर्गात होतो? काय बोलते..कशाचा कशाला पत्ता आहे का? आग सोमेश्वरी अन् बंब रामेश्वरी”..
“अहो असे काय करता? मी आणि सुमित जुळे बहिणभाऊ..मी सुमिता तो सुमित..आडनावही सेम! त्यामुळे आमचा नंबर कायमच मागेपुढे असायचा.मी उत्तर पत्रिकेवर सुमित असेच लिहायचे.त्याचा पेपर लिहून झाला की तो हळूच माझ्याकडे द्यायचा, आणि माझी कोरी उत्तर पत्रिका मी त्याला द्यायचे.मग आनंदीबाईंनी जसा “ध” चा “मा”केला तशी मी सुमित या नावापुढे एक काना ओढून सुमिता करायचे…हाय काय अन् नाय काय ! जुळे असण्याचा असाही फायदा असतो म्हंटलं “…
“ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये माणसाने”…
“ऊस ? तो खायला सातारला जावे लागेल.अन त्यासाठीही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे म्हणे..ऊसाला वाढीव दर मिळावा म्हणून..मग ऊस आपल्याला कोण देणार”?
“तू वेड घेऊन पेडगावला जाते आहेस की खरंच तुझा सगळा उजेडच आहे समजूतीचा”?
“आधी मला सांगा हे पेडगाव कुठे आहे? अन् मी एकटीनेच तिकडे का जायचे आहे”?
मोबाईल उचलून कानाला लावत…” हं बोल रे हर्षल ! भेटूया म्हणतोस..बरं आलोच पंधरा मिनिटांत! कामात..? नाही नाही.असाच वेळ जाईना म्हणून बोअर झालोय”..
“म्हणजे माझ्याशी बोलणे बोअर”..?
“नाही नाही..तुझ्याशी बोलणे म्हणजे… आपल्या मायमराठीचा अपमान होताना पाहून खरंच जीव तीळ तीळ तुटतो”.
“आता तो तीळ केवढासा..जीवाची कसली तीळाशी तुलना करता? आभाळाशी तरी करा”…
“चल..बाय! मी बाहेर निघालोय.बहुतेक जेवायला नसेन.तू जेवून घे”…
“माझ्या प्रश्नाचे उत्तर तर देऊन जा हो..तीळाचे”…
“आपल्याला आयुष्य सोबत काढायचेय की नाही? मग उद्यासाठी थोडेसे राखून ठेवू यात ना! काय गडबड आहे? तसेही रात्र थोडी अन् सोंगे फार”…
“आता ही सोंगे कुठली? आता कुठे शिमगा आणलात मध्येच? आत्ता तर संक्रांत झाली ना”?
“बाय..बाय..बाय”..
काय बाई..कळतच नाही यांचे..
इति हेमा उवाच..१९/१/२०२४
सौ.हेमा पाटील.
आम्ही साहित्यिक – फेसबुक ग्रुपच्या लेखिका…
Leave a Reply